पेट्रोकेमिकल कंपनीतील नोकरी सोडून मुंबईत आला, अभिनेता होण्यासाठी केली जीवतोड मेहनत, उत्तरप्रदेशचा 'हा' मुलगा गाजवतोय बॉलिवूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:47 IST2026-05-19T17:36:43+5:302026-05-19T17:47:07+5:30
अभिनयाच्या प्रेमापोटी केली वॉचमनची नोकरी, एकवेळच्या जेवणाचीही होती भ्रांत, उत्तरप्रदेशचा 'हा' मुलगा गाजवतोय बॉलिवूड, ओळखलं?

स्वप्ननगरी मुंबईत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आलेला प्रत्येक तरुण यशस्वी होतोच असं नाही. त्यात जर चेहरा स्क्रीन मटेरियल नसेल तर प्रवास अधिकच खडतर होतो.

पण या सगळ्यावर मात करुन आपल्या अभिनयाचे बावनकशी सोने झळाळत सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन_सिद्दीकी.या लोकप्रिय अभिनेत्याचा आज जन्मदिवस. १९ मे १९७४ ला उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमधील ‘बुढाणा’ या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला.

एका सामान्य मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या नवाझुद्दीनने आपल्या टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. प्रतिकुल परिस्थितीत अभ्यास करत नवाजुद्दीनने गुरूकुल कांगरी विद्यापीठ, हरिद्वार येथे रसायनशास्त्रातील विज्ञान पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केलं पण दोन वर्षे नोकरीसाठी वणवण करावी लागली. अखेरीस बडोदा येथील एका पेट्रोकेमिकल कंपनीत त्याला नोकरी मिळाली. या कंपनीत त्याने जवळपास दीड वर्षे काम केलं.

या कंपनीत अनेक प्रकारच्या केमिकल टेस्टिंग कराव्या लागत असत. त्यामुळे नवाजुद्दीनने हा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो दिल्लीला गेला. दिल्लीत असताना अभिनेत्याने एक नाटकाचा ग्रुप जॉइन केला, तिथे साक्षी, सौरभ शुक्ला यांच्याशी ओळख झाली आणि अभिनयाचा प्रवास सुरु झाला. मात्र नाटकातून काम करुन पैसे मिळत नव्हते. रोजचा खर्च भागवणे अवघड होत होते. संध्याकाळच्या जेवणाचा खर्च निघावा यासाठी वॉचमनची नोकरीदेखील केली.

अभिनयाची आवडच पुढे नवाजुद्दीनला राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एन. एस. डी.) घेऊन गेली. १९९६ मध्ये तेथून पदवी प्राप्त केल्यावर अभिनयातच करिअर करण्याचे स्वप्न पाहत स्वप्ननगरी मुंबईत पाऊल ठेवलं.

नवाजुद्दीनच्या नशीबाने २०१२ मध्ये कलाटणी घेतली. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग ऑफ वासेपूर’ चित्रपटातून रातोरात प्रसिद्ध होत त्याच्या स्टारडम झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर २०१५ मध्ये त्याने 'किक’ या चित्रपटात सलमान खानसोबत खलनायक साकारला. त्यानंतर 'बजरंगी भाईजान' मधील 'चांद नवाब', 'बदलापूर' मधील 'लाइक' आणि 'मांझीः द माउंटेन मॅन' मधील 'दशरथ मांजी' या चित्रपटांमध्ये काम केले. रमण राघव 2.0 (२०१६), रईस (२०१७), मॉम (२०१७) आणि बाबूमोशाय बंदूकबाज (२०१७) यासह मुन्ना मायकल, टीकू वेड्स शेरु, तलाश, हरामखोर, या चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिकातून त्याची कारकिर्द बहरत राहिली.

सद्यस्थितीत नवाजुद्दीन सिद्दीकी त्याचा धाकटा भाऊ चित्रपट दिग्दर्शक शमास नवाब याच्यासोबत मुंबईत राहतो. चित्रीकरण नसेल तेव्ही मूळ गावी बुधना येथे जावून, तिथे असलेल्या शेतात वेळ घालवतो.

















