सुकन्या मोने अन् गिरीश ओक यांची जमली जोडी! ३० वर्षानंतर रंगभूमीवर येणार एकत्र, नव्या नाटकाचा शुभारंभ कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:48 IST2026-05-19T13:43:51+5:302026-05-19T13:48:50+5:30
३० वर्षानी एकत्र रंगभूमीवर दिसणार! सुकन्या मोने अन् गिरीश ओक यांच्या 'आता थांबवायचं कसं?' मधून उलगडणार आजच्या कुटुंबाची गोष्ट

सुकन्या मोने अन् गिरीश ओक यांची जमली जोडी! ३० वर्षानंतर रंगभूमीवर येणार एकत्र, नव्या नाटकाचा शुभारंभ कधी?
Sukanya Mone And Girish Oak: मराठी नाटकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही वर्षांमध्ये नाटकांच्या माध्यमातून रंगभूमीवर अनेक नवनवीन विषय सादर करण्यात आले. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यवर्तुळात एका नाटकाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्या नाटकाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील दोन महामेरू म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक तब्बल ३० वर्षांनंतर या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर एकत्र झळकणार आहेत. या बहुप्रतिक्षित नाटकाचं नाव ‘आता थांबवायचं कसं?’ असं आहे .
३० वर्षांनंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक ‘आता थांबवायचं कसं?’ नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याबद्दल बोलताना डॉ. गिरीश ओक भावूक होत म्हणाले, "सुकन्यासोबत ३० वर्षांनंतर नाटकात काम करताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याच प्रवासात तिचं आणि संजयचं लग्न आमच्या डोळ्यांदेखत झालं होतं. आज एका नव्या केमिस्ट्रीसह आम्ही एकत्र आलो आहोत. मी पनवेलच्या एका स्पर्धेत ही कथा एकांकिका स्वरूपात पाहिली होती आणि एक मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो होतो. हा विषय व्यावसायिक रंगभूमीवर येणं काळाची गरज आहे, असं वाटल्याने मी याचा पाठपुरावा केला."
यानंतर पुढे ते म्हणाले, "आजच्या काळात 'निर्जीव फोन स्मार्ट होत चालला आहे आणि जिवंत माणूस बावळट', हे भीषण वास्तव आहे. सोशल मीडियाचा निष्काळजी वापर आणि तरुण पिढीची बेफिकीरी यामुळे संपूर्ण कुटुंबावर कसं वादळ येऊ शकतं, यावर हे नाटक बोट ठेवतं. एक अभिनेता म्हणून यातला 'बाप' साकारताना मला वैयक्तिक आयुष्यातही त्याची तीव्रता जाणवतेय. हे नाटक पालकांना आणि पाल्यांना एकत्र आणून एक निश्चित दिशा देईल, असा मला विश्वास आहे."
१० वर्षांनंतर रंगभूमीवर येणं ही माझी स्वतःची परीक्षा...
दरम्यान, या नाटकाच्या माध्यमातून अभिनेत्री सुकन्या मोने तब्बल १० वर्षानंतर
रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. या भूमिकेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "२०१४ मधील ‘सेल्फी’ नंतर मी नाटक केलं नव्हतं. पण ‘आता थांबवायचं कसं?’ ची संहिता माझ्या मनाला स्पर्श करून गेली. 'कुसुम मनोहर लेले' आणि 'जुळून येती रेशीमगाठी' नंतर गिरीशबरोबर पुन्हा काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच आहे. आमचं 'गिव्ह अँड टेक' इतकं सहज आहे की आम्हाला संवादांचीही गरज पडत नाही."
"यात मी साकारत असलेली मध्यमवर्गीय आई अत्यंत आव्हानात्मक आहे. परिस्थितीविरुद्ध बंड पुकारायचं असूनही कौटुंबिक संस्कारांमुळे तिचे हात बांधले गेले आहेत, तिची ही अगतिकता आणि मनातील वादळ साकारताना माझी स्वतःचीच एक परीक्षा चालली आहे. हे नाटक पालकांना आणि आजच्या 'टेक्नोसॅवी' तरुण पिढीला अंतर्मुख करणारं, त्यांचे डोळे उघडणारं आहे. संकटसमयी पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहाचं, हे सांगणारी ही आजची जिवंत गोष्ट आहे."
दिग्गज निर्मात्यांची मिळाली खंबीर साथ...
दरम्यान, या नाटकात केवळ पडद्यावरचे कलाकारच नाही, तर या निर्मात्यांचीही मोठी साथ लाभली आहे. बाजूही मराठी रंगभूमीवरील सर्वात भक्कम बाजू मानली जात आहे. रंगभूमीला ‘बोलविता धनी’ सारखी अत्यंत यशस्वी कलाकृती देणाऱ्या प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर या ५ ताकदीच्या आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र येत आहेत.
नाटकाची मूळ कथा गुप्त ठेवली असली तरी, या नाटकाचा गाभा आजच्या काळातील प्रत्येक कुटुंबाला विचार करायला लावणारा आहे. एका हसत्या-खेळत्या मध्यमवर्गीय कुटुंबावर जेव्हा अचानक एखादं वादळ घोंगावू लागतं, तेव्हा होणारी पालकांची घालमेल यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाच्या भडिमारामुळे तरुण पिढी आणि पालकांसमोर उभे ठाकलेले गंभीर प्रश्न, आणि अशा प्रसंगात ‘छाती काढून रडायचं की मूठ आवळून लढायचं’ हा पालकांचा संघर्ष यात अतिशय भावनिक पद्धतीने मांडण्यात आला आहे. रक्ताचं पाणी करून वाढवलेल्या लेकरांना वाचवण्यासाठी पालकांनी दिलेला हा लढा पालकांसाठी आणि आजच्या पिढीसाठी एक जिवंत उदाहरण आहे.
तगडी स्टारकास्ट अन् तंत्रज्ञांची सोबत
दरम्यान, या नाटकात सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेटे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून, अभिनयाची एक मोठी जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण नाटकाचे सशक्त लेखन आणि दिग्दर्शन संदिप दंडवते यांनी केले आहे. नाटकाच्या देखण्या नेपथ्याची धुरा संदेश बेंद्रे, प्रकाश योजना रत्नाकांत जगताप,संगीत समीर म्हात्रे, वेशभूषा अमृता काकतकर, रंगभूषा राजेश परब यांनी समर्थपणे सांभाळली असून दीपक गोडबोले हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.
शुभारांभाचे भव्य प्रयोग:
•३० मे २०२६ (शनिवार): दुपारी ४.०० वाजता — गडकरी रंगायतन, ठाणे.
•३१ मे २०२६ (रविवार): दुपारी ४.०० वाजता — रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.