'राजा शिवाजी' सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने दिली दुसऱ्या भागाची हिंट, म्हणाला- "भेटूया लवकरच...!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:08 IST2026-05-05T12:07:10+5:302026-05-05T12:08:43+5:30
'राजा शिवाजी' सिनेमात येसाजी कंक ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सिनेमाबद्दल त्याची खास आठवण सांगितली आहे. याशिवाय 'राजा शिवाजी'च्या दुसऱ्या भागाबद्दल हिंट दिली आहे

'राजा शिवाजी' सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने दिली दुसऱ्या भागाची हिंट, म्हणाला- "भेटूया लवकरच...!"
सध्या 'राजा शिवाजी' सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातून 'राजा शिवाजी' सिनेमाला प्रेक्षकांचा हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. अशातच 'राजा शिवाजी' सिनेमात येसाजी कंक ही भूमिका साकारणारा अभिनेता कपिल होनरावने सिनेमाबद्दल त्याची खास आठवण सांगितली आहे. याशिवाय 'राजा शिवाजी'च्या दुसऱ्या भागाबद्दल हिंट दिली आहे.
कपिलने सोशल मीडियावर 'राजा शिवाजी'चे पडद्यामागचे क्षण शेअर केले आहेत. यात कपिल तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकताना दिसतोय. हे व्हिडीओ पोस्ट करुन कपिल लिहितो, ''राजा शिवाजी आता फक्त एक फिल्म नाही… तो प्रत्येकाच्या मनातली भावना बनला आहे. या चित्रपटामुळे माझ्यासारख्या टीव्ही अभिनेत्याला नॅशनल लेव्हलवर ओळख मिळाली, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे.२ महिने तलवारबाजी, घोडेस्वारी आणि खूप कडक ट्रेनिंग… त्या सगळ्या मेहनतीमागे एकच स्वप्न होतं — मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहण्याचं.''
''खूप काही आहे जे शब्दात मांडता येणार नाही… पण हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आणि या सगळ्यामागे एक माणूस... रोहन मापुस्कर दादा. तो माझ्यासाठी फक्त casting director नाही, तर मोठा भाऊ. सेटवर तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण — आयुष्यभर लक्षात राहील. Thank you so much दादा… मला राजा शिवाजीचा भाग बनवण्यासाठी. जय भवानी… जय शिवाजी! भेटू लवकरच...राजा शिवछत्रपती.'',
अशाप्रकारे कपिलने शेवटी 'राजा शिवाजी'चा पुढचा भाग 'राजा शिवछत्रपती' बद्दल हिंट दिली आहे. सिनेमा संपल्यावरही राजा शिवछत्रपती असं शीर्षक झळकतं. त्यामुळे रितेश 'राजा शिवाजी'चा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येईल, अशी शक्यता नाकारता येत नाही.