पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका! निर्मिती सावंत-पूजा सावंत यांच्या 'कपबशी'चा टीझर बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:12 IST2026-05-16T11:11:29+5:302026-05-16T11:12:21+5:30
अनोख्या कथेवर आधारित 'कपबशी' या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, या दमदार टीजरने चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे.

पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका! निर्मिती सावंत-पूजा सावंत यांच्या 'कपबशी'चा टीझर बघाच
अनोख्या कथेवर आधारित 'कपबशी' या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, येत्या १९ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आताच्या आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत अत्यंत मनोरंजक गोष्ट मांडण्यात आली असल्याने या दमदार टीजरने चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे.
पारंपरिक पद्धतीने लग्न जमवताना नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्या पत्रिका जुळतात का हे पाहण्याची प्रथा आहे. मात्र, आजच्या काळात उच्च शिक्षित असलेली नवरी मुलगी होणाऱ्या सासूसमोर अत्यंत चमत्कारिक अट ठेवते. ती अट म्हणजे सासू-सुनेची पत्रिका जुळली पाहिजे. या अटीनंतर काय धमाल होते याची मनोरंजक गोष्ट "कप-बशी" या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीजरही कथानकाची उत्सुकता वाढवणारा आहे. अनोख्या कल्पनेला उत्तम अभिनय, खुसखुशीत संवादांची जोड असल्याचं टीजरमधून दिसत आहे. ऋषी मनोहर, पूजा सावंत ही नवी जोडी हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.
सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने "कप बशी" या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश रामगोपाल राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा , संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले असून दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांचे आहे."कप बशी" चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला पहिल्यांदाच सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे सुमधुर संगीत लाभले आहे.
गुरु ठाकूर यांनी गीतलेखन, बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन तर संकलक म्हणून आशिष म्हात्रे यांनी काम पाहिले आहे . राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजक तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी लूक डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित चेहरा ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे ,उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.