ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 09:04 IST2026-05-10T09:01:39+5:302026-05-10T09:04:39+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम, म्हणाल्या-"अजूनही न्याय मिळाला नाही तर..."

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
Usha Chavan: ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये अजरामर कलाकृती साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. उषा चव्हाण या केवळ अभिनेत्रीच नाहीतर उत्तम नृत्यांगणाही होत्या. उत्तम अभिनय, नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्याचं अढळ स्थान निर्माण केलं. सध्या त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांची पुण्यातील धनकवडी येथे जमीन आहे. या जमिनीलसाठी गेली २६ वर्ष त्या अन्याय सहन करत आहेत. मार्च २०२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने उषा चव्हाण यांच्या बाजूने निकाल दिला होता.मात्र, या प्रकरणाला एक वेगळंच वळण प्राप्त झालं आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊया...

नुकतीच अभिनेत्री उषा चव्हाण यांनी सोशल मीडियावर निवेदन जारी केलं आहे, यामध्ये त्यांनी म्हटलंय,"मी जेष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण, अत्यंत वेदनादायी परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेसमोर माझी भूमिका मांडत आहे. माझ्या कुटुंबियांच्या मालकीच्या व न्यायालयीन वादातील संपत्तीबाबत मा. उच्च न्यायालयाने दि. ४.३.२०२६ रोजी स्पष्टपणे नमुद केले आहे की सदर मालमत्ता अद्याप अविभाजित असून माझा मुलगा श्री हृदयनाथ कडू देशमुख त्यामध्ये कायदेशीर अस्तित्वात आहे. तसेच दि.२०.१०.२०२३ रोजी सुमारे १३,५४६ चौ.मी टीडीआर संदर्भात माझ्या बाजूचे हक्क मान्य झालेले असताना देखील पुणे महानगरपालिकेने अचानकपणे संपूर्ण १५,०६६ चौ.मी टीडीआर हे एका बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी देण्याची कार्यवाही केली आहे. पुढे या प्रेसनोटमध्ये डीसीआर क्रमांक नमुद करत म्हटलंय, मालकील हक्क, प्रलंबित वाद आणि माझ्या लेखी हरकती पूर्णपणे डावलून जारी करण्यात आले आहेत. मी वारंवार संबंधित अधिकारी, मा. पंतप्रधान कार्यालय,मा, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी व निवेदने दिली आहे. मात्र, माझे म्हणणे, कायदेशीर हक्क, आणि न्यायालयीन आदेश दुर्लक्षित करण्यात आले. जर नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणांनीच अशा प्रकारे वर्तन केले. तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे पाहायचे,हा प्रश्न आज निर्माण झाला आहे. एका वयोवृद्ध कलाकार स्त्रीला, जिने संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी दिले.तिलाच स्वत:च्या हक्कासाठी इतकी वेदनादायक लढाई लढावी लागत असेल तर समान्य मराठी कुटुंबाची परिस्थिती किती भयानक असेल, याचा विचारही करवत नाही."

या पुढे त्यांनी लिहिलंय,"आज मला अत्यंत दु:खाने सांगावे लागत आहे की, महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसाच्या मालमत्ता हक्कांचे संरक्षण होईल का याबाबतच प्रश्न निर्माण झाला आहे. कडू कुटुंबियांचा भाग नसलेल्या बिल्डर संस्थेला संपूर्ण विकास हक्क देऊन मूळ मालकांना संघर्ष करायला लावणे कोणत्याही न्यायप्रिय समाजाला शोभणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय,स्वाभिमान आणि रयतेच्या हक्कासाठी संघर्ष केला. आज पुन्हा सामान्य नागरिकांना स्वत:च्या हक्कासाठी तशाच प्रकारे लढावे लागते आहे का? असा गंभीर प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे."
तर शासनाने दिलेले पुरस्कार परत करेन...
"महाराष्ट्र शासनाने १९७० पासून माझ्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मला अनेक पुरस्कार,ट्रॉफीज आणि सन्मान दिले. मात्र, जर न्यायलयीन आदेश असूनही माझे हक्क सुरक्षित राहणार नसतील,तर अशा सन्मानांचे माझ्यासाठी काही मूल्य उरत नाही. म्हणून मी महाराष्ट्र शासनाने मला दिलेले पुरस्कार, मानचिन्हे आणि ट्रॉफीज आणि प्रमाणपत्रे परत करण्याच्या निर्णय घेत आहे. आवश्यकता भासल्यास ती स्वत: स्व, आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी अर्पण करून माझा निषेध व्यक्त करेन."
"हा विषय मा. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास विभागाशी संबंधित वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास अनेक वेळा आणून देण्यात आला आहे. अजूनही न्याय मिळाला नाहीतर मला कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने मोठा लढा उभारावा लागेल. पत्रकार बंधुनो, समाजसेवकांनो आणि महाराष्ट्रातील जनता ही केवळ एका अभिनेत्रीची लढाई नाही, हा सामान्य नागरिकाच्या मालमत्ता हक्क, न्याय आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आज जर आवाज उठला नाही, तर उद्या सामान्य कुटुंबांनाही अशा संघर्षांना सामोरे जावे लागू शकते. माझ्याकडे असलेली कागदपत्रे, न्यायालयीन आदेश आणि संबंधित पुरावे मी जनतेसमोर ठेवायला तयार आहे." अशा आशयाचं निवेदन अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शेअर केली आहे. दरम्यान, यानंतर प्रशासन कोणती ठोस पाऊले उचलतंय याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.