"मार खायची कामं?" कोल्हापूरच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्याने स्टेजवर उडी मारली, सोनू निगमने त्याच्या हातात माईक दिला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:21 IST2026-05-12T14:19:39+5:302026-05-12T14:21:33+5:30
लाइव्ह परफॉर्मन्स सुरू असताना एका चाहत्याने अचानक स्टेजवर उडी मारून सोनूच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे सोनूने गाणे मध्येच थांबवले आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

"मार खायची कामं?" कोल्हापूरच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्याने स्टेजवर उडी मारली, सोनू निगमने त्याच्या हातात माईक दिला अन्...
प्रसिद्ध गायक सोनू निगम हा चाहत्यांचा आवडता गायक. अलीकडेच 'धुरंधर'मधील गाण्यांमुळे सोनू निगम चर्चेत आला. सध्या सोनू त्याच्या कोल्हापुरातील कॉन्सर्टमधील एका घटनेमुळे चर्चेत आला आहे. लाइव्ह परफॉर्मन्स सुरू असताना एका चाहत्याने अचानक स्टेजवर उडी मारून सोनूच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे सोनूने गाणे मध्येच थांबवले आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नेमकं काय घडलं?
सोनू निगम कोल्हापुरात आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना, एक चाहता सुरक्षारक्षकांना चकवून थेट स्टेजवर पोहोचला. सुरक्षा रक्षक त्या चाहत्याला स्टेजवरून खाली घेऊन जात असताना, सोनूने मध्यस्थी केली आणि त्याला परत बोलावले. त्या चाहत्यावर रागावण्याऐवजी सोनूने शांतपणे पाठीमागे वळून "वाह, शाब्बास" असं म्हटलं.
सोनूने पुढे त्या चाहत्याच्या हातात माईक देऊन त्याला गाण्याची संधीही दिली. त्या चाहत्याने सोनूचे लोकप्रिय गाणे 'चोरी किया रे जिया'ची एक ओळ गायली. चाहत्याचे गाणे ऐकून सोनूने आश्चर्य व्यक्त केले. या प्रसंगानंतर तो चाहता सोनूच्या पाया पडला आणि स्टेजवरून खाली गेला. सोनूने एकदा डोक्याला हात मारत आपला परफॉर्मन्स पुन्हा सुरू केला.
या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना सोनूने चाहत्यांना सल्ला दिला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "मार खाण्यासारखी कामं का करता मित्रांनो? यावेळेस तर मी वाचवलं, पण प्रत्येक वेळी मी वाचवू शकणार नाही." अशा मिश्किल शब्दांमध्ये लिहित सोनूने हा व्हिडीओ शेअर केला. सोनूच्या या कृतीवर चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, "केवळ तुम्हीच अशा प्रकारे परिस्थिती हाताळू शकता," तर दुसऱ्याने म्हटले, "सर, तुम्ही खूप छान वागलात आणि तो चाहता सुद्धा खरोखर छान गायला." अनेक चाहत्यांनी सोनूच्या या खिलाडूवृत्तीला सलाम केला आहे.