सलमानच्या 'एकटेपणा' पोस्टमुळे आई सलमा खानही घाबरल्या! भाईजाननं अखेर केला मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 11:05 IST2026-05-19T10:56:42+5:302026-05-19T11:05:30+5:30
सलमानची एकटेपणावर पोस्ट, आता स्पष्टीकरण देत भाईजान म्हणाला, "जेव्हा इतका मोठा परिवार..."

सलमानच्या 'एकटेपणा' पोस्टमुळे आई सलमा खानही घाबरल्या! भाईजाननं अखेर केला मोठा खुलासा!
Salman Khan Clarifies Viral Alone And Lonely Post : बॉलिवूडचा 'सुल्तान' सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्यानं एकाकीपणावर पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळं इंटरनेटवर खळबळ उडाली. सलमानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आता स्वतः सलमान खानने या संपूर्ण प्रकरणावर आपले मौन सोडले असून, या व्हायरल पोस्टमागचे नेमके सत्य काय आहे, ते स्पष्ट केले आहे.
सलमान खानने आज १९ मे रोजी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. सलमानने लिहिले, "अरे, काळजी करण्यासारखं असं कहीच नाहीये. मी त्या पोस्टमध्ये माझ्या स्वतःबद्दल बोलत नव्हतो. जेव्हा माझ्याकडे इतका मोठा, प्रेमळ परिवार आणि मित्रपरिवार आहे, तेव्हा मी एकाकी कसा असू शकेन? आणि जेव्हा तुम्ही सर्वजण तुमच्या अथांग शुभेच्छा आणि प्रार्थना घेऊन माझ्या पाठीशी उभे आहात, तेव्हा मला एकाकी वाटणे शक्यच कसे आहे? जर मी एवढं सगळं असतानाही स्वतःला एकाकी समजलं असतं, तर मी जगातील सर्वात मोठा कृतघ्न ठरलो असतो".
पुढे सलमाननं लिहलं, "कधी कधी लोकांमध्ये राहून थोडा कंटाळा येतो, म्हणून थोडा 'मी टाइम' घेतो. बस्स! यावेळी एकही फोटो नव्हता, पण तुम्ही तर त्याची ब्रेकिंग न्यूजच बनवली". सलमाननं सांगितलं की, सोशल मीडियावरील तर्कवितर्क आणि बातम्या पाहून त्याची आई सलमा खान या देखील प्रचंड अस्वस्थ आणि चिंतेत पडल्या. त्यांनी थेट सलमानला "तुला काय झालं बेटा?" असा प्रश्नही विचारला. पोस्टच्या शेवटी सलमानं आपल्या खास स्टाईलमध्ये चाहत्यांना "चिल मारा यार!" असं म्हणत काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे.
नक्की काय होती 'ती' व्हायरल पोस्ट?
काल १७ मे रोजी सलमान खानने इन्स्टाग्रामवर आपला एक 'शर्टलेस' फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये वयाच्या ६० व्या वर्षीही तो आपले ६-पॅक ॲब्स दाखवत होता. पण फोटोपेक्षाही त्याच्या 'कॅप्शन'ने सर्वांचे लक्ष वेधले. सलमानने त्या फोटोसोबत लिहलं होतं, ""मी, माझं आणि स्वतःचं आयुष्य… स्वतःसोबत राहण्याचे दोन मार्ग असतात एक म्हणजे एकटं राहणं, जे आपण स्वतःच्या इच्छेने निवडतो आणि दुसरं म्हणजे एकाकीपणा, जेव्हा कुणालाच तुमच्यासोबत राहायचं नसतं. आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्हीच ठरवा". सलमानचं कॅप्शन वाचून तो एकाकीपणाशी झगडत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, आता सलमानने स्वतः समोर येत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला असून, ती पोस्ट त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले आहे.