सैयारा विकी कौशलच्या 'छावा'चाही रेकॉर्ड मोडणार? आतापर्यंत 'इतक्या' कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 11:43 IST2025-07-27T11:37:04+5:302025-07-27T11:43:09+5:30
'सैयारा' विकी कौशलच्या 'छावा'चाही रेकॉर्ड मोडणार का?

सैयारा विकी कौशलच्या 'छावा'चाही रेकॉर्ड मोडणार? आतापर्यंत 'इतक्या' कोटींची कमाई
Saiyaara Box Office Collection: Gen Z ला भुरळ घालणारा अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा 'सैयारा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दमदार प्रेमकथा, संगीत आणि फ्रेश केमिस्ट्रीमुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'सैयारा' ची कमाई दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे आता विकी कौशलच्या ब्लॉकबस्टर 'छावा'चा रेकॉर्ड हा चित्रपट मोडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
'सैयारा' हा ९ दिवसात सर्वाधिक कमाई करणारा २०२५ या वर्षातील दुसरा चित्रपट ठरला आहे. 'सैयारा'नं 'हाऊसफुल ५', 'रेड', 'सितारे जमीन पर'सारख्या सुपरस्टार्सच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. Sacnilk ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'सैयारा'ची कमाई २१७.२५ कोटी रुपये झाली आहे. वर्ल्डवाइड या सिनेमाची कमाई ३०० कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. रविवारी २७ जुलै रोजी, 'सैयारा'च्या कमाईमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या शर्यतीत फक्त विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट 'सैयारा'च्या पुढे आहे. आता 'सैयारा'ची स्पर्धा विकी कौशलच्या 'छावा'शी आहे. 'छावा' सिनेमानं ६१५.३९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण, 'सैयारा' हा 'छावा'ला कमाईच्या बाबतीत मागे टाकण्याची शक्यात कमी आहे. कारण, येत्या १ ऑगस्ट रोजी अजय देवगण आणि मृणाल ठाकुर यांचा 'सन ऑफ सरदार २' रीलिज होणार आहे. ज्या चित्रपटामुळे 'सैयारा'चे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
'सैयारा' हा एक रोमँटिक म्युझिकल लव्हस्टोरीवर आधारित चित्रपट आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा अभिनय क्षेत्रातील पहिलाच सिनेमा आहे. पहिल्याच चित्रपटातून या दोघांनी प्रेक्षकांवर जादू केली आहे. विशेष म्हणजे वर्ल्डवाइड ३०० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या या 'सैयारा' सिनेमाचं बजेट फक्त ५० ते ६० कोटी रुपये इतके आहे.