रितेश देशमुखनं पाहिलेलं 'हे' स्वप्न, म्हणाला "माझे वडील मंत्री होते, तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:55 IST2026-04-27T14:55:22+5:302026-04-27T14:55:46+5:30
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी रितेशचे स्वप्न वेगळेच होते. नुकतंच एका मुलाखतीमध्ये रितेशने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

रितेश देशमुखनं पाहिलेलं 'हे' स्वप्न, म्हणाला "माझे वडील मंत्री होते, तर..."
अभिनेता रितेश देशमुख त्याच्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात रितेशनं दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली आहेच, पण त्यासोबतच या सिनेमात त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकासुद्धा साकारली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमानिमित्त रितेश विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच एका मुलाखतीत त्याने बालपणी इन्स्पेक्टर बनण्याची इच्छा होती, असं सांगितलं.
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी रितेशचे स्वप्न वेगळेच होते. अथर्व सुदामेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रितेशने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्याला अभिनेता किंवा आर्किटेक्ट नाही, तर पोलीस इन्स्पेक्टर व्हायची इच्छा होती, असा खुलासा त्याने केला आहे.
रितेश म्हणाला, "बालपणी मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं. मला आठवतंय मी पाचवीत होतो. माझा वाढदिवस होता. माझे वडील (विलासराव देशमुख) तेव्हा मंत्री होते. मंत्र्याच्या मुलगा इन्स्पेक्टरचे कपडे घालून केक कापत होता. मला तेव्हा असं वाटायचं आणि आताही वाटतं की, आपले खरे हिरो हे वर्दीतले पोलीस असतात. ते जेव्हा चालतात... उठतात... तेव्हा एक कडक शिस्त आणि रुबाब असतो. जे काम करतात, त्यामुळे मला खरे हिरो हे पोलीसच वाटतात. मग ते अग्निशमन दलातील पोलीस असो, आर्मीतले पोलीस असो किंवा कॉर्पोरेशनमधले पोलीस असो. आपले खरे हिरो तेच आहेत".
'राजा शिवाजी' कधी प्रदर्शित होणार?
रितेश देशमुख लिखित-दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपट तब्बल ३ तास १५ मिनिटांचा असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमध्ये शिवरायांची शौर्यगाथा अधिक सविस्तरपणे आणि भव्यदिव्य पद्धतीने पाहता येईल. हा चित्रपट १ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. 'राजा शिवाजी'मध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारखे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.