तिहार तुरुंगात असलेल्या राजपाल यादवच्या घरी सुरू आहे लग्नाची तयारी, अभिनेत्याचा भाऊ म्हणाला- "तो तुरुंगातून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:18 IST2026-02-11T18:18:10+5:302026-02-11T18:18:54+5:30
९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं. २०१० पासून सुरू असलेल्या या खटल्यात त्याला कोर्टाने शिक्षा सुनावली. एकिकडे राजपाल यादव तुरुंगात असताना दुसरीकडे त्याच्या घरी मात्र लगीनघाई सुरू आहे.

तिहार तुरुंगात असलेल्या राजपाल यादवच्या घरी सुरू आहे लग्नाची तयारी, अभिनेत्याचा भाऊ म्हणाला- "तो तुरुंगातून..."
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि चाहत्यांना विनोदाने हसवणारा राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. ९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं. २०१० पासून सुरू असलेल्या या खटल्यात त्याला कोर्टाने शिक्षा सुनावली. एकिकडे राजपाल यादव तुरुंगात असताना दुसरीकडे त्याच्या घरी मात्र लगीनघाई सुरू आहे.
राजपाल यादवचा मोठा भाऊ श्रीपाल यादव यांच्या मुलीचं लग्न आहे. त्यांच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. राजपाल यादवच्या भावाने एनडीटीव्हीशी बातचीत केली. श्रीपाल यादव म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की तो उद्या तुरुंगातून बाहेर येईल. आमच्या मुलीचं लग्न आहे आणि घरात लग्नाची तयारी सुरू आहे. आमच्या घरातील वातावरण आनंदी आहे". १९ फेब्रुवारीला राजपाल यादवच्या पुतणीचं लग्न आहे. तो लग्नासाठी नक्कीच येईल, असा विश्वास त्याच्या भावाने व्यक्त केला आहे. १२ फेब्रुवारीला या प्रकरणातील पुढील सुनावणी होणार असून राजपालला जामीन मिळेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवने अता पता लापता या सिनेमासाठी २०१० साली काही पैसे घेतले होते. १२ कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. राजपाल यादवने दिलेला ९ कोटींचा चेक बाऊन्स झाला होता. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर कोर्टाने त्याला नोटीस पाठवली होती. अखेर काही दिवसांपूर्वी राजपाल यादव तिहार जेलमध्ये पोलिसांना शरण गेला. अभिनेत्याची मदत करण्यासाठी बॉलिवूडमधील काही कलाकार पुढे सरसावले आहेत.