परशुरामांच्या भूमिकेत विकी कौशल; जयंतीनिमित्त मॅडॉक फिल्म्सने शेअर केली 'महावतार'ची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:07 IST2026-04-19T17:37:56+5:302026-04-19T19:07:01+5:30
परशुराम जयंतीचे औचित्य साधून मॅडॉक फिल्म्सनं आपल्या 'महावतार' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे.

परशुरामांच्या भूमिकेत विकी कौशल; जयंतीनिमित्त मॅडॉक फिल्म्सने शेअर केली 'महावतार'ची खास पोस्ट
आज वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला भगवान विष्णूंनी भगवान परशुराम म्हणून सहावा अवतार घेतला. त्यामुळे अक्षय्य तृतीयेसोबतच परशुराम जयंतीही साजरी केली जाते. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. महाभारत आणि विष्णुपुराणानुसार, परशुरामचे मूळ नाव राम होते, परंतु भगवान शंकराने त्यांना परशु नावाचे स्वतःचे शस्त्र दिले तेव्हा त्याचे नाव परशुराम झाले. परशुराम जयंती निमित्त मॅडॉक फिल्म्सनं (Maddock Films) खास पोस्ट शेअर केली आहे.
मॅडॉक फिल्म्स 'महावतार' हा हिंदी पौराणिक चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल 'परशुराम' यांची भूमिका साकारणार आहे. मॅडॉक फिल्म्सनं 'महावतार' चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहलं, "धर्माच्या रक्षणासाठी कधी-कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. हाच 'भगवान परशुराम' यांचा संदेश आहे. या परशुराम जयंतीनिमित्त, भयापलीकडे जाऊन सत्यासाठी उभे राहणाऱ्या त्या पराक्रमी योद्ध्याला आपण वंदन करत आहोत", असं लिहलं. या पोस्टने चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
विकी कौशल हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर, आता तो भगवान परशुरामांच्या भूमिकेत पडद्यावर कसा दिसणार, याची चाहत्यांना मोठी प्रतीक्षा आहे. हा सिनेमा येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.