संजय कपूरच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद, करिश्मा कपूरला किती वाटा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:08 IST2025-07-28T14:08:19+5:302025-07-28T14:08:37+5:30
एक्स पती संजयच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीमध्ये करिश्मा कपूरचा हिस्सा किती?

संजय कपूरच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद, करिश्मा कपूरला किती वाटा मिळणार?
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण, यावेळी कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर माजी पती संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू झालेल्या वादामुळे. संजय कपूर यांचं १२ जून २०२५ रोजी निधन झालं होतं. संजय यांना लंडनमध्ये पोलो खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला. १९ जून रोजी दक्षिण दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत संजय कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू पश्चात संजय कपूर यांनी तब्बल ३० हजार कोटींची संपत्ती मागे सोडली आहे.
संजय कपूर यांचं पहिले लग्न १९९६ साली फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट नंदिता महतानीशी झालं होतं. चारच वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००३ साली संजय कूपर यांचा विवाह अभिनेत्री करिश्मा कपूरशी झाला. पण, त्यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. करिश्माने संजय आणि त्यांच्या आईवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्याचबरोबर, संजय यांनी करिश्मावर पैशासाठी लग्न केल्याचा आरोप केला होता. २०१६ साली करिश्माशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी २०१७ साली प्रिया सचदेवशी लग्नगाठ बांधली होती. संजय यांना एकूण तीन मुले आहेत. दुसरी पत्नी करिश्मा कपूरकडून समायरा (२०) आणि किआन (१४) अशी दोन मुले आहेत. तर तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्याकडून अझारियास हा ६ वर्षांचा मुलगा आहे.
दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, करिश्मा कपूरने एक्स पती संजयच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीतून तिचा हिस्सा मागितल्याची माहिती समोर आली आहे. पण, अद्याप करिश्मा किंवा तिच्या वकिलांकडून अजून कोणतंही अधिकृत विधान दिलं गेलेलं नसलं, तरी आतल्या वर्तुळात चर्चा आहे की ती आपल्या मुलांसाठी कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी पुढाकार घेऊ शकते. या संपत्तीविवादात संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांनीही उडी घेतलेली आहे. त्यांचा दावा आहे की, सोना ग्रुपमध्ये सर्वाधिक हिस्सा त्यांचा असून, त्या मुख्य वारसदार आहेत. एवढंच नव्हे तर काही जणांनी मुलाच्या मृत्यूच्या शोकात तिला काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
करिश्मला हिस्सा मिळू शकतो का?
२०१६ मध्ये झालेल्या घटस्फोटावेळी करिश्माला १४ कोटींचे बाँड्स, एक मुंबईतील फ्लॅट आणि मुलांसाठी दरवर्षी १० लाखांची आर्थिक मदत मिळणार असल्याचे कोर्टाच्या आदेशानुसार ठरवण्यात आले होते. त्यामुळे घटस्फोटाच्या वेळेस मोठं सेटलमेंट आधीच झालं होतं. घटस्फोट झाल्यानंतर, माजी पत्नीला नवऱ्याच्या नंतर मिळणाऱ्या वारशावर हक्क नसतो. मात्र, मुलं अल्पवयीन असतील किंवा आधीच्या सेटलमेंटमध्ये अटी स्पष्ट नसतील, तर काही वेळा कोर्ट त्यावर पुन्हा सुनावणी करतं.