मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 09:07 IST2026-05-05T09:07:25+5:302026-05-05T09:07:46+5:30
मनीष मल्होत्राने केंल आउटफिट डिझाईन, या प्रसिद्ध पेंटरला दिलं ट्रिब्यूट

मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
मेट गाला २०२६ च्या रेड कार्पेटवर अनेक तारे तारकांनी आपला जलवा दाखवला. यावर्षी हिंदीतील प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहरनेमेट गालामध्ये पदार्पण केलं. करणचा हटके लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनीष मल्होत्राने हा आउटफिट डिझाईन केला. यावर्षी मेट गालामध्ये 'फॅशन आर्ट' ही थीम होती. नेटकऱ्यांनी करण जोहरच्या लूकला पसंती दर्शवली आहे.
करण जोहरने परिधान केलेला आउटफिट प्रसिद्ध भारतीय पेंटर राजा रवि वर्मा यांच्या पेंटिंग्सवरुन प्रेरित होता. यामध्ये भारतीय पारंपरिकतेला मॉडर्न आणि स्ट्रक्चर्ड पद्धतीने दाखवण्यात आलं. यासोबत करणने एक ड्रॅमॅटिक कॅप घेतली होती ज्यावर हाताने गोल्ड पेंटिंग केलेलं आहे. या कॅपमध्ये राजा रवि वर्मा यांच्या गाजलेल्या पेंटिंग्स जसे की दमयंती, कदंबरी, अर्जुन आणि सुभद्राचे सार आहे. यामुळे त्याच्या लूकमध्ये खोलवर भारतीय संस्कृतीचा प्रेझेन्स जाणवला. मनीष मल्होत्राने आपल्या शानदार व्हिजन मधून भारतीय चित्रकलेचे जनक राजा रवि वर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.
करण जोहरच्या या लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या. जणू एखादी पेटिंगच समोर आली आहे. करणने त्याच्या पदार्पणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. तो लिहितो, "राजा रवि वर्मा यांच्या कलेतून प्रेरित हा माझा लूक. त्यांच्या कलेने ते करुन दाखवलं जे मी माझ्या सिनेमातून नेहमीच करण्याचा प्रयत्न करतो. ते एखादी भावनाच जणू रेखाटायचे. हे करण्यासाठी माझा सर्वात जुना पार्टनर इन क्राइम मनीष मल्होत्राशिवाय दुसरा कोणी मनात येऊच शकत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीला ग्लोबल स्तरावर हाय एँड फॅशनसह घेऊन जाणं ही एक कलाच आहे. तुम्ही या कलेसाठी मला एका कॅनव्हास असल्याचं दर्शवलंत त्यासाठी खूप आभार."
करण जोहरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. फराह खान, रसिका दुग्गल, बी प्राक, यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. तसंच चाहत्यांनीही त्याच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.