जॅकी श्रॉफ यांनी घेतले स्वामी चिदानंद सरस्वतींचे आशीर्वाद; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:34 IST2026-05-19T17:33:08+5:302026-05-19T17:34:15+5:30
जॅकी श्रॉफ यांनी ऋषिकेशमध्ये स्वामी चिदानंद सरस्वती यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.

जॅकी श्रॉफ यांनी घेतले स्वामी चिदानंद सरस्वतींचे आशीर्वाद; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
बॉलिवूडचे लाडके 'जग्गु दादा' म्हणजेच अभिनेते जॅकी श्रॉफ त्यांच्या हटके स्टाईलसाठी आणि साधेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच इन्स्टाग्राम हँडलवर एक अत्यंत सुंदर आध्यात्मिक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ हे ऋषिकेश येथील प्रसिद्ध 'परमार्थ निकेतन आश्रमा'चे प्रमुख स्वामी चिदानंद सरस्वती यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ क्लिपमध्ये, स्वामी चिदानंद सरस्वती हे जॅकी श्रॉफ यांच्या कपाळावर पवित्र टिळा (गंध) लावताना दिसत आहेत. त्यानंतर जॅकी श्रॉफ स्वामीजींच्या चरणांना स्पर्श करतात. यानंतर दोघे एकमेकांना अत्यंत प्रेमाने मिठी मारतात. जॅकी श्रॉफ यांचा हा साधेपणा आणि आदर पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
स्वामी चिदानंद सरस्वती कोण आहेत?
स्वामी चिदानंद सरस्वती हे ऋषिकेश येथील भारतातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक संस्थांपैकी एक असलेल्या 'परमार्थ निकेतन आश्रमा'चे प्रमुख आहेत. यासोबतच ते अमेरिकेतील पिट्सबर्ग येथील प्रसिद्ध 'हिंदू जैन मंदिरा'चे संस्थापक आणि मार्गदर्शक म्हणूनही जगभरात कार्य पाहतात.
जॅकी श्रॉफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते लवकरच प्रेक्षकांना हसवायला येणार आहेत. दिग्दर्शक अहमद खान यांच्या 'वेलकम टू द जंगल' (Welcome To The Jungle) या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी आणि रवीना टंडन यांच्यासह बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट एकत्र पाहता येणार आहे.