इम्तियाज अलीच्या 'मै वापस आऊँगा'चा ट्रेलर रिलीज, डोळ्यात पाणी आणेल अशी प्रेमकथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:26 IST2026-05-19T15:15:23+5:302026-05-19T15:26:30+5:30
दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह, वेदांग रैना आणि शर्वरी वाघ यांचा 'मै वापस आऊँगा' सिनेमा कधी प्रदर्शित होतोय?

इम्तियाज अलीच्या 'मै वापस आऊँगा'चा ट्रेलर रिलीज, डोळ्यात पाणी आणेल अशी प्रेमकथा
दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या सिनेमांचं वेगळंच वैशिष्ट्य असतं. 'जब वी मेट','तमाशा','लव्ह आज कल','रॉकस्टार' या सिनेमांमधून इम्तियाजचे सिनेमे का हटके असतात हे लक्षात येतं. आता त्याच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे. 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच पार पडला. या चित्रपटात अभिनेता दिलजीत दोसांझ, दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह, वेदांग रैना आणि अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असून ट्रेलर पाहूनच कलाकारांचा अभिनय आणि कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
'मैं वापस आऊंगा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना एका भावनिक प्रवासावर घेऊन जातो, ज्याची सुरुवात भारताच्या फाळणीच्या वेळच्या वेदनादायी आठवणींनी होते. चित्रपटात नसीरुद्दीन शाह हे गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रेमाचे दुःख मनात घेऊन जगताना दिसत आहेत, तर दिलजीत दोसांझ हा त्यांना त्यांच्या प्रेमापर्यंत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतो. दुसरीकडे, वेदांग रैना आणि शर्वरी वाघ यांच्यातील फ्रेश केमिस्ट्री त्या काळातील प्रेमकथा पडद्यावर मांडताना दिसत आहे. जुन्या काळातील रोमान्स आणि आधुनिक भावनांचा हा एक उत्तम मिलाप आहे.
या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडची एव्हरग्रीन संगीतकार-गीतकार जोडी, म्हणजेच ए. आर. रहमान, इरशाद कामिल आणि दिग्दर्शक इम्तियाज अली हे त्रिकूट या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहे. त्यामुळे चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत मनाला भावणारे असेल यात शंका नाही. ट्रेलरमध्ये दाखवलेले रेल्वेचे सीन्स, जुनी पत्रे, काव्यात्मक संवाद आणि भावुक करणारे सीन्स प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण करत असून, हा चित्रपट पिढ्यान् पिढ्या टिकून राहणाऱ्या नात्यांवर प्रकाश टाकणारा आहे.
ट्रेलर लाँच प्रसंगी बोलताना इम्तियाज अली म्हणाले की, 'मैं वापस आऊंगा' ही प्रेम आणि विरहाची कथा आहे, जी देश स्वतंत्र होऊन आणि फाळणी होऊन ७८ वर्षे झाली तरीही कोणाच्या तरी हृदयात जिवंत आहे. फाळणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या पिढीकडून मी ऐकलेल्या शेकडो कथांचा हा एक अंश आहे."
बिर्ला स्टुडिओ, अप्लॉज एंटरटेनमेंट आणि विंडो सीट फिल्म्स निर्मित हा भव्य चित्रपट येत्या १२ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार असून याचे संगीत 'टिप्स म्युझिक'कडे आहे.