Ek Din Trailer: एकतर्फी प्रेम आणि अपघात! साई पल्लवीचा पहिला हिंदी सिनेमा 'एक दिन'चा रोमँटिक ट्रेलर बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:52 IST2026-04-16T16:48:43+5:302026-04-16T16:52:24+5:30
आमिर खान प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक दिन’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांसमोर एक सुंदर, मनाला भिडणारी प्रेमकथा घेऊन येणार आहे. साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत झळकत आहे

Ek Din Trailer: एकतर्फी प्रेम आणि अपघात! साई पल्लवीचा पहिला हिंदी सिनेमा 'एक दिन'चा रोमँटिक ट्रेलर बघाच
आमिर खान प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक दिन’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांसमोर एक सुंदर, मनाला भिडणारी प्रेमकथा घेऊन येणार आहे. साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत झळकत असून, या चित्रपटाची उत्सुकता आधीपासूनच शिगेला पोहोचली आहे. गाण्यांमधून आधीच एक रोमँटिक वातावरण निर्माण केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘एक दिन’चा ट्रेलर अखेर प्रेक्षकांसमोर आला असून, तो एका जादुई प्रेमकथेची झलक दाखवतो. जुनैद खानने एका लाजाळू आणि थोड्या वेगळ्या स्वभावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे, ज्याला साई पल्लवीवर मनापासून प्रेम आहे. साई ही कायम आनंदात असलेली एक बिनधास्त मुलगी आहे. दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत असले तरी जुनैद तिला आपली भावना व्यक्त करू शकत नाही.
कथेत मोठं वळण तेव्हा येतं, जेव्हा जपानमध्ये साईचा अपघात होतो आणि ती ‘स्मृतिभ्रंश’ या आजाराची शिकार होते. या अवस्थेत तिला फक्त जुनैदच आठवत राहतो, कारण त्यानेच तिचे प्राण वाचवलेले असतात. या वळणामुळे कथा अधिक रंजक बनते आणि पुढे ही प्रेमकथा कोणत्या दिशेने जाते, हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.
ट्रेलर पाहिल्यानंतर एक कोमल, हळुवार आणि हृदयाला भिडणारी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे स्पष्ट झालं आहे. ही कथा प्रेमावर विश्वास ठेवण्याची, मनात आशा जपण्याची आणि आयुष्यातील जादूची वाट पाहण्याची आहे. खूप दिवसांनी अशी वेगळी आणि भावनिक कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
आमिर खान आणि मन्सूर खान हे दोघे या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. या जोडीने यापूर्वी कयामत से कयामत तक, जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जाने तू... या जाने ना यांसारखे संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. ‘एक दिन’मुळे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेमकथेच्या रुपात एकत्र येत आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून ‘एक दिन’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.