सासरे-जावई एकत्र! 'धुरंधर: द रिव्हेंज'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला रणवीर सिंह-प्रकाश पादुकोण यांनी मारला टोला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:25 IST2026-04-14T14:24:22+5:302026-04-14T14:25:43+5:30
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा १९ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

सासरे-जावई एकत्र! 'धुरंधर: द रिव्हेंज'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला रणवीर सिंह-प्रकाश पादुकोण यांनी मारला टोला?
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा १९ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटानं जगभरात धुमाकूळ घातला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सुसाट धावत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. एकिकडे चित्रपटाचं कौतुक होत असताना युट्युबर ध्रुव राठीने 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाला 'प्रोपगंडा' म्हणत टीका केली. यावर आता रणवीर सिंहचे सासरे प्रसिद्ध माजी भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांनी ध्रुव राठीला प्रत्युत्तर दिले आहे.
नुकतीच रणवीर सिंह आणि प्रकाश पादुकोण यांची एका UPI पेमेंट ॲपची जाहिरात प्रदर्शित झाली. सासरे-जावई पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसल्याने चाहत्यांमध्ये उत्साह होताच, पण नेटकऱ्यांच्या नजरेने या जाहिरातीतील एक 'पीक डिटेलिंग' पकडलं. जाहिरातीत रणवीरच्या मागे भिंतीवर 'भवांडर' (Bhavandar) नावाच्या चित्रपटाचे पोस्टर दिसत आहे.
विशेष म्हणजे, जेव्हा ध्रुव राठीने 'धुरंधर' चित्रपटावर टीका केली होती, तेव्हा त्याने या चित्रपटाला उपहासाने 'भवांडर' असे नाव दिले होते. जाहिरातीत नेमका तोच संदर्भ वापरून रणवीर आणि प्रकाश पदुकोण यांनी ध्रुव राठीच्या टिकेची एक प्रकारे खिल्ली उडवल्याची चर्चा रंगली आहे. कोणत्याही शब्दांशिवाय केवळ एका पोस्टरच्या माध्यमातून दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे सोशल मीडियावर ध्रुव राठीला जोरदार ट्रोल केले जात आहे.
'धुरंधर: द रिव्हेंज'चा ऐतिहासिक पराक्रम
एकीकडे ध्रुव राठीने या चित्रपटाला 'प्रोपागांडा' म्हटले असले, तरी 'धुरंधर: द रिव्हेंज'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर चक्क १ हजार कोटींचा आकडा पार करून इतिहास घडवला. इतकेच नाही तर, जागतिक स्तरावर या चित्रपटाने १,७०० कोटींहून अधिक कमाई करत हिंदी सिनेसृष्टीतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.