"दिग्दर्शकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला...", डेझी शाहला आलेला 'तो' धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 14:09 IST2026-04-16T14:08:39+5:302026-04-16T14:09:09+5:30
डेझी शाहला बसलेला मानसिक धक्का, काय म्हणाली अभिनेत्री?

"दिग्दर्शकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला...", डेझी शाहला आलेला 'तो' धक्कादायक अनुभव
बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर डेझी शाहने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा अनुभव सांगितला. साउथ फिल्म इंडस्ट्रीतील एका दिग्दर्शकाने कास्टिंग मीटिंग वेळी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा खळबळजनक खुलासा तिने केला आहे.
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत डेझी शाह म्हणाली, "ही घटना मुंबईत घडली होती. एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या ऑडिशनसाठी काही मुलींसोबत मी एका दिग्दर्शकाला भेटायला गेले होते. तो दिग्दर्शक प्रत्येक मुलीला वैयक्तिकरित्या भेटत होता. त्या दिग्दर्शकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि माझा हात धरला, जे मला मुळीच आवडले नाही. मला कोणाचाही स्पर्श झालेला आवडत नाही, मग ती स्त्री असो वा पुरुष. या वागण्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झाले आणि पुन्हा कधीही त्याच्याशी संपर्क साधला नाही,"
या कटू अनुभवामुळे डेझीला वैयक्तिक सुरक्षिततेबद्दल एक मोठा धडा मिळाला. तिने सांगितले की, अशा घटनांमुळे तिला समजले की नवीन कामासाठी कोणालाही भेटायला जाताना कधीही एकटे जाऊ नये. करिअरच्या सुरुवातीला अशा प्रसंगांना सामोरे गेल्यामुळे आपण अधिक सतर्क झालो, असेही तिने नमूद केले. स्वतःची सुरक्षा स्वतःच्याच हातात आहे, हे या प्रसंगाने तिला शिकवले.
याच मुलाखतीत डेझीने सलमान खानच्या नावावरून होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिले. "लोक असे मानतात की माझ्या करिअरमागे फक्त सलमान खानचा हात आहे. आज जर एखादी महिला यशस्वी होत असेल, तर लोक तिला कोणीतरी पाठिंबा दिला असेल असेच म्हणतात. सलमानने मला मदत केली यात काहीच चुकीचे नाही, पण लोक माझ्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आता या गोष्टींचा मला फारसा फरक पडत नाही," असे परखड मत तिने व्यक्त केले.