"रणबीरपेक्षाही भारी अभिनय...", रिद्धिमा कपूरचा पदार्पणातील सिनेमा पाहून आमिर खानची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:22 IST2026-05-07T15:21:55+5:302026-05-07T15:22:31+5:30
'दादी की शादी' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाला आमिर खान?

"रणबीरपेक्षाही भारी अभिनय...", रिद्धिमा कपूरचा पदार्पणातील सिनेमा पाहून आमिर खानची प्रतिक्रिया
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानने नुकतीच नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांच्या 'दादी की शादी' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली. हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी प्रदर्शित होत असून या स्क्रीनिंगला अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या चित्रपटात आमिरची बहीण निखत खान हीदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमा पाहिल्यानंतर आमिर खानने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर आमिर खानने माध्यमांशी संवाद साधताना रिद्धिमा कपूरच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले. आमिर गंमतीने म्हणाला की, "रिद्धिमाचा हा पहिलाच चित्रपट आहे, पण तिने खूप छान काम केले आहे. खरं तर तिने तिचा भाऊ रणबीर कपूरपेक्षाही चांगला अभिनय केला आहे." आमिरच्या या विधानानंतर सोशल मीडियावर रिद्धिमाच्या पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
रिद्धिमा कपूर ही करिश्मा कपूर आणि करीना कपूरनंतर कपूर खानदानातील सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी तिसरी मुलगी ठरली आहे. विशेष म्हणजे करिश्मा आणि करीनाने अगदी लहान वयात करिअरला सुरुवात केली होती, तर रिद्धिमा वयाच्या ४५ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. रिद्धिमाच्या या धाडसी निर्णयाचे सध्या चित्रपटसृष्टीतून स्वागत केले जात आहे.
या चित्रपटातील रिद्धिमाच्या निवडीबद्दल नीतू कपूर यांनी एक रंजक किस्सा सांगितला. जेव्हा निर्मात्यांनी रिद्धिमाच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तेव्हा नीतू कपूर आधी जोरात हसल्या होत्या आणि त्यांनी नकार दिला होता. मात्र, जेव्हा त्यांनी रिद्धिमाला विचारले, तेव्हा तिनेही सुरुवातीला हसण्यावारी नेले पण नंतर या भूमिकेसाठी होकार दिला. आशिष आर. मोहन दिग्दर्शित हा फॅमिली ड्रामा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सज्ज झाला आहे.