IPL मध्ये आजवर टीम का खरेदी केली नाही? अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला- "माझ्या बजेटच्या बाहेर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:16 IST2026-04-14T13:09:02+5:302026-04-14T13:16:31+5:30
प्रो कबड्डीमध्ये 'जयपूर पिंक पँथर्स' आणि फुटबॉलमध्ये 'चेन्नईयिन FC' सारख्या यशस्वी संघांचा मालक असूनही अभिषेकचे IPL सारख्या मोठ्या स्पर्धेपासून दूर राहणे अनेकांसाठी आश्चर्यकारक होते.

IPL मध्ये आजवर टीम का खरेदी केली नाही? अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला- "माझ्या बजेटच्या बाहेर..."
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयपीएल (IPL) टीम का खरेदी केली नाही, यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. प्रो कबड्डीमध्ये 'जयपूर पिंक पँथर्स' आणि फुटबॉलमध्ये 'चेन्नईयिन FC' सारख्या यशस्वी संघांचा मालक असूनही अभिषेकचे IPL सारख्या मोठ्या स्पर्धेपासून दूर राहणे अनेकांसाठी आश्चर्यकारक होते.
बजेटच्या बाहेर होती गुंतवणूक
फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने सांगितले की, जेव्हा २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाली, तेव्हा तो चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख मिळवत होता. अभिषेक म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, जेव्हा आयपीएल सुरू झाले, तेव्हा टीम घेणं मला परवडणारं नव्हतं. मी त्यावेळी एक उदयोन्मुख अभिनेता होतो. माझे चित्रपट चांगले चालत होते आणि मी पैसेही कमावत होतो, पण आयपीएल टीम खरेदी करणे माझ्या बजेटच्या बाहेर होते."
केवळ प्रेक्षकांत बसून हात दाखवणारा मी नाही
अभिषेकने केवळ आर्थिक कारणांमुळेच नव्हे, तर त्याच्या स्वभावामुळेही आयपीएलपासून दूर राहणे पसंत केले. तो म्हणाला, "मी असा व्यक्ती नाही जो फक्त स्टँड्समध्ये बसून प्रेक्षकांना हात दाखवेल. मला खेळाच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायला आवडते. मी माझ्या कबड्डी आणि फुटबॉल टीमच्या खेळाडूंसोबत राहतो, त्यांच्या जेवणाचे नियोजन करतो आणि त्यांच्या ट्रेनिंगमध्येही प्रत्यक्ष लक्ष देतो. IPL च्या सुविधा बीसीसीआय (BCCI) इतक्या चांगल्या प्रकारे हाताळतं की, तिथे मला माझं काय योगदान असेल, हे समजलं नाही."
अभिषेकने जरी सुरुवातीला आयपीएलमध्ये गुंतवणूक केली नसली, तरी त्याने 'कधीच नाही' असे म्हटलेले नाही. "भविष्यात काहीही होऊ शकते," असे म्हणत त्याने क्रिकेटमध्ये अजूनही टीम विकत घेण्यात रस असल्याची इच्छा दर्शवली. दरम्यान, अभिषेकने युरोपमधील टी-२० लीगमध्ये (ETPL) गुंतवणूक केली असून तो तिथे सहभाग घेत आहे. चित्रपटसृष्टीतील शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि जुही चावला यांसारख्या कलाकारांनी आयपीएलमध्ये मोठी गुंतवणूक केली असली तरी, अभिषेकने मात्र आपल्या आवडीच्या आणि जिथे तो स्वतः योगदान देऊ शकेल अशा खेळांना प्राधान्य दिले आहे.