रशियात घटस्फोटावर एक दिवसाची बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 14:23 IST
उत्तर-पश्चिम रशियातील एका भागात आठ जुलै रोजी घटस्फोट बंदी घोषित करण्यात आली.
रशियात घटस्फोटावर एक दिवसाची बंदी
सात जन्म सुख-दु:खात सोबत राहण्याचे वचन देऊन लग्नबंधनात अडकलेली अनेक जोडपी ‘तुझ-माझं जमेना’ म्हणून मोठ्या प्रमाणावर घटस्फोट घेत आहेत. कुटुंबपद्धतीची ही विस्कळलेली घडी पुन्हा बसविण्याच्या उद्देशाने उत्तर-पश्चिम रशियातील एका भागात आठ जुलै रोजी घटस्फोट बंदी घोषित करण्यात आली.नोव्हगोरॉद प्रांतामध्ये शुक्रवारी ‘पिटर अँड फेव्रोनिया डे’ साजरा करण्यात आला. त्यांचा तो एका प्रकारे ‘व्हॅलेंटाईन डे’ आहे. कु टुंब, प्रेम आणि एकमेकांप्रती असणाऱ्या जिव्हाळ्याचा तो दिवस आहे. म्हणून या एका दिवशी घटस्फोटासाठी अर्ज करण्यावर बंदी घालण्यात आली होती.संत पीटर आणि फेव्रोनिया हे लग्नाचे पुरस्कर्ते होते. २००८ पासून अधिकृतरित्या हा दिवस सुटी म्हणून घोषित करण्यात आला. या वर्षी जंगी स्वरूपात साजरा करण्यासाठी विविध तीनशे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. २५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून विवाहित जोडप्यांना त्यांच्या अखंड प्रेमासाठी आणि चार ते सात मुलांचा सांभाळ करणाºया पती-पत्नींचा ‘कुटुंबाप्रती असणारी जबाबदारी निष्ठेने पूर्ण केली’ म्हणून पदक देऊन सन्मान करण्यात आला.या दिवशी लग्न करणे या प्रातांत भाग्याचे मानले जाते. जे लोक ‘पिटर अँड फेव्रोनिया डे’च्या दिवशी लग्न करतात त्यांचे लग्न टिकते असा या लोकांची धारणा आहे. विशेष म्हणजे आठ जुलै रोजी लग्न झालेल्या जोडप्यांपैकी २००८ पासून केवळ १२ टक्के जोडप्यांचाच घटस्फोट झाला.