नवरात्र- स्त्री शक्तीचा जागर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 18:10 IST
एकंदरीत नवरात्रीचे महत्त्व म्हणजेच स्त्री शक्तीचा जागर चित्रपटातही दाखविण्यात आला आहे.
नवरात्र- स्त्री शक्तीचा जागर !
नवरात्रीच्या उत्सवात सर्वत्र गरबा आणि दांडियाची धमाल असते. संपूर्ण देशात लोक पारंपरिक वेशभूषेत या विशेष नृत्य शैलीचा मनसोक्त आनंद घेतात. विशेषत: बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्येही नवरात्रीच्या धुनवर बरीच गाणे चित्रित केले आहेत. ३७ वर्षापूर्वीचा चित्रपट ‘सुहाग’ मध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘माता शेरेवाली....’ हे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहे. एकंदरीत नवरात्रीचे महत्त्व म्हणजेच स्त्री शक्तीचा जागर चित्रपटातही दाखविण्यात आला आहे. भारतातील काही विद्वानांनीही म्हटले होते की, कोणत्याही देशाची किंवा समाजाची किंवा देशाची प्रगती मोजायची असेल, तर प्रथम त्या देशातील किंवा समाजातील स्त्रियांची प्रगती मोजावी लागेल. म्हणजेच स्त्रियांची जर प्रगती झाली तरच देशाची किंवा समाजाची प्रगती होते. गेले सतरा वर्ष नौकरीच्या निमित्ताने ग्रामीण- शहरी, शिक्षित-अशिक्षित अशा समाजातील विविध स्तरातील महिलांच्या प्रगतीचा अनुभव मी घेत आहे. स्त्रीयांच्या प्रगतीसाठी महत्वाचा घटक म्हणजे स्त्रीशिक्षण. क्रांतिज्योती सावित्रीबाई नी लावलेले हे स्त्रीशिक्षणाचे बीज समाजात वाटवृक्षासारखे बहरले व स्त्रियांच्या प्रगतीला गती प्राप्त झाली. या सोबतच सरकारने वेळोवेळी राबविलेले महिला धोरण, सबलीकरण कार्यक्रम, विविध योजना व कायद्याचीही महत्वाची भूमिका आहे. परिणाम स्वरूप आज सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे, ज्याचा प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे.याचा अर्थ स्त्रियांच्या समस्या संपल्या असं आपण म्हणू शकणार नाही. अजूनही स्त्रियांपुढे काही गंभीर समस्या आहेतच. पण शिक्षण या जादूच्या कांडीने सोडविली जाणार नाही अशी एकही समस्या नाही. पण त्यासोबतच आवश्यक आहे स्त्रीकडे बघण्याचा समाजातील लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची. विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष हे समाजरूपी पक्षाचे दोन पंख आहेत आणि हे दोनही पंख जोपर्यंत सारख्या क्षमतेचे असणार नाही तोपर्यंत समाजरूपी पक्षी भरारी घेऊ शकणार नाही. त्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने मला एकच सांगावस वाटत की स्त्रीला देण्यासाठी सर्वात मोलाची भेट म्हणजे तिचा सन्मान, आणि हा सन्मान जर प्रत्येक स्तरातील स्त्रीला दिला गेला तर तिचे मानवी हक्क तिला अनुभवता येईल अशी समाजव्यवस्था निर्माण होईल आणि हाच खरा स्रीशक्तीचा जागर असेल. -सारिका डफरे शिक्षणाधिकारी द. ठे. राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार प्रादेशिक संचलनालाय, नाशिक