- सारिका पूरकर=गुजराथीहॉल सजवण्यामध्ये लॅम्पशेडसला इतकं महत्त्वं आलं आहे की शहरात लॅम्पशेडची अनेक दुकानं दिसतात. दुकानातले नाजूक किंवा भव्य लॅम्पशेडस पाहताक्षणी मनात भरतात. मात्र घ्यायची इच्छा असेल तर बजेटचाही विचार करावा लागतो. लॅम्पशेडस ही काही स्वस्तात येणारी वस्तू नाही. लॅम्पशेडस घ्यायची इच्छा असेल तर मग खिशालाही झळ सोसावीच लागते. आणि जर लॅम्पशेडस हे नाजूक-साजूक असतील तर मग फुटण्याचीही भीती वाटते. पण म्हणून लॅम्पशेडस वापरायचेच नाहीत असं काही नाही. लॅम्पशेडसची आवड असेल पण जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर मग आपण घरीच लॅम्पशेडस बनवू शकतो.
आपल्या हातानं लॅम्पशेड बनवण्यासाठी
* तुम्ही बाजारातून किंचित मोठ्या आकाराचे कागदी कप (यूज अॅण्ड थ्रो) आणि कागदी पेपर प्लेट्स (मध्यम आकाराच्या, चंदेरी नकोत) आणा. जोडीला कात्री, डिंक, जाड कार्डशीट, रंग, ब्रश असं साहित्य जमवा. आणि लागा कामाला...* पेपर प्लेटच्या मध्यभागाच्या उजवीकडे आणि डावीकडे अर्धा सेंमी जागा सोडून प्लेटच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत रेषा आखून घ्या.* आता, घडीच्या मधला जो भाग आहे ( १ सेंमीचा) त्यावर आपल्याला पेपर प्लेटला थोडं कापायचं आहे. पेपर प्लेटला दोन्ही बाजूनं, वरच्या बाजूनं आतल्या बाजूपर्यंत मध्याच्या वर कापून घ्या, कापताना फक्त १ सेंमीची पट्टीच कापायची आहे, आजूबाजूची पेपर प्लेट नाही. * दोन्ही बाजूनं पेपर प्लेट कापून घेतली की दोन्ही बाजूनं या रेषांवर पेपर प्लेटला हलकीच घडी मारुन घ्या. अशा रितीने सुमारे २०-२२ पेपर प्लेट्स तयार करुन घ्या. * जाड कार्डशीट घेऊन पेपर प्लेटची उंची मोजून त्यापेक्षा दोन सेंमी जास्त उंचीचा आणि ३० सेंमी लांब कार्डशीट कापून घ्या. घरात मिनरल वॉटरची एखादी जुनी बाटली असेल तर तिचा तळ (सुमारे ५ सेंमी उंचीचा) आई किंवा बाबांकडून कात्रीनं कापून घ्या. या तळाभोवती कार्डशीटची गुंडाळी करुन टोकं चिकटवून घ्या. यामुळे लॅम्पमध्ये बल्ब सोडण्यासाठी बेस तयार होईल. * या कार्डशीटभोवती घडी घातलेल्या पेपर प्लेट्स जी १ सेंमी जागा सोडली आहे त्यावर डिंक लावून चिकटवा. सर्व पेपर प्लेट्स एकमेकांच्या जवळजवळ चिकटवा. * प्लॅस्टिक बाटलीच्या तळाला मध्यभागी भोक करुन त्यातून आत बल्ब सोडा आणि बघा तुमचा हा लॅम्प किती छान दिसेल तो!