लाईफ इन अ बॉम्बसूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 10:40 IST
जनतेच्या वेदना आणि गरजा देशाच्या सरकार समोर मांडण्याच्या हेतूने हुसैन आदिल या अवलिया कलाकाराने अजबच मार्ग शोधून काढला आहे.
लाईफ इन अ बॉम्बसूट
मागच्या दोन दशकांपासून इराक धगधगतयं. कधी युद्ध, कधी आत्मघाती हल्ले, कारबॉम्ब, मानवी बॉम्ब असा सगळा हिंसाचार तेथे सर्वत्र चालू आहे. याचे सर्वाधिक परिणाम भोगावे लागतेय तिथल्या निष्पाप जनतेला.या जनतेच्या वेदना आणि गरजा देशाच्या सरकार समोर मांडण्याच्या हेतूने हुसैन आदिल या अवलिया कलाकाराने अजबच मार्ग शोधून काढला आहे.एके दिवशी तो असाच घराबाहेर पडला. बगदाद स्ट्रीटवरच्या एका कॅफेत निवांत कॉफी पित शांत बसलेला होता. मात्र, रस्त्यावरील सर्व लोकांचे डोळे त्यांच्याकडे रोखलेले होते. लोक त्याच्याभोवती जमा होऊ लागले. असे काय होते त्याच्याकडे? हा पठ्ठा बॉम्बनाशक सूट (बॉम्बसूट) घालून वावरत होता. पण तो काही बॉम्बनाशक पथकातील सदस्य नव्हता ना त्यादिवशी बॉम्ब आढळल्याची बातमी होती. मग त्याने बॉम्बसूट का घातलेला होता?तर गोष्ट अशी आहे की, आदिल हा इराकमधील नवविचारांचा कलाकार आहे. देशातील हिंसाचाराकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्याने असा नकली बॉम्बसूट तयार केला. तो म्हणतो, ‘इराकमध्ये बॉम्बस्फोटाचा दर खूप जास्त आहे. त्या तुलनेत आमच्याकडे खूप कमी बॉम्बसूट आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी मी ही बॉम्बसूटची प्रतिकृती बनविली आहे.’ वीस वर्षीय आदिल हा नव्या पिढीतील कलाकार असून सृजनशीलतेने कलेच्या माध्यमातून देशाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम तो करतो. मागच्या वर्षी त्याचा मित्र आणि पत्रकार अमर अल शहाबादेरचा कारबॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. त्यातून आदिलला या मॉक बॉम्बसूटची कल्पना सूचली.