घरच्यापेक्षा हॉटेलचे जेवण वाटतेय प्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 18:58 IST
एका सर्व्हेनुसार अमेरिकतेमध्ये लोक किराणा सामानापेक्षा हॉटेलमधील जेवणावर अधिक पैसे खर्च करीत आहेत.
घरच्यापेक्षा हॉटेलचे जेवण वाटतेय प्रिय
असं म्हणतात की, कितीही मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण केले तरी त्याला घरच्या जेवणाची सर येत नाही. आता हे जरी खरे असले तरी लोकांचा घरच्या जेवणापेक्षा बाहेर खाण्याकडे कल वाढलेला दिसतोय. एका सर्व्हेनुसार अमेरिकतेमध्ये लोक किराणा सामानापेक्षा हॉटेलमधील जेवणावर अधिक पैसे खर्च करीत आहेत.कधी एकेकाळी हॉटेलमध्ये जेवण करणे म्हणजे लक्झरी, चैन मानले जाई. परंतु आजच्या जगात ती गरज झाली आहे. पती-पत्नी दोघेही कामावर जात असल्यामुळे घरी जेवण बनवायला वेळ मिळत नसल्याची अनेक महिला तक्रार करतात. त्याबरोबरच किराणा सामानाच्या किंमतीमध्ये हॉटेलच्या तुलनेत वाढ झाली नसल्यामुळेदेखील दोहोंतील फरक कमी झाला आहे.सत्तरच्या दशकानंतर बाहेर जेवण करण्याचा ट्रेंड वाढला आहे. अमेरिकेच्या ब्युरो आॅफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या ‘अमेरिकन टाईम युज सर्व्हे’नुसार आजही महिला किचनमध्ये पुरुषांपेक्षा सरासरी दुप्पट वेळ घालवतात. परंतु हॉटेल्सचे बदलते स्वरूप, पर्याय आणि आर्थिक सुबकता या सर्व घटकांमुळे आजकाल बाहेर जेवणे एवढी मोठी गोष्ट मानली जात नाही. त्यामुळे तुमच्याकडे पैसा असेल तर दिवसभर आॅफिसमधून थकून-भागून आल्यावर स्वयंपाकघरात घाम गाळण्यापेक्षा एका फोनवर ‘होम डिलिव्हरी’ देणारा किंवा घरी येतानाच बाहेरून खाऊन येणे सोयीस्कर पडते. यातून पारंपरिक कुटूंबाचे बदलते स्वरूप दिसून येते.