फेसबुकचे सगळ्यांना ‘याड लागलं’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 21:03 IST
फेसबुक यूजर्स दिवसातील सरासरी 50 मिनिटे एफबीवर असतात.
फेसबुकचे सगळ्यांना ‘याड लागलं’
सोशल मीडियाचा अनभिषक्त सम्राट ‘फेसबुक’ने आपल्या सर्वांचेच आयुष्य व्यापून टाकलेले आहे. फेसबुकवर नसणे म्हणजे जणू मागासलेपणाचे लक्षण बनले.म्हणूनच अनेक जण फेसबुकवर असतातच. याचा फायदाही दिसायला लागला आहे. कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील नफा तिपटीने वाढून दीड हजार मिलियन डॉलर्स एवढा झाला आहे. तसेच मासिक सक्रिय यूजर्सचा आकडा 165 कोटींवर गेला आहे.फेसबुकची क्रेझ मात्र या आकड्यांवरून नाही दिसत. ती कळते 50 मिनिटांवरून! होय, फेसबुक यूजर्स दिवसातील सरासरी 50 मिनिटे एफबीवर असतात. आता हा आकडा तुम्हाला लहान वाटत असेल तर थांबा.कारण ‘ब्युरो आॅफ लेबर स्टॅटिक्स’नुसार 24 तासांपैकी आपण सरासरी 8.8 तास तर झोपण्यात, 2.8 तास टीव्ही/फिल्म पाहण्यात आणि खाण्या-पिण्यासाठी 1.07 तास खर्ची घालतो. म्हणजे आपण जेवण्या इतका वेळ फेसबुकला देतो.‘एव्हरकोर’चे विश्लेषक केन सेन सांगतात की, 50 मिनिटे हा खूप मोठा काळ आहे. फेसबुकची एकूण यूजर संख्या वाढली म्हटल्यावर सरासरी अॅक्टिव्ह टाईम घटायला हवा. मात्र, फेसबुकचे लोकांना इतके व्यसन लागलेले आहे की, दिवसातील अधिकाधिक काळ फेसबुकवर आॅनलाईन राहण्यात ते धन्यता मानतात.2014 साली एफबी यूजर दिवसातून सरासरी 40 मिनिटे सक्रीय असत. यूजरबेस वाढूनही सरासरी वेळेमध्ये वृद्धी झाली आहे. बरं हे झाले केवळ सरासरीबद्दल. कित्येक लोक असे आहेत जे तासन्तास फेसबुकवर पडीक असतात. तुम्हीदेखील त्यांपैकी असाल तर तुम्हाला स्वत:ला विचारण्याची गरज आहे की, मला इंटरनेट अॅडिक्शन डिसआॅर्डर तर नाही ना झाला?