Created By: PTITranslated By: ऑनलाईन लोकमत
भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराहचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. या फोटोंसह असा दावा करण्यात आला आहे की, बुमराहची प्रकृती खूपच खराब आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचं आढळलं. तपासात असं दिसून आलं की, व्हायरल झालेला फोटो एआय-जनरेटेड होता आणि बुमराहला रुग्णालयात दाखल केल्याचा दावा पूर्णपणे खोटा होता.
दावा
७ फेब्रुवारी रोजी 'क्रिकेट दुनिया' या फेसबुक पेजने जसप्रीत बुमराहचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलं की, "जसप्रीत बुमराहची प्रकृती बिघडली आहे, खरा देशभक्त बनून त्याला एक लाईक देऊन आशीर्वाद आणि त्याला प्रेम द्या आणि तो भारताचा अभिमान आहे, तो महान आहे." पोस्टची लिंक, आर्काइव्ह लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पाहा.
तपास
दाव्याची पडताळणी करण्यासाठी डेस्कने गुगल लेन्सच्या मदतीने व्हायरल फोटोचा रिव्हर्स इमेज सर्च केला. या काळात, आम्हाला अनेक सोशल मीडिया पोस्ट आढळल्या ज्यामध्ये ते एआय-जनरेटेड असल्याचे वर्णन केलं होतं. पोस्टच्या लिंक्स पाहण्यासाठी येथे, येथे आणि येथे क्लिक करा.
या आधारावर तपास पुढे नेत डेस्कने 'हायव्ह मॉडरेशन' आणि 'साइट इंजिन' या एआय डिटेक्टर टूल्सने हे फोटो स्कॅन केले. व्हायरल झालेला फोटो ९९ टक्के एआय-जनरेटेड असल्याचं सांगण्यात आलं. स्क्रीनशॉट येथे पाहा.
यानंतर डेस्कने संबंधित कीवर्ड वापरून गुगल सर्च केलं. या काळात आम्हाला अनेक मीडिया रिपोर्ट्स मिळाले, ज्यात असं म्हटलं होतं की, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराहला पाठदुखीचा त्रास झाला होता, त्यानंतर तो वैद्यकीय पथकासह मैदानाबाहेर जाताना दिसला. त्याला कंबरदुखीमुळे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर पडावं लागलं आहे आणि त्याच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आलं आहे. येथे, येथे आणि येथे क्लिक करून हे मीडिया रिपोर्ट्स वाचा.
तपासादरम्यान, डेस्कला जसप्रीत बुमराहचा लेटेस्ट फोटो देखील सापडला. चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर बुमराहचा हा पहिलाच फोटो आहे, ज्यामध्ये तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सेल्फी काढताना दिसत आहे. या फोटोत तो खूपच फिट दिसत आहे.
त्याने हा फोटो १३ फेब्रुवारी २०२५ रोजी इन्स्टाग्रामवर 'रिबिल्डिंग' या कॅप्शनसह शेअर केला होता, ज्यावरून हे स्पष्ट होतं की बुमराह अद्याप रुग्णालयात दाखल नाही. पोस्टची लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पाहा.
आमच्या आतापर्यंतच्या तपासातून हे स्पष्ट झालं आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो एआय-जनरेटेड आहे आणि बुमराहला रुग्णालयात दाखल केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
दावा
"जसप्रीत बुमराहची प्रकृती आणखी बिघडली"
वस्तुस्थिती
पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचं आढळलं.
निष्कर्ष
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो एआय-जनरेटेड आहे आणि बुमराहला रुग्णालयात दाखल केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
(सदर फॅक्ट चेक PTI या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)