लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका आता थेट पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहेत. २१ एप्रिल २०२४ रोजी सिनेट निवडणूक होईल. तर २४ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. नव्याने मतदार नोंदणी मंगळवारपासून सुरू होणार आहे. नेमक्या त्याचवेळेस लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत.
उच्च न्यायालयाने सिनेट निवडणुका स्थगित केल्याच्या विरोधात याचिका दाखल करून घेतली आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्याआधी ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी होईल. याआधी नोंदणी शुल्क भरलेल्यांनी ते पुन्हा भरण्याची गरज नाही. तसेच, जुन्या लॉगइन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करू शकतील.
नवे वेळापत्रक
३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर : नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी अर्ज भरण्याची तारीख १ डिसेंबर, २०२३ ते २५ फेब्रुवारी, २०२४ : मतदार नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिद्धी २६ फेब्रुवारी २०२४ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध २९ फेब्रुवारी : निवडणूक अधिसूचना जाहीर ११ मार्च : उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ मार्च : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची मुदत २० मार्च : उमेदवारांची यादी प्रसिध्द २१ एप्रिल : सिनेट निवडणूक पार पडणार (सकाळी ९ ते सायंकाळी ५) २४ एप्रिल : मतमोजणी