मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी दोन फेऱ्यांमध्ये केवळ ५० हजार ५६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आयटीआयसाठी १ लाख ४७ हजार ४३२ जागांची प्रवेशक्षमता उपलब्ध होती. दुसऱ्या फेरीतही अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. ९४ हजार ३२० जागा सरकारी आयटीआयमध्ये, तर ५३ हजार ११२ जागा खासगी आयटीआयमध्ये उपलब्ध होत्या.
मात्र, १९ जुलै २०२५ पर्यंत झालेल्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेंतर्गत २०२५ मध्ये सरकारी आयटीआयमध्ये सर्व ९४ हजार ३२० जागा कॅपसाठी दिल्या गेल्या. खासगी आयटीआयमध्ये मात्र केवळ ४० हजार ८५ जागा कॅप अंतर्गत होत्या, उर्वरित १० हजार ७४३ जागा संस्था स्तरावर (इन्स्टिट्यूट लेव्हल) भरल्या जाणार आहेत, तर १ हजार ५६४ जागा अल्पसंख्याक कोट्यांतर्गत आहेत.
असे झाले प्रवेशपहिली फेरी : पहिल्या फेरीत ८२,८३३ जागा वाटप झाल्या. यामध्ये सरकारी आयटीआयमध्ये ६६,६८० आणि खासगी आयटीआयमध्ये १६,१५३ जागा वितरित झाल्या होत्या. मात्र, या फेरीत केवळ ४२,२९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यापैकी सरकारी संस्थांमध्ये ३१,८२७ विद्यार्थी तर खासगी संस्थांमध्ये १०,४६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसरी फेरी : २२ जुलैपर्यंत दुसऱ्या फेरी सुरू असून, १९ जुलैपर्यंत ४९,३४६ जागा वाटप झाल्या. यात ८,२७१ विद्यार्थी प्रवेशासाठी पुढे आले. सरकारी आयटीआयमध्ये ६,४५१ व खासगीमध्ये १,८२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, असे व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने सांगितले.