शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

जागतिक पातळीवर पाक एकाकी पडतोय का?

By admin | Updated: July 6, 2016 03:04 IST

सोलमध्ये नुकत्याच झालेल्या अणु पुरवठादार गटाच्या बैठकीत मुख्यत: चीन आणि त्याबरोबर इतर काही देशांनी विरोध केल्यामुळे भारताला त्या गटाचे सदस्यत्व मिळू शकले नाही. भारताला

- प्रा.दिलीप फडके(ज्येष्ठ विश्लेषक)सोलमध्ये नुकत्याच झालेल्या अणु पुरवठादार गटाच्या बैठकीत मुख्यत: चीन आणि त्याबरोबर इतर काही देशांनी विरोध केल्यामुळे भारताला त्या गटाचे सदस्यत्व मिळू शकले नाही. भारताला प्रवेश दिला तर पाकिस्तानलासुद्धा तो द्यावा लागेल हा चीनचा हट्ट बहुसंख्य देशांनी अमान्य केल्याने (काही काळासाठी तरी) भारताचे सदस्यत्व लांबणीवर पडले. पाकिस्तान अतिरेकी गटांना आश्रय देतो हे आता भारताला जगातल्या इतर देशांना पटवून सांगावे लागत नाही. उलट आपण तसे करीत नाही हे इतरांना पटवून देण्याचे काम पाकिस्तानला करावे लागत असल्याचे मोदींनी एका मुलाखतीत सांगितले आणि या पार्श्वभूमीवरच जगात पाकिस्तान एकटा पडलाय का याची चर्चा सुरु झाली आहे. महत्वाचे म्हणजे खुद्द पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्येही ती होते आहे. पाकच्या ‘डॉन’मध्ये त्याचे माजी संपादक अब्बास नसीर यांचा ‘परराष्ट्र धोरण की अपयशी गोंधळ’ या शीर्षकाखालील एक विशेष लेख प्रकाशित झाला आहे. त्यात ते म्हणतात, ‘आपल्या परराष्ट्र धोरणाने यशापेक्षा अपयशाचीच जास्त कमाई केली आहे. उत्तरेकडची पर्वतीय प्रदेशातली एक लहानशी खिडकी (चीन) वगळता आपल्या देशाच्या सर्व बाजूंना असणाऱ्या देशांशी आपले संबंध दुराव्याचे आहेत’. पाकचे विद्यमान लष्करप्रमुख राहील शरीफ निवृत्त झाल्यावर नव्या लष्करप्रमुखाची निवड करण्याच्या आव्हानाला नवाझ यांना सामोरे जावे लागणार असल्याचे सांगत असतांनाच एफ-१६ विमानांच्या पुरवठ्यात अमेरिकेने उभे केलेले अडथळे, भारताबरोबरचा जवळपास थांबलेला संवाद, इराण आणि अफगाणिस्तान यांच्याशी असलेल्या संबंधात झालेली घसरण या सारखी पाकच्या परराष्ट्र धोरणाच्या अपयशाची उदाहरणेही त्यांनी दिली आहेत. पाकमध्ये निर्वाचित सरकारच्या बरोबरच लष्करालासुद्धा धोरणांमध्ये भूमिका असते. या दोहोतील सुसंवादाअभावी अनेकदा परस्परांवर कुरघोडी करण्याचे डावपेच सरकारच्या धोरणांना दोन वेगळ्या दिशांना खेचत असतात. त्यामुळे या दोहोंच्या अधिकारांचे सुस्पष्ट विभाजन होणे गरजेचे असल्याचा अभिप्राय नसीर यांनी व्यक्त केला असून तो पाकमधील एका वरिष्ठ पत्रकाराचा आहे, हे विशेष. ‘दि नेशन’ या दुसऱ्या महत्वाच्या वृत्तपत्रात अमेरिकेच्या डेमोक्र ॅटिक पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या यादीत पाकचा समावेश नसल्याच्या बातमीला आणि तिच्या विश्लेषणाला विशेष स्थान मिळाले आहे. ओबामांचे परराष्ट्र धोरण बऱ्याच प्रमाणात यापुढेही सुरु ठेवले जाईल असे सांगतानाच या जाहीरनाम्यात पाकचा उल्लेख केवळ एकाच वेळी करण्यात आला असून तोदेखील अतिरेकी दहशतवादाच्या विरोधात आपली लढाई सुरु ठेवण्याच्या अमेरिकेच्या कटिबद्धतेच्या संदर्भात. याउलट भारताचा उल्लेख मात्र जगातला सर्वात मोठा लोकशाही देश, अमेरिकेचा महत्वाचा सामरिक आणि आर्थिक मित्र आणि अमेरिकेचा पॅसिफिक क्षेत्रातला महत्वाचा सहकारी असा केला आहे व अण्विक सहकार्यासह अनेक प्रकारचे सहकार्य पुढील काळातही कायम राहील असा इरादा त्यात व्यक्त केला गेला आहे. हेच (बहुधा) पाकला बरेच झोंबलेले दिसते. कारण पाकचे परराष्ट्र मंत्री सरताज अझीझ यांनी पाकिस्तान अमेरिकेच्या काही विशिष्ट मागण्यांची पूर्तता करीत नाही म्हणून अमेरिकेबरोबरच्या संबंधात काहीसा तणाव निर्माण झाला असल्याचे सांगत पाक एकाकी वगैरे पडलेला नाही असा खुलासा करून आपल्या सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच त्यांनी आवर्जून चीनबरोबरचे निकटचे राजनैतिक आणि आर्थिक सहकार्याचे संबंध यांचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ उघड आहे, जगातील बहुसंख्य देशांनी जवळपास वाळीत टाकलेला पाकिस्तान आता (केवळ) चीनच्या पाठबळावर आपल्या विदेश नीतीचा पट मांडतो आहे. यातच पाकची अगतिकता दिसून येते. ‘बीबीसी’नेसुद्धा या विषयाची मांडणी अशीच केलेली दिसते. अहमद रशीद या लाहोरच्या ज्येष्ठ पत्रकाराचे वार्तापत्र बीबीसीने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केले होते. दिवसेंदिवस पाकिस्तानच्या मित्रांची संख्या कमी होते आहे असे सांगत त्यांनी इराण, अफगाणिस्तान आणि भारतासारख्या शेजारी देशांच्या बरोबरचे पाकचे संबंध बिघडलेले आहेत हे स्पष्टपणाने सांगितले आहे. अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्येही दुरावा आला आहे आणि मुख्यत: आपल्या भूमीवरून काम करीत असलेल्या दहशतवादी गटांवर नियंत्रण आणण्यात पाकला यश आलेले नाही म्हणून हे घडते आहे. अमेरिकेने तर तालिबान आणि हक्कानी यासारख्या अतिरेकी दहशतवाद्यांना पाकच्या लष्कराची उघड फूस असल्याचे स्पष्टपणाने सांगितले असून त्यामुळे पाकमधील ड्रोनचे हल्ले वाढवले आहेत. यामुळेच अफगाणिस्तानातून आपले सगळे सैन्य काढून घ्यायला अमेरिका तयार झालेली नाही, असेही रशीद यांनी म्हटले आहे.‘पाकिस्तान टुडे’ चे संपादक अरिफ निझामी यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या विशेष लेखातही हाच विचार मांडलेला दिसतो. सध्याचे चित्र अतिशय निराशाजनक असल्याचे सांगतानाच पाकने आपल्या देशातल्या अतिरेकी गटांना नियंत्रणाखाली न आणल्यामुळे अमेरिका आता पाकला आपला विश्वासू सहकारी मानीत नाही. त्याच वेळी रशियादेखील पाककडे अमेरिकेशी पूर्वी असणाऱ्या निकटच्या सबंधांमुळे संशयाने पाहातो असे म्हटले आहे. पाकला सुरुवातीपासूनच परराष्ट्र धोरण नाही, त्याऐवजी पाकने कायमच सुरक्षा धोरणाचा विचार केला आहे, असे सांगताना तिथल्या सत्तेत लष्कराच्या हस्तक्षेपाचा संदर्भ देत गरजेपेक्षा जास्त प्रभावशाली असणाऱ्या लष्करशहांना तिथे कायमच अधिक महत्व मिळाले असल्याचे नमूद केले आहे. पाक शासक आणि लष्करशहांनी या ‘व्हिक्टीम सिन्ड्रोम मधून बाहेर येऊन चौकटीबाहेर विचार केला तरच काही बदल होईल अन्यथा स्थिती अधिक बिघडेल असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्याला पाक लष्कराच्या आयएसआयने मदत केली होती असा आरोप बांगलादेश सरकारमधल्या महत्वाच्या नेत्यांनी केला आहे. आपण या घटनेत सहभागी नव्हतो याचे स्पष्टीकरण आणि खुलासा पाकच्या प्रवक्त्यांना करावा लागतो आहे आणि त्यावर विश्वास ठेवायला कुणी फारसे तयार होताना दिसत नाही, ही पाकच्या परराष्ट्र धोरणाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.