शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

‘दलित’ शब्द नव्हे, दलितत्त्व बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:36 AM

एखाद्या संकल्पनेबाबत, नावाबाबत, शब्दाबाबत मतभिन्नता असू शकते, त्यात बदलही होऊ शकतो.

-बी. व्ही. जोंधळेएखाद्या संकल्पनेबाबत, नावाबाबत, शब्दाबाबत मतभिन्नता असू शकते, त्यात बदलही होऊ शकतो. उभ्या राहिलेल्या चळवळीला गतिमान करून नामांतर करता येऊ शकते; पण अमूक एक शब्द हद्दपारच करा, अशी भूमिका घेणे हे संकुचितपणाचे निदर्शक ठरते. भारतीय समाजव्यवस्थेत जे जे जातीवर्ग जाती व्यवस्थेचे बळी ठरून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकदृष्ट्या दडपले गेले आहेत, ते सर्व समाजघटक म्हणजे ‘दलित’ होत, अशा व्यापक अर्थाने ‘दलित’ शब्द आंबेडकरी चळवळीत रूढ झाला. दलित म्हणजे केवळ धर्मांतरित नवबौद्ध नव्हेत, तर दलित संकल्पनेत बौद्धांसह सर्व अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, ओबीसी वर्गाचा समावेश जसा अभिप्रेत आहे, तसेच ब्राह्मण समाजातील वंचित वर्ग वा उपेक्षित ब्राह्मण माणूसही ‘दलित’ संकल्पनेत स्वीकारला गेला आहे. ‘दलित’ संकल्पनेच्या स्वीकारामुळे जातिव्यवस्थेचा बळी ठरलेल्या सर्व जातींनी जातीपलीकडे जाऊन एकत्र येऊन विषम समाजव्यवस्थेविरुद्ध संघर्ष उभारावा, या उदात्त मानवी मूल्याचाही स्वीकार करण्यात आला आहे. बौद्ध समाजातील काही विचारवंतांना मात्र आता असे वाटत आहे की, आपण बौद्ध झालेलो असल्यामुळे दलित राहिलो नाही, म्हणून स्वत:चा उल्लेख बौद्ध वा आंबेडकरवादी असा करावा. बाबासाहेबांनी पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाचा उल्लेख ‘दलित’ असा न करता त्यांना बहिष्कृत शेड्युल्डकास्ट, मागासवर्गीय या शब्दांनी संबोधिले. (बाबासाहेबांनी काही वेळा ‘दलित’ शब्दाचाही वापर केल्याच्या नोंदी आढळतात.) या पार्श्वभूमीवर ‘दलित’ हा शब्द तुच्छतादर्शक असल्यामुळे तो हद्दपार व्हावा. केंद्र सरकारनेसुद्धा सरकारी कागदपत्रांतून दलित समाजाचा उल्लेख ‘दलित’ असा न करता अनुसूचित जाती-जमाती असा करावा, असे निर्देष दिले आहेत. हरकत नाही, दलितत्त्व ही काही मोठ्या अभिमानाने मिरवायची गोष्ट नाही. दलित समाजाचे दलितत्त्व नष्ट होऊन ‘दलित’ शब्द इतिहासजमाच झाला पाहिजे, म्हणून ज्यांना स्वत:ला बौद्ध वा आंबेडकरवादी म्हणवून घ्यायचे आहे त्याविषयी मुळी तक्रारच नाही; पण खरा प्रश्न असा आहे की, ‘दलित’ या संकल्पनेखाली शोषित-पीडित जाती एकत्र येऊन विषमताग्रस्त समाजव्यवस्था बदलण्यास कटिबद्ध होत असतील, तर मग ‘दलित’ शब्दास विरोध का व्हावा?आंबेडकरवाद, बुद्धिझम, बौद्ध धम्म, या साऱ्या संकल्पना समता, स्वातंत्र्य, बंधुभावाचा निस्सीम पुरस्कार करणाºया आहेत; पण मुद्दा असा की, ज्या दलित जाती बौद्ध नाहीत व ज्यांना आंबेडकरवाद अजूनही कळलेला नाही, त्या दलित जातींना ‘दलित’ नको बौद्ध म्हणा-आंबेडकरी म्हणा, असा अट्टहास धरून आपण शोषित-पीडित जातीच्या जवळीकीत कळत-नकळत अवरोधच निर्माण करीत नाही काय? बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे भारत बौद्धमय झाला पाहिजे, या देशाने आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे, हे शंभर टक्के मान्य; पण यासाठी प्रबोधनाची चळवळ गतिमान करणे आवश्यक आहे; पण असे न करता कडवेपणाच्या आहारी जाऊन बौद्ध आंबेडकरवादी म्हणा अशा शब्दांचा आग्रह धरून दलित चळवळीत दुरावा निर्माण करणे कितपत बरोबर आहे? ज्या दलित जाती बौद्ध झाल्या नाहीत त्यांना आपण कोणत्या नावाने संबोधणार आहोत? उत्तर भारतात चर्मकार समाज मोठ्या संख्येने आहे, तो बौद्ध नाही, पण तो आंबेडकरवाद मानतो, त्यांचा उल्लेख आपण कोणत्या शब्दांत करणार? चर्मकार असा? बसपा नेते कांशीराम-मायावती यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नाही; पण म्हणून त्यांच्या आंबेडकरी निष्ठेविषयी आपण शंका घेणार आहोत? अनुसूचित जातीच्या कुठल्याही एका जातीवर अत्याचार झाला, तर दलितावर अत्याचार झाला, अशा भाषेत बातम्या छापल्या जातात.‘दलित’ शब्द नको असेल आणि उद्या अनुसूचित जातीतील एखाद्या जातीवर अत्याचार झाला, तर त्याचा उल्लेख कोणत्या शब्दांत करावयाचा? मातंग-चर्मकार-वाल्मिकी समाजावर अत्याचार असा? अशा पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे विभाजनाला जातिव्यवस्थेला पुष्टीच देणे नव्हे काय?‘दलित’ शब्द हा आता जागतिक पातळीवर स्वीकारला गेला आहे. दलित चळवळीचा उल्लेख जगभर ‘दलित मुव्हमेंट’ असा होतो. १९६७ साली उदयास आलेल्या दलित साहित्य चळवळीने फक्त रडके साहित्यच निर्माण केले नाही, तर विद्रोही साहित्यनिर्मिती केली. बौद्ध साहित्याच्या निमित्ताने मर्यादित केला गेलेला विचार दलित साहित्याच्या निमित्ताने व्यापक केला. परिणामी गं.बा. सरदार, भालचंद्र फडके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लक्ष्मण माने, फ.मुं. शिंदे आदींनी स्वत:स दलित ‘साहित्य चळवळी’शी जोडून घेतले. बाबूराव बागूल, दया पवार, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, प्रा. अविनाश डोळस, अरुण कांबळे, अर्जुन डांगळे आदी सशक्त लेखक-कवींची पिढी निर्माण झाली. दया पवार, लक्ष्मण माने, प्र. ई. सोनकांबळे आदी लेखक त्यांच्या दाहक आत्मकथनामुळे जगभर गेले. दलित नाटक, दलित चित्रकला उदयास आली; पण पुढे बौद्ध संकल्पनेचा आग्रह धरून काहींनी ‘दलित’ संकल्पनेस विरोध केला. काहींनी बौद्ध-दलितऐवजी फुले-आंबेडकर प्रेरणेचे साहित्य म्हणा, असा सूर लावला. काहींनी बहुजन जनवादी, विद्रोही नावाचा पुकारा केला. यातून कुठलीही एक संकल्पना रूढ होऊ शकली नाही. आंबेडकरी चळवळीला जातीपुरते मर्यादित ठेवणाºयांचा विजय झाला व एक चांगली उभी राहिलेली साहित्य चळवळ मोडून पडली. ‘दलित’ शब्दास होणारा विरोध याच वळणाने जात आहे.बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता ते प्रबुद्ध भारत, असा आपल्या पत्रकारितेचा प्रगल्भ प्रवास केला. मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ते रिपब्लिकन संकल्पनेपर्यंत व्यापक राजकारण केले. बाबासाहेबांचे हे सर्व प्रयोग जातीअंताच्या लढ्याचे निदर्शक होते. आता मात्र काहीजण जातीत अडकून घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, यास काय म्हणावे? तात्पर्य बौद्ध-आंबेडकरी या शब्दाबरोबरच दलित शब्दाचाही वापर व्यापक चळवळीसंदर्भात होत असेल, तर त्यास टोकाचा विरोध होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर ती चूक ठरू नये. कारण दलितत्त्व मिटविण्याच्या व्यापक संकल्पनेवर आधारित परिवर्तनवादी सामाजिक चळवळ येथील प्रस्थापित समाजव्यवस्थेस नकोच असते. जाती-जातीत समाज विभागलेला असला म्हणजेच त्याचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वर्चस्व अबाधित राहू शकते, याचे भान प्रगल्भ, बुद्धिवादी बौद्ध समाजाने ठेवले पाहिजे असे म्हटले तर गैर ठरू नये. दुसरे काय?