बिल गेट्स, संस्थापक, ‘मायक्रोसॉफ्ट’
पहिला प्रश्न :डीपफेक्स (AI ने तयार केलेली खोटी माहिती/चित्रे/फोटो) लोकशाही देशांच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप घडवू शकेल का?
काही शतकांपासून पुस्तके आणि पत्रकबाजी यातून असत्य आणि खोटारडेपणा पसरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर लोक करतच आहेत. वर्ड प्रोसेसर्स, लेझर प्रिंटर्स, ई-मेल आणि समाजमाध्यमे आल्यानंतर हे काम त्यांच्यासाठी सोपे झाले. AI मुळे ते आणखी सोपे होईल. कोणालाही बनावट ऑडिओ/व्हिडीओ तयार करता येतील. अशा खोट्यानाट्या गोष्टींचा वापर करून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. मतदारांच्या मनात संभ्रम उत्पन्न करणे AIमुळे सोपे होईल हेही खरे.
कल्पना करा, निवडणुकीच्या दिवशी उमेदवार बँकेवर दरोडा घालत असल्याचा (फेक) व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरू लागला तर? तो खोटा असला तरीही तसे सिद्ध करायला बातम्या प्रसारीत करणारी माध्यमे, प्रचारयंत्रणा यांना पुष्कळ वेळ लागेल. निवडणूक अटीतटीची असेल तर निकालात बदल व्हायला तो व्हिडीओ नक्कीच कारणीभूत होईल.
माणसाने निर्मिलेले AI माणसालाच हुसकावेल?
- पण, तरीही दोन गोष्टी मला आशादायी वाटतात. एकतर प्रत्येक गोष्ट दिसते तशी नसते हे लोकांना एव्हाना कळू लागले आहे. तुमचा क्रेडिट कार्ड क्रमांक दिलात तर नायजेरियाचे राजपुत्र तुम्हाला मोठी धनराशी देतील असे सांगणारे ई-मेल्स वाचून लोक फसत होते, परंतु आता बहुतेक लोक अशा ई-मेल्सवर दोनदा विचार करतात. फसवणुकीची तंत्रे आधुनिक झाली त्याचप्रमाणे भक्ष्यही सावध झाले आहे. AI बनावट व्हिडीओ तयार करू शकेल, पण बनवेगिरी ओळखायलाही याच तंत्रज्ञानाची मदत होईल.
ही चक्रनेमिक्रमाने होणारी प्रक्रिया आहे. कुणीतरी खोटेपणा कसा बेमालूमपणे करायचा ते शोधून काढतो, तर दुसरा कोणी तरी त्याचा सामना कसा करायचा यासाठी प्रयत्न करतो. तिसरा असा सामना निष्प्रभ कसा करायचा यावर विचार करतो, आणि हे अखंड चालू राहते. यात पूर्णपणे यश येत नाही परंतु प्रयत्न अजिबात फसतात असेही होत नाही.
AI : माणसांनी घाबरून जावे, की स्वागत करावे?
दुसरा प्रश्न : व्यक्ती तसेच सरकारवर हल्ले चढवणे AI मुळे सोपे होईल, मग काय करणार?आज हॅकर्स सॉफ्टवेअरमधील उणिवा शोधून संगणकात शिरण्यासाठी फट सापडेपर्यंत आंधळेपणाने हात मारत राहतात. हॅकर्सचा डाव हाणून पाडण्यासाठी सुरक्षाविषयक तज्ज्ञ हेच करतात. AI या प्रक्रियेला वेग देईल. हॅकर्सना अधिक परिणामकारक कोड टाकता यावा यासाठी मदत करेल. व्यक्तीविषयक माहिती ते भराभर गोळा करतील; म्हणजे तुम्ही कुठे काम करता, तुमचे मित्र कोण आहेत, ते कोणत्या ठिकाणी राहातात वगैरे... नंतर तुमच्यावर होणारा फिशिंग हल्ला आजच्यापेक्षा जास्त प्रगत असेल.
पण, गुन्हेगारांनी फायदा घेण्यापूर्वीच सुरक्षा प्रणालीतील दोष हुडकण्याची आधुनिक साधने सरकार आणि खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना विकसित करावी लागतील. सॉफ्टवेअर सुरक्षा उद्योग वेगाने वाढेल आणि अद्ययावत होईल. सायबर गुन्हेगार नवनवी साधने हुडकण्याचे थांबवणार नाहीत त्याचप्रमाणे AI चा वापर करून अण्वस्त्रे किंवा जैविक दहशतीचे हल्ले करू इच्छिणारे थांबणार नाहीत. त्यांना थांबवण्याचे प्रयत्नही सारख्याच गतीने करावे लागतील. दुसऱ्या देशावर सायबर हल्ला करण्यासाठी AI चा वापर करण्याचीही स्पर्धा लागेल आणि या इर्षेतून भयंकर धोकादायक अशी सायबर शस्त्रे तयार करण्याची स्पर्धा लागेल हा भीतीदायक विचार आहे. पण, आपल्याला इतिहास यात मार्ग दाखवू शकतो. जगातल्या अण्वस्त्र प्रसारबंदी प्रयत्नांमध्ये काही उणिवा होत्या. तरीही माझ्या पिढीला ज्या अण्वस्त्र युद्धाची भीती वाटत होती, ते जागतिक समुदायाने होऊ दिले नाही. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीप्रमाणेच AI च्या नियमनासाठीही एक जागतिक एजन्सी निर्माण करावी लागेल.
तिसरा प्रश्न : AI मुळे लोकांच्या नोकऱ्या जातील का?
पुढच्या काही वर्षांत AI मुळे लोकांना त्यांचे काम अधिक प्रभावीपणे करता येईल. तुम्ही कारखान्यात काम करत असा, मार्केटिंगमध्ये असा, इन्शुरन्स क्षेत्रात असा की साधे हिशेबनीस, AI तुमचे काम सुकर करील. उत्पादनक्षमता वाढत असेल तर ते नेहमीच समाजाच्या हिताचे ठरते. शिकवणे, रुग्णाची काळजी घेणे, वृद्धांना मदत करणे यासारखी कामे करणाऱ्या लोकांची मागणी कधीच कमी होणार नाही. परंतु, AI चा वापर व्यापक झाल्यावर काही कर्मचाऱ्यांना मदतीची, पुन:प्रशिक्षणाची गरज लागेल. त्याबाबतीत कर्मचारी मागे पडणार नाही यासाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी सरकार आणि उद्योग संस्थांची असेल; नाहीतर लोकांच्या जीवनात विस्कळीतपणा येईल.
श्रमाच्या बाजारपेठेत तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्याची ही काही पहिली वेळ नाही. पहिल्यांदा संगणक आला, तेव्हा जे घडले तेच पुन्हा होईल. वर्ड प्रोसेसिंग उपयोजनांमुळे काम अधिक सुकर झाले. त्याने काम खाल्ले नाही. मालक आणि नोकर या दोघांनाही बदलावे मात्र लागले आणि ते बदलले. AI मुळे बदल होत असताना थोडे जास्त धक्के बसतील; पण, लोकांचे जीवन, त्यांची रोजीरोटी यावर होणारे AI चे परिणाम आपण नक्कीच नियंत्रणात ठेवू शकू असे म्हणायला भरपूर वाव आहे.
(बिल गेट्स यांनी ‘गेट्स नोट्स’ या ब्लॉगवर लिहिलेल्या लेखाचा अनुवादित, संपादित सारांश. उद्याच्या अंकात पुढले तीन प्रश्न)