शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

दलितजन गांधीजींना समजून घेतील काय?

By admin | Updated: October 2, 2014 13:21 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व सामाजिक क्षितिजावर अनेक तार्‍यांचा उदय झाला. मोहनचंद करमचंद गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या दोन तार्‍यांची जेवढी चर्चा झाली, तेवढी अन्य तार्‍यांची झाली नसावी.

- डॉ. वामनराव जगताप, सेवानिवृत्त प्राचार्य
 
 
स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर अनेक तार्‍यांचा उदय झाला. त्यातील मोहनचंद करमचंद गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या दोन तार्‍यांची जेवढी चर्चा झाली, तेवढी अन्य तार्‍यांची झाली नसावी. दलित- आंबेडकरी जनतेचा या चर्चेत सूर असाच राहत आलेला आहे, की हे दोन तारे एकमेकांच्या जवळचे नसून त्यातील एक उत्तर ध्रुवावरील, तर दुसरा दक्षिण ध्रुवावरील आहे. असेही प्रतिपादन केले गेले, की हे दोन्ही तारे स्वंयप्रकाशित असले तरी एकमेकांना छेद देणारे आणि परिक्रमा करता-करता एकमेकांना धडकणारे होते. हटवादी, स्वार्थी नेत्या-कार्यकर्त्यांनी त्यांचे पृथक-पृथक अशा पद्धतीने ध्रुवीकरण करून टाकले आहे. या दोन्ही युगपुरुषांचे जे विकृत व विरोधी चित्र उभे केले आहे, त्यामागे त्यातील नेते- कार्यकर्त्यांची राजकीय स्वार्थवृत्ती दिसून येते. 
खरं तर हे दोन्ही राष्ट्रपुरुष परस्परांचे विरोधक-वाटत असले तरी परिस्थितीचे गांभीर्य व देशहित लक्षात घेऊन किती ताणायचे व सैल सोडायचे हे त्यांच्या सद्विवेकबुद्धीला चांगले माहीत होते. ऐतिहासिक महत्त्वाचा ‘पुणे करार’ झाल्यानंतर दलित नेत्यांनी गांधीजींना टार्गेट केल्याचे चित्र स्पष्ट आहे. खरं म्हणजे या प्रकरणात दोन्ही महामानवांची भूमिका काळानुरूप आपापल्या जागी योग्यच होती; थोड्याफार फरकाने नंतरच्या काळात या भूमिकेची अंमलबजावणीसुद्धा झाली. गांधींजींना वाटायचे की अस्पृश्यता ही अंतर्गत बाब असून स्वातंत्र्यात ती आपल्यापरीने नष्ट करता येईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साधार वाटायचे की भारताने यापूर्वी अनेक वेळा स्वदेशीयांची सत्ता असूनही दलित, अस्पृश्यांना कधीच मोकळा श्‍वास घेता आला नाही. अशा प्रकारे या दोन्ही महामानवांची भूमिका आपापल्या ठायी योग्य असताना योग्य मूल्यमापन, चिकित्सा न करता दलित नेते गांधीजींना ‘आखिल दलित जनतेच्या सामाजिक-राजकीय हक्काचे मारेकरी’ ठरवत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहा कोटी दलित जनतेच्या रक्ताने पुणे करारावर सही करून दलितांच्या हक्कांना तिलांजली देऊन गांधींना जीवदान दिले, अशी प्रौढी दलित नेत्यांकडून मारली जाते. इंग्लंडमधील गोलमेज परिषदेतील गांधीजींच्या भूमिकेबद्दलही दलित नेत्यांकडून अशीच तिरकस प्रतिक्रिया आलेली आहे आणि यातूनच डॉ. बाबासाहेबांना माईची आणि गांधीजींना दायीची उपमा देण्याची प्रथा सुरू झाली. 
अस्पृश्योद्धाराचा एक भाग म्हणून अस्पृश्य मुला-मुलींसाठी एकत्र व स्वतंत्र वसतिगृहांची सोय, आरक्षण, शिष्यवृत्त्या, इनाम, बक्षिसे, सहभोजनांचे कार्यक्रम या राजर्षी शाहू महाराजांच्या उपक्रमांची गांधीजींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. गांधीजींनी अस्पृश्य मुलीला दत्तक घेतले होते. त्यांनी निर्माण केलेला ‘हरिजन सेवक संघ’ आणि ‘हरिजन’ नामक मुखपत्र अस्पृश्यांच्या सेवेस वाहिलेले उपक्रम होते. मला पुढचा जन्म मेहतर समाजात मिळाला तर आनंदच होईल, असेही गांधी म्हणाले होते. हरिजनसेवेची त्यांनी प्रत्यक्ष कृती करीत हरिजनवस्तीत जाऊन तेथील स्वच्छतागृह (संडास) साफ केले. तरीही त्यांच्या या कार्याला दलित नेते-जनतेने शंकेच्या नजरेने पाहिले. खरं म्हणजे कुठल्याही ‘युगपुरुषानं’ केलेली लहानसी कृती प्रतीकात्मक असते. त्यात एक मोठा अर्थ, आदर्श दडलेला असतो, हे कळले पाहिजे. गांधीजींनी अस्पृश्यांबद्दल हरिजन शब्द वापरला तो त्यांची उपेक्षा-अवहेलना करण्यासाठी नाही. अस्पृश्यांची चोहीकडून होणारी अवहेलना, दमन यापोटीच्या सहानुभूतीतून त्यांनी हा शब्द वापरला. अस्पृश्य  देवाची लेकरे आहेत, आपल्या मनात त्यांच्याबद्दल देवासारखे प्रेम, आपुलकी असावी असे त्यांना वाटायचे; म्हणून त्यांनी हा शब्द वापरला. डॉ. बाबासाहेबांना समग्र क्रांती अपेक्षित असल्यामुळे त्यांनी गांधीजींच्या हरिजन या शब्दालाही हद्दपार केले. यातील त्यांचे सैद्धांतिक समाजशास्त्र असे होते की, गतिमान क्रांतिचक्राच्या परिघात येणार्‍या चांगल्या बाबीही नष्ट होतात व त्या झाल्याच पाहिजेत. काही धरून, काही सोडून समग्र क्रांती होऊच शकत नाही. चांगले नष्ट झाल्याचा शोक करीत बसणार्‍या वृत्ती समग्र क्रांतीला जन्म देऊ शकत नाहीत. सर्व काही उलथून टाकल्याशिवाय खरी क्रांती, खर्‍या परिवर्तनाची बीजे रुजविली जाऊ शकत नाहीत, ही बाबासाहेबांची मूलधारणा होती. त्यांच्या अनेक नकारामागची हीच भूमिका होती. त्यांनी गांधीजींच्या ‘हरिजन’ शब्दाचा अर्थ ‘लाचारी’ असा लावून तो शब्दच पुसून टाकला. 
गांधीजींनी त्या वेळी चातुर्वण्य व्यवस्थेला दुजोरा दिला असला तरी त्यांनी त्यातील अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करण्याचे सुचविले होते. चातुर्वण्र्य कायम ठेवून अस्पृश्यता नष्ट होऊ शकत नाही, हे जरी खरे असले तरी चातुर्वण्र्य ही अंतगर्त बाब असून, ती काळाच्या ओघात हळूहळू आपणास नष्ट करता येईल, असेही ते म्हणत. गांधींजींनी चातुर्वर्णाचे सर्मथन केले, ते नक्कीच अमान्य आहे; पण तो काळ बाराबलुतेदारीचा, कामाच्या वर्गवारीचा, विभागणीचा होता. ही व्यवस्था समस्त समाजमनातही पूर्णपणे रुजली होती, म्हणून कामाची विभागणी, वर्गवारी या संदर्भानेच गांधींजींनी चातुर्वण्र्य व्यवस्थेची व्याख्या केलेली असावी. पण पुढे डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीला अनुसरून शहरीकरणातून बाराबलुतेदारांनीही बंडाचे निशान फडकावत क्रांतीच्या, सुधारणेच्या नवनव्या वाटा धुंडाळत ही व्यवस्था मोडीत काढली. आत्ताच्या परिवर्तित काळात गांधीजी हयात असते तर आश्‍चर्याने आणि आनंदाने म्हटले असते की, अरे! एकेकाळी मी वदलेला चातुर्वण्र्य काळाच्या ओघात आज मागे पडला आहे, याचा मला आनंद होतो आहे. एवढी लवचिकता, परिस्थितीला खुल्या दिलानं सामोरं जाण्याची तयारी युगपुरुषात असते, ती गांधीजींमध्ये होती. हे काही अन्य राजकीय उदाहरणांवरूनही लक्षात येते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाची यादी नेहरूंनी गांधीजींपुढे ठेवली, तेव्हा यादी बारकाईने न्याहाळून गांधीजींनी नेहरूंना सुनावले होते की जोपर्यंत या यादीमध्ये डॉ. आंबेडकरांचे नाव समाविष्ट केले जाणार नाही, तोपर्यंत या यादीला माझी मान्यता असणार नाही. त्याला चट्कन होकार देऊन पं. नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव यादीत समाविष्ट केले होते. 
‘गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले आहे?’ असा प्रश्न डॉ. बाबासाहेबांनी विचारला होता, पण गांधींनी देशासाठी काय केले आहे? असा प्रश्न त्यांनी कधीच केला नाही. गांधीजींच्या स्वातंत्र्य व राष्ट्रीय कार्याबद्दल बाबासाहेबांच्या मनात कधीच किंतु नव्हता, हे यावरून लक्षात यावे. 
गांधीजींच्या संबंधाने सर्व जग एकीकडे आणि आपण मात्र दुसरीकडे, अशी स्थिती दलित नेत्यांची असू नये. डॉ. बाबासाहेबांचे उदात्तीकरण करीत असताना समतुल्य अशा एका जागतिक महानायकाची आपल्याकडून अवहेलना होत असल्याचे त्यांच्या लक्षात यावे. अर्थात त्यामुळे या दोन्ही महानायकांचे जागतिक मूल्य कमी होणारे नाही.