शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गांधी मरत का नाही ?

By admin | Updated: February 16, 2016 03:08 IST

विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष हे दोन्ही अनुभव जिवंतपणी ज्यांच्या वाट्याला यायचे त्या महात्मा गांधींची मृत्यूनंतरही यातून सुटका होत नाही.

विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष हे दोन्ही अनुभव जिवंतपणी ज्यांच्या वाट्याला यायचे त्या महात्मा गांधींची मृत्यूनंतरही यातून सुटका होत नाही. राग-लोभाच्या कचाट्यात गांधी आजही असतो. त्याच्या जगण्याची तऱ्हा, त्याची उपोषणे काहींच्या श्रद्धेचे तर काहींच्या निंदानालस्तीचे विषय असतात. कुठल्यातरी कारणाने, निमित्ताने गांधी आपल्या अवतीभवती असतो. जसा अस्वस्थतेत, शांततेत, तसाच आनंदात आणि दु:खातही... एखादा ग्रॅहम स्टेन्स आणि त्याची मुले जिवंत जाळली जातात, आपण अस्वस्थ होतो. कुणी अकलाख नराधमांच्या क्रौर्याला बळी पडतो, आपण व्यथित होतो. सांधू पाहणारी मने पुन्हा तुटतात की काय, या भीतीने डोळ्याला डोळा लागत नाही. या अवस्थेतही तो सोबतीला असतो, आपल्याला मोडू देत नाही आणि वाकूही देत नाही... परवा हा महात्मा पुन्हा भेटला. निमित्त त्याच्या पणतूच्या भाषणाचे. आपल्या पणजोबांच्या हत्त्येमागची खरी कारणे हा पणतू शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्याने गांधींना मारले तो नथुराम आणि त्याचे समर्थक ६० वर्षांपासून खोटी कारणे सांगून भ्रम निर्माण करीत आहेत. हा माथेफिरु नथुराम कधी नाटकाच्या रूपाने आपल्या विकृतीचे समर्थन करू पाहतो, तर कधी त्याचे सगेसोयरे जयंती-पुण्यतिथीला त्याला हुतात्मा ठरवून महात्म्याच्या हत्त्येचा असुरी आनंद उपभोगत असतात. गांधींच्या पुण्याईवर जगणारे गांधीवादी मात्र अशावेळी शांतपणे बसून राहतात. ‘माझ्या पणजोबांना तुम्ही राष्ट्रपिता म्हणता आणि ६७ वर्षे होऊनही त्यांच्या खुनाला जबाबदार असलेली माणसे आणि त्यांच्या संस्था प्रतिष्ठेने समाजात वावरतात! त्यांच्या निर्घृण हत्त्येमागील दडवून ठेवलेले सत्य देशासमोर का येत नाही’, हा तुषार गांधींचा अतिशय साधा आणि सरळ प्रश्न आहे. नथुरामी मानसिकतेचा उन्माद वाढला असतानाच्या काळात मग हा प्रश्न अधिक जळजळीत ठरतो. गांधींची हत्त्या हा पूर्वनियोजित आणि प्रदीर्घ कटाचा भाग होता. त्यांच्या खुनामागे ज्यांचे पाठबळ होते त्या विचाराची माणसे आज सत्तेत आहेत. ते गोडसेला महात्मा ठरवितात, गांधीजींची कुचेष्टा करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण पुसून टाकण्याचे घाणेरडे कामही करतात. स्वातंत्र्य लढ्यात कुठेही नसलेली किंबहुना इंग्रजांना छुपी मदत करणारी, माफीनामा लिहून देणारी, गांधींची हत्त्या झाल्यानंतर मिठाई वाटणारी ही मंडळी आज देशभक्त म्हणून मिरवितात आणि त्यांच्या हत्त्येची असत्य आणि देशभक्तीपर कारणे तरुणांच्या मनावर घट्टपणे बिंबवतात. ‘कुणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे कर असे सांगणारा तो भेकड म्हातारा, ‘महात्मा’ कसा’, असा प्रश्न एखादा तरुण विचारून जातो, तेव्हा हे विष किती खोलवर पेरले गेले आहे, याचा तीव्रतेने प्रत्यय येतो. या सगळ्या विखारी मानसिकतेत गांधींबद्दलचा खुनी द्वेष दडलेला आहे. पण याची कुणी दखल घेत नाही किंवा चर्चाही करीत नाही. नेमके हेच दु:ख त्यांच्या पणतूला आहे. परवा नागपूर आणि अमरावतीच्या व्याख्यानात तुषार गांधींच्या डोळ्यातील अश्रुंनी या दु:खाला वाट मोकळी करून दिली. त्यांच्या डोळ्यात, शब्दात एक विलक्षण वेदना जाणवत होती. आपल्या पणजोबांचा खून करणाऱ्या व्यक्तींचा नव्हे तर त्या मानसिकतेचा ते शोध घेत आहेत. तो प्रयत्न त्यांना कडवट बनवत नाही तर गांधींनीच सांगितलेल्या मनुष्यधर्माच्या अधिक जवळ नेणारा आहे. गांधी हा तसा किरकोळ आणि कृश देहाचा. पेटलेल्या नौआखलीत ‘तुमच्या अंत:करणातील द्वेषभावनेवर मात करा’ असे तो कळवळून सांगायचा. त्याच्या अहिंसेत, सत्त्याग्रहात असे कोणते सामर्थ्य होते? त्याला एकदा मारल्यानंतरही तो जिवंत कसा? तो अजून मरत का नाही? शरीररुपाने कधीचाच संपलेला हा म्हातारा आपल्या विकृत विचारसरणीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे नथुरामभक्ताना सतत वाटत असते. त्यामुळे या महात्म्याच्या वाटेने जाणाऱ्या प्रत्येक नि:शस्त्र माणसाची त्यांना भीती वाटते. तुषार गांधींचा शोध पूर्णत्वाला जाईल की नाही? सांगता येत नाही. पण गांधी कधी संपणार नाही. नथुरामभक्तांचे हेच वैफल्य आहे. - गजानन जानभोर