शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर.. आवाजात मादक ठसक्याची आग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 08:42 IST

तमाशाच्या रांगड्या फडातून लावणीला बाहेर काढून बैठकीत आणण्याचे आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय नि:संशय सुलोचना चव्हाण यांनाच दिले पाहिजे! 

- संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार

लावण्य आणि शृंगाराचा ठसठशीतपणा तितक्याच ठसकेबाज पद्धतीने मांडताना सात्विक सादरीकरण खूपच अवघड. त्यामुळे कैक वर्षे आपल्याकडे फडाची लावणी केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित राहिली. धाट, भाषा, तिचा धारदारपणा आणि किंचित अप्रत्यक्ष चावट शारीर उल्लेख यामुळे ‘लावणी’ हा लोककला प्रकार घराच्याच नव्हे, तर गावाबाहेरच्या तंबूपुरता मर्यादित राहिला. लावणीला फडातून बाहेर काढून बैठकीत आणण्याचे आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कामे अनेक गायिकांनी केले असले तरी त्याचे प्रामुख्याने श्रेय सुलोचना चव्हाण यांनाच दिले जाते. 

लावणी सम्राज्ञी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचनाबाईंच्या धारदार आवाजाचा ठसका कायम कानात रुंजी घालत राहील. उषा मंगेशकर, आशा भोसले, रोशन सातारकर, सुरेखा पुणेकर, शोभा गुर्टू, अलीकडचा तरुण आवाज बेला शेंडे अशा जवळपास सर्व मराठी गायिकांनी अनेक लावण्या म्हटल्या आहेत. त्या लोकप्रियही झाल्या आहेत. पण लावणी आणि सुलोचनाबाई यांचे कायम अतूट नाते राहिले, ते त्यांच्या आवाजामुळे. कळीदार कपुरी पान, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, मला हो म्हणतात लवंगी मिरची, पाडाला पिकलाय आंबा, सोळावं वरीस धोक्याचं, खेळताना रंग बाई होळीचा, कसं काय पाटील बरं हाय का या त्यांनी गायलेल्या लावण्या आजही हृदयात स्थान करून आहेत. काही वेळा लावणी आठवते, पण गायिका माहीत नसते. सुलोचनाबाईंच्या लावणीबाबत तसे कधीच झाले वा होणार नाही. याचे कारण त्यांच्या आवाजातील ठसका आणि मादकता. ग्रामीण भागांतील लोकसंस्कृतीचा भाग असलेल्या ‘लावणी’ला शहरांत आणि मध्यमवर्गीय घराघरांत पोहोचवण्यात सर्वात मोठे योगदान सुलोचनाबाईंचे! पूर्वी बहुतांशी मराठी चित्रपट तमाशाप्रधान होते. एखाद दुसरी लावणी असायलाच हवी, असा आग्रह असायचा. अशा वेळी सुलोचना चव्हाण यांचेच नाव पुढे यायचे. सुमारे सहा दशके त्यांच्या लावण्यांनी रसिकांना वेडे केले. 

जेव्हा फडाची लावणी लोकप्रिय होती, तेव्हा सुलोचनाबाईंनी बसून, हातवारे व कोणतेही अंगविक्षेप न करता लावण्या सादर केल्या. पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर विनम्र भाव असलेल्या सुलोचनाबाई मंचावर यायच्या. मात्र, त्यांनी गायला सुरुवात केली की सारा माहोल बदलून जाई. प्रेक्षकांतून फर्माईशी येत, शिट्ट्या येत, काही जण तर पैसे उडवत, समोर नाचायला सुरुवात करीत. पण गातानाही चेहऱ्यावर मार्दव असणाऱ्या या गायिकेने प्रेक्षकांच्या असल्या थेरांकडे कायम दुर्लक्ष केले. गाणी संपली की प्रेक्षकांना वाकून नमस्कार करून त्या तत्काळ रंगमंचाच्या मागे निघून जात. पारंपरिक बैठकीच्या लावणीतही अदाकारी असते. पण सुलोचनाबाईंनी तिलाही थारा दिला नाही. अदाकारीपेक्षा स्वतःच्या आवाजावर त्यांची भिस्त होती. त्यांची लावणी गातानाची छायाचित्रे पाहिल्यास त्या भक्तिगीत म्हणत असाव्यात, असाच भास होईल. जागी हो जानकी, न्याहारी कृष्णाची घेऊनी अशा भक्तिरस असलेल्या अनेक लावण्या त्यांच्या नावावर आहेत. 

आपल्याकडे लोककलेची बराच काळ उपेक्षा झाली.  सुलोचना चव्हाण यांच्या बाबतीतही तेच झाले. त्यांना यावर्षी म्हणजे कारकिर्दीच्या अखेरच्या काळात ‘पद्मश्री’ किताब दिला गेला. लहानसहान पुरस्कार खूप मिळाले; पण बड्या संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव उशिराच केला. अर्थात सुलोचनाबाईंनी कधी त्याची पर्वा केली नाही. सुरुवातीच्या काळात कार्यक्रमाची बिदागीही अत्यल्प असे. काही जण तर ठरल्यापेक्षा कमी देत. त्यांचे पुत्र व प्रख्यात ढोलकीपटू विजय चव्हाण यांनी मात्र नंतर अशा मंडळींना दूर केले; तेव्हा कुठे सुलोचनाबाईंना थोडाफार पैसा दिसू लागला. बैठकीच्या, नृत्य व अदाकारीच्या लावणीला समाजात मान्यता मिळत असताना त्यासाठी आयुष्य घालविलेल्या सुलोचनाबाई आता हयात नाहीत, त्यांच्या लावणीचा ठसका मात्र कधीही उणावणार नाही! sanjeevsabade1@gmail.com