(विशेष)
- महेश चेमटेकाय खाताय यापेक्षा किती खाताय? याचा विचार केल्यास योग्य तो परिणाम मिळतो. वजन वाढवणे म्हणजे मसल्स वाढवणे, असा साधा अर्थ घेता येऊ शकतो. त्यासाठी मांसाहार टाळून ध्येयप्राप्ती करू शकतो. ज्या वेळी व्यायाम करतो त्या वेळी शरीरातील ऊर्जा खर्ची पडते. ती भरून काढण्याठी पनीर, मशरुम, सोयाबीन, मोड आलेली कडधान्ये, सलाड, फळे यांचे सेवन करणे फायद्याचे ठरते. व्यायाम आणि शरीर कमावणे म्हटले की मांसाहार हा ओघानेच येतो. पण या विचार आणि कृतीला छेद देण्याचे काम प्रसाद आंजर्लेकर या युवा फिटनेस ट्रेनरने केले आहे. शुद्ध शाकाहारी राहूनही तुम्ही सिक्स पॅक अॅब्ज करू शकता, असा विश्वास त्याने तरुणांमध्ये निर्माण केला आहे. ‘व्हेजी फिटनेस’ ही चळवळ त्याने त्याच उद्देशाने सुरू केली आहे. शाकाहारातही तुम्हाला बळकट क्षमता आहे, हे त्याने समोर आणले आहे. जिम आणि मांसाहार या समीकरणाला छेद देण्यात तो यशस्वी ठरला आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात खाण्या-पिण्याकडे लक्ष नसते. त्यात ‘जिम’साठी वेळ मिळालाच तर, तेथे डाएट प्लॅन दिला जातो. फिटनेससाठी किंबहुना जिममध्ये व्यायाम केल्यानंतर मांसाहार उपयुक्त ठरतो, असा गैरसमज रुजवण्यात आला आहे. या गोष्टीला छेद देत शाकाहारी राहून तंदुरुस्त राहण्याचा नवा फंडा ‘व्हेजी फिटनेस’ची चळवळ रुजवू पाहणाऱ्या प्रसाद आंजर्लेकरने आणला आहे.. निसर्गत: उपलब्ध असणाऱ्या फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये यांच्या आधारेदेखील तंदुरुस्त राहता येते. पीळदार देहयष्टीसाठीही या गोष्टी महत्त्वाची कामगिरी बजावतात. २०१० साली आंतरराष्ट्रीय व्यायामशाळेत ‘पर्सनल ट्रेनर’ म्हणून प्रसादने करियरला सुरुवात केली. निसर्गाने आपल्याला इतके भरभरून दिले असताना, त्याचा योग्य आणि प्रभावी उपयोग केला पाहिजे या जाणिवेतून त्याने ज्येष्ठांचा सल्ला घेऊन ‘व्हेजी फिटनेस’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली. शरीराची जडणघडण होत असताना निसर्गत: प्रोटिन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स यांचा समावेश शरीरात असतो. मुळात तंदुरुस्त राहणे आणि शरीर कमावणे (बॉडी बिल्डिंग) या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बाह्य शरीर आकर्षक बनविणे हे महत्त्वाचे असले तरी अंतर्गत तंदुरुस्ती तितकीच महत्त्वाची आहे. त्याचबरोबर प्रोटिन, कार्बोहायड्रेट आणि फॅट हे घटक महत्त्वाचे ठरतात. रोजच्या रोज भरपूर पाणी पिणे हे शरीरासाठी फायद्याचे आहे. त्याचबरोबर आपल्याला पुरेशी झोप मिळणेही अत्यंत आवश्यक आहे. शरीराची हालचाल करताना प्रथम आपल्याला कार्बोहायड्रेटमुळे ऊर्जा मिळते. लिहिणे, वाचणे, खेळणे, व्यायाम करणे यामध्ये प्रथम कार्बो नंतर प्रोटिन आणि शेवटी फॅट्सचा वापर शरीराकडून होतो. वजन कमी करताना अनावश्यक फॅट्स कमी करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मग त्यात सूर्यनमस्कार असो, झुंबा नृत्य असो वा जिममधले वर्कआऊट असो. येथे होणाऱ्या श्रमांमधूनही वजन कमी करता येते. थोडक्यात योग्य व्यायाम, डाएट आणि आराम या त्रयींमुळे फॅट्स कमी करून तंदुरुस्त राहता येते, असे तो सांगतो.