शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

वृद्ध आई-बापाला लाथाडणाऱ्या दिवट्यांचे काय करायचे?

By किरण अग्रवाल | Updated: February 28, 2023 08:05 IST

आई-बापाची शेतीवाडी नावावर करून घेऊन म्हातारपणी त्यांना सांभाळण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कशी आणि का दिसते आहे?

- किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माणूस सोशल झाला, असे लाख म्हटले जात असले, तरी ते कसे फसवे, दिशाभूल करणारे व निखालस खोटे आहे, हे लक्षात आणून देणारी उदाहरणे कमी नाहीत. या फसव्या सामाजिकतेमागे दडलेला ढोंगी, विद्रुप व संवेदनाहीन चेहरा लपता लपत नाही, अन्यथा बापजाद्यांची शेतीवाडी नावावर करून घेऊन आईच्या म्हातारपणी तिचे पालन पोषण करण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कधी दिसली असती?

वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडीच्या एका ७२ वर्षीय वृद्ध स्त्रीला आपल्या उदरनिर्वाहासाठी सरकारी उंबरठे झिजवावे लागल्याची घटना अलीकडेच समोर आली आहे. कोरोनामुळे तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिच्या तिन्ही मुलांनी वडिलांची शेती आपल्या नावे करून घेतली व आईला वाऱ्यावर सोडले. अखेर या मातेने सरकारी हेल्पलाईनद्वारे आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचल्यावर तिला न्याय मिळाला. गेल्या ऐन दिवाळीच्या दिवशी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातही एका वृद्धेला तिच्या पोराबाळांनी बेवारसपणे रस्त्यावर सोडून दिल्याचे प्रकरण समोर आले होते. आई-वडिलांची संपत्ती लाटून घेतल्यावर त्यांना बेवारस सोडून देणाऱ्या या व अशा घटनांमधून जीवनातील भेसुरताच समोर येते.

समाज माध्यमांवरील अंगठेबाज प्रतिसादाने हुरळून जात स्वतःचे ‘सोशल’ असणे सिद्ध करू पाहणाऱ्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या घटना आहेत. अशा घटना अपवादात्मक  असतात हे खरे, पण या शितांवरून समाज नावाच्या अक्राळविक्राळ पातेल्यात शिजत असलेल्या भाताच्या दर्जाची कल्पना येतेच येते! या घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्या म्हणून त्यांच्या बातम्या झाल्या आणि घरोघरी चाललेल्या कहाण्यांचे काही तुकडे समोर तरी आले. पण अनेक घरांमध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असलेली व अडगळीत पडलेली जी वृद्ध मंडळी आहेत त्यांच्या वाट्याला आलेल्या घुसमटल्या त्रासाचे काय? विशेषत: संयुक्त कुटुंब पद्धतीतून बाहेर पडलेल्या एकल कुटुंबातील वृद्धांच्या नशिबी आलेले एकाकीपण व त्यातही आपल्याच रक्ताच्या माणसांकडून होणारी उपेक्षा ही जिवंतपणी किती मरणयातना देणारी असेल, याचा विचारच संवेदनशील माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारा आहे. 

वृद्ध माता-पित्यांच्या संगोपनाची जबाबदारी उचलावयास भाग पाडणारा कायदा आपल्याकडे आहे खरा, पण पोरांच्याच अब्रूचे धिंडवडे निघू नयेत म्हणून वेदनेने भळभळणाऱ्या जखमा उरात बाळगून अनेक मायबाप त्यांचे म्हातारपण अक्षरश: ओढत असतात.  सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी अनेकांची अडचण आहे. कायदा असूनही हात टेकले जातात, कारण चारचौघात आपल्या घरातली ओंगळ धुणी धुण्याची लाज वाटते! पूर्वी निदान घराघरात आई-वडिलांच्या सांभाळाकडे नजर ठेवून  असलेली समाजव्यवस्था तरी तरुण जोडप्यांवर वचक ठेवीत असे. आता तर काय सगळ्याच बाबतीत समाजाला फाट्यावर मारण्याचाच रिवाज असल्याने ‘लोक काय म्हणतील?’ याची भीतीही सैल झाली आहे. त्यामुळे ना नात्यागोत्यातल्या लोकांची पर्वा, ना लोकलज्जेची. अशा स्थितीत घरातले ज्येष्ठ लोक दुर्लक्षाचे धनी होऊ लागले आहेत. आधीच जुनी घरे पाडून उभ्या राहात असलेल्या नवीन घरात म्हाताऱ्या माणसांच्या हक्काच्या जागा गमावल्या गेल्या आहेत. जुन्या घरात म्हातारा-म्हातारी अंगण, ओसरीत वावरत असत, आता ओसरी गेली आणि खेड्यातल्या घरातसुद्धा म्हाताऱ्यांची खाट  मागच्या दाराला गेली. हे कमी  म्हणून की काय, आता त्यांची  शेतीवाडी लुबाडून आई-वडिलांना थेट वाऱ्यावर सोडताना लोकांना काही वाटेनासे झाले आहे.

आपण खूप प्रगती केली. अगदी चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळावर पाणी शोधायला निघालो; मोबाईलमुळे अवघे जग मुठीत आले व त्यातूनच आपण सोशल व्हायला निघालो, पण खरंच झाले का तसे? अलीकडे बुवा, बाबा, प्रवचनकारांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यांचे मांडव भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहताना दिसतात. पण हे सारे पालथ्या घड्यावर पाणीच म्हणायचे का? मुलेबाळे असूनही वृद्धांना उदरनिर्वाहासाठी पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागत असेल, तर काय उपयोग या प्रगतीचा व सत्संगाचा?     kiran.agrawal@lokmat.com