शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

‘घाणेरड्या तोंडांचे काय?’

By admin | Updated: April 9, 2015 00:03 IST

तुम्ही सडका स्वच्छ करता, पण तुमच्या खासदारांच्या घाणेरड्या तोंडांचे काय?’ असा रोकडा सवाल एका वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना विचारला आहे

तुम्ही सडका स्वच्छ करता, पण तुमच्या खासदारांच्या घाणेरड्या तोंडांचे काय?’ असा रोकडा सवाल एका वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींना विचारला आहे. दिलीप गांधी या भाजपाच्या खासदाराने तंबाखूच्या सेवनाचे जे जाहीर समर्थन चालविले आहे त्यासंदर्भात हा प्रश्न विचारण्यात आला आहे. तंबाखू सेवनावर व धूम्रपानावर क्रमाने नियंत्रण व बंधन आणण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याच्या आखणीसाठी त्याने संसदेची एक समितीही नियुक्त केली आहे. परंतु या समितीवर असलेले काही खासदारच बिड्या आणि तंबाखूचे कारखानदार व व्यापारी आहेत. तंबाखूवर येणारी बंदी या खासदारांचे खरे उत्पन्न बुडविणारी आहे. आपले हित आणि समाजाचे हित यात विरोध उभा राहिला तर लोकनेत्यांनी समाजाच्या बाजूने उभे होणे अपेक्षित आहे. परंतु धंदेवाल्या लोकप्रतिनिधींना एवढा विवेक उरत नाही. दिलीप गांधींचे स्वत:चे बिडीचे कारखाने व तंबाखूचा व्यापार आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या बंदीला विरोध करताना ‘तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सर होतो हे अजून सिद्धच झाले नाही’ असे त्यांनी म्हटले आहे. जगभरचे वैद्यक तज्ज्ञ तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होतो ही गोष्ट गेली कित्येक वर्षे जगाच्या कानीकपाळी ओरडून सांगत आहेत. अनेक देशांनी सिगारेटी व तंबाखूवर नियंत्रणही आणले आहे. पाश्चात्त्य देशांच्या सिनेमात देखील एखादा नट धूम्रपान करताना दाखविला जात असेल तर त्याचे धूम्रपान सुरू होण्याआधी ‘धूम्रपान जीवाला अपाय करणारे आहे’ अशी सूचना पडद्यावर दाखविली जाते. भारतात सिगारेटच्या पाकिटांवर तशी सूचना छापणे कायद्याने बंधनकारक केले आहे. पण मोदींच्या पक्षाचे खासदार असलेले दिलीप गांधी स्वत:च्या धंद्याचा बचाव करण्यासाठी या नियंत्रणाविरुद्ध बोलायला पुढे आले आहे. त्यांच्या पक्षातील आणखीही दोन खासदारांनी या नियंत्रणाला विरोध केला आहे. मुंबईतील हिकमती पान व्यापाऱ्यांनी त्यासाठी त्यांच्या सत्काराचेही आयोजन केले आहे. बिडी आणि तंबाखूचे कारखानदार त्यांच्या धंद्यासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतात याचे उदाहरण गडचिरोली या महाराष्ट्रातील जिल्ह्यात सापडणारे आहे. आपल्या कारखान्याला लागणारा बिडीपत्ता त्या जिल्ह्यातील जंगलातून बिनबोभाटपणे यावा यासाठी त्याचे कारखानदार तेथील नक्षलवाद्यांना पैसे पुरवितात ही जगजाहीर म्हणावी अशी बाब आहे. जोवर असे कारखानदार आणि पुढारी समाजात सन्मानाने मिरवितात तोवर तंबाखू थांबणार नाही आणि तंबाखू थांबायचा नाही आणि नक्षलवाद्यांनाही आवर बसायचा नाही. अशा पुढाऱ्यांना आवरायचे आणि समाज स्वच्छ करायचे सोडून नरेंद्र मोदी सडका झाडायला आणि माणसे दुरुस्त करायला निघाले असतील तर त्यांना विचारलेला उपरोक्त प्रश्न रास्त म्हणावा असाच आहे. मात्र एवढ्यावर मोदींची जबाबदारी संपत नाही. त्यांच्या पक्षातील खासदारांना आणि सरकारातील मंत्र्यांना याहून विपरीत, विघातक व समाजविरोधी वक्तव्ये करताना देशाने पाहिले आहे. निरांजना आणि गिरिराज सिंग हे मंत्री ज्या वाचाळपणे बोलतात ते पाहता त्यांना अटक का केली जात नाही हाच प्रश्न एखाद्याला पडावा. साक्षीबुवा, गोरक्षनाथ आणि त्यांच्यासारखे अनेक खासदार तरी फौजदारी खटल्यापासून दूर कसे राहतात हेही आपल्याला न समजण्याजोगे आहे. ‘मोदींच्या विरोधकांनी हा देश सोडून सरळ पाकिस्तानात जावे’ असे सांगणारे आणि देशातील जनतेचे ‘रामजादे आणि हरामजादे’ असे विभाजन करणारे खासदार तुरुंगाबाहेर कसे राहू शकतात हाही अचंबा करण्याजोगा प्रश्न आहे. मंत्री आणि खासदारांची ही गोष्ट तर बाकीचे वाचाळ तर मोकाटच आहे. ‘हिंदू स्त्रियांनी चार पोरे जन्माला घातलीच पाहिजे’ इथपासून ‘त्यांनी दहा पोरांना जन्म दिला पाहिजे’ यासारखी भाषा फक्त आपल्या देशात का खपवून घेतली जाते? हे बोलणारी माणसे समाजाचे, पक्षाचे, एखाद्या संघटनेचे वा राजकारणाचे नेतृत्व तरी कशी करू शकतात? त्यातले काही शंकराचार्यांच्या वंदनीय पीठावर कसे चढून बसले असतात? मोदींनी तरी कशा-कशाला आणि कोणा-कोणाला आवर घालायचा? त्यांनी मंत्रिमंडळ सांभाळायचे, सांसदीय पक्ष सांभाळायचा, सगळा भारतीय जनता पक्ष जपायचा की संघ परिवारातील इतरांवर लक्ष ठेवायचे? त्यांच्याजवळची बोलघेवडी माणसे पाहिली की त्यांचे यातल्या कोणावरही फारसे नियंत्रण नसावे असे वाटू लागते. मंत्री ताब्यात नाहीत, खासदार ऐकत नाहीत आणि संघही फारसे जुमानत नाही असे त्यांच्या नेतृत्वाचे चित्र अशावेळी समोर येते. अशा नेत्याला मग जवळच्या लोकांची घाणेरडी तोंडे बंद वा स्वच्छ करण्यापेक्षा सडका व नाल्या साफ करणे सोयीचे व आनंदाचे वाटत असणार. ‘त्या’ माणसांना आवर घालण्याचा प्रयत्न मोदींनी केला तरी त्यांना त्यांचा पक्ष व परिवार साथ देईल याचीही खात्री कोण देऊ शकेल? म्हणून साक्षीबुवा ते दिलीप गांधी यांचे अनावर होणे देशाला सहन करणेच भाग पडते. आश्चर्य याचे की मोदींनी अशा माणसांना दुरान्वयानेच आजवर इशारे दिलेले दिसले. त्यांनी त्यांच्यातल्या कोणावरही कडक कारवाई केल्याचे उदाहरण नाही. पंतप्रधान कारवाई करीत नाहीत व पक्षाध्यक्ष दुर्लक्ष करतात या स्थितीत साक्षीबुवा आणि दिलीप गांधी असेच बोलत राहणार आणि त्यांना कोणाचे भयही नसणार.