काश्मीरातील जनतेशी भावनिक नाते निर्माण करण्याबाबतच्या केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या इराद्यावर दुमत होण्याचे कारण नाही. प्रश्न ते कसे निर्माण करणार हा आहे. तो बंदुकीच्या गोळ्यांच्या माध्यमातून होऊ शकत नाही हे उशिराने का होईना ओळखून सुरक्षा दलांनी बंदुकीचा वापर न करण्याच्या त्यांनी दिलेल्या आदेशाचेही स्वागतच होईल. पण ही विधाने करण्यापूर्वी काश्मीरातील हिंसाचारास पाकिस्तान आणि त्याचे घुसखोर हस्तक जबाबदार आहेत हा स्वत:चे दुबळेपण उघड करणारा पवित्रा सरकारने घेतला होता हेही नजरेआड करता येत नाही. पाकिस्तानची काश्मीरवर असलेली नजर साऱ्या जगाला ठाऊक आहे. आपले घुसखोर आणि त्यांच्या वेशातील सैनिक त्या प्रदेशात पाठविणे आणि त्यात अशांतता माजविणे हा त्या देशाचा उद्योगही साठ वर्षांएवढा जुना आहे. या घुसखोरांना सीमेवर अडविणे, त्यांना मारणे, ते करताना आपल्या सैनिकांना शहिदी मरण येणे आणि एक चकमक संपल्यानंतर काही काळातच तेथे दुसरी सुरू होणे हा प्रकारही आता नित्याचा झाला आहे. भारताने बचावाचा पवित्रा टाकून आक्रमक बनावे आणि आपले सैन्य किमान पाकिस्तानव्याप्त काश्मीरात घुसवून तेथील घुसखोरांचे अड्डे नाहीसे करावे असे वीरश्रीयुक्त आवाहन सरकारला करणारे भोळसट देशभक्त भारतातही आता बरेच झाले आहेत. पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याची जराही जाणीव नसणाऱ्या अशा माणसांची दखल सरकार घेत नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. भारताच्या शस्त्रागारात ११० तर पाकिस्तानच्या शस्त्रागारात ३७६ अणुबॉम्ब आहेत. भारताचा आजवरचा सारा भर लोककल्याणावर तर पाकिस्तानचा त्याचे लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर राहिला आहे. शिवाय त्याच्या शेजारचा शक्तिशाली चीन हा त्याचा मित्र आहे आणि भारताचा एकही शेजारी त्याचा मित्र नाही. असलाच तर तो सामर्थ्यवान नाही. ‘पाच मिनिटांच्या आत दिल्लीची राखरांगोळी करू’ ही पाकच्या लष्करी अधिकाऱ्याची भाषा कवितेतली नाही, वास्तवातली आहे. त्यामुळे येथे आक्रमकतेचा उपदेश वा कांगावा करणाऱ्यांनाच जास्तीचे शहाणे होण्याची गरज आहे. भारतापुढचा खरा प्रश्न काश्मीरातील ७२ लक्ष नागरिकांना आपलेसे करून घेण्याचा आहे. हा वर्ग भारताविरुद्ध दर महिन्यात उठून उभा होत असलेला आणि भारताच्या पोलिसांशी व सुरक्षा व्यवस्थेशी लढत देतानाच एवढ्यात दिसला आहे. काश्मीरात निवडणुका होतात, विविध पक्षांची सरकारे तेथे सत्तेवर येतात. ती बहुदा सगळीच कमालीची दुबळी आणि भ्रष्ट असतात हाही इतिहास आहे. पूर्वीची काँग्रेसानुकूल सरकारे जाऊन आता तिथे भाजपा व पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीचे मेहबूबा मुफ्ती सरकार सत्तेवर आले आहे. केंद्रात मोदींचे भाजपा सरकार आहे. मात्र जे पूर्वीच्या सरकारांना जमले नाही ते याही सरकारला जमत नसल्याचे जगाला दिसत आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर राजकारणाहून अन्यत्र शोधण्याची गरज आहे. सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्ष राजकारण ही काश्मीरातील आताच्या अशांततेवरची खरी उत्तरे आहेत. मात्र या उत्तरांची नुसतीच राजकीय ओढाताण करणारे राजकारण देशात आहे. काश्मीरच्या जनतेला जास्तीची स्वायत्तता हवी आहे तर केंद्रातील भाजपा सरकारला ३७० वे कलम लादून तिथे असलेली स्वायत्तता नाहीशी करायची आहे. ते करण्याच्या कामी संघातून भाजपात गेलेले त्या पक्षाचे राममाधव नावाचे नको तेव्हा नको ते बोलणारे पुढारी लागले आहेत. काँग्रेसला धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने हा प्रश्न निकालात निघेल असे वाटते. मात्र तशी धर्मनिरपेक्षता त्या पक्षालाही, नेहरूंच्या काळाचा अपवाद वगळला तर काश्मीरबाबत कधी दाखविता आलेली नाही. सरकार आणि लोक तसेच नेते आणि अनुयायी यांच्यातले सामंजस्य व ऐक्य हेच राज्य यंत्रणेचा खरा आधार असते. त्यांच्यात विसंवाद असेल तर कोणतेही सरकार स्थिर होत नाही आणि जनताही कधी शांत राहात नाही. एकेकाळी असा लोकविरोध मणीपूर या राज्यात होता. तो शमवायला इंदिरा गांधींनी मणीपुरातली लाल डेंगा या बंडखोर पुढाऱ्यालाच हाताशी धरले व त्याच्या हाती त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवून त्याच्यावर तेथील शांततेची जबाबदारी टाकली. इंदिरा गांधींनी मणिपुरात चोखाळलेला हा मार्ग कधी तरी काश्मीरातही अवलंबावा असा आहे. दुर्दैव हे की तेथील जनतेतही सर्वमान्य होणारे नेतृत्व आज नाही. शेख अब्दुल्लांचा अपवाद वगळता त्या संबंध राज्याचे नेतृत्व व प्रवक्तेपण करणारा दुसरा नेता तेथे झाला नाही. नेतृत्व नसते तेव्हा लोक असतात आणि विकासाच्या मार्गाने त्यांना आपलेसे करून घेता येणे शक्य होते. केंद्र व काश्मीरचे सरकार यांच्यासमोर आज तोच एकमेव मोकळा मार्ग आहे. ते तो चोखाळत नाहीत आणि लोक आपल्या बाजूने आणणे त्यांना जमत नाही. पोलिसांवर आणि लष्कराच्या पथकांवर दगडफेक करणारे काश्मीरातील शेकडो स्त्रीपुरुष ही भारतासमोरची व काश्मीरातली सर्वात मोठी समस्या आहे. काश्मीर भारताचे आहे हे सांगण्यासाठी सारा इतिहास व कायदे पुढे करता येतील. मात्र ‘तुमचे लोकच तुमच्याशी का लढतात’ या प्रश्नाचे उत्तर दिल्याखेरीज आपले म्हणणे कोणी खरेही मानणार नाही.
आपल्या भूमिकेमागे लोकमत हवे
By admin | Updated: July 26, 2016 02:25 IST