The voice of the oppressed Ravish Kumar | दबलेल्यांचा आवाज रवीशकुमार
दबलेल्यांचा आवाज रवीशकुमार

ठळक मुद्देरविवार विशेष जागर

- वसंत भोसले

वृत्तवाहिनीवरील पत्रकारितेला वेगळे आयाम देणारे म्हणून रवीशकुमार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची नजर नेहमीच आवाज नसलेल्या लोकांना आवाज देण्याचा प्रयत्न करते. प्रसंगी त्यांनी पत्रकारितेतील उथळपणा व प्रचारकी थाटाच्या वृत्तांतांवर टीका केली आहे. पत्रकारितेतील एक मानदंड म्हणून पाहिल्या जाणाऱ्या रवीशकुमार यांना यंदाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला, त्यानिमित्त...


‘शौक-ए-दिदार है, तो नजर पैदा कर!’ या भूमिकेतून तयार झालेली नजर नेहमीच दबलेल्या माणसांना शोधत असते. त्यांचा आवाज बनून माणसांच्या आजूबाजूच्या जीवनाचे चित्रण करीत असते. मला आठवते की, महान कुस्तीगीर सुशीलकुमार यांनी काही वर्षांपूर्वी आशियायी स्पर्धेत पदक मिळविले होते, तेव्हा एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार छायाचित्रकाराला घेऊन दिल्लीचे आखाडे पाहायला गेले होते. त्यांची नजर ही हे कुस्तीगीर येतात कोठून? राहतात कोठे? त्यांना तयार कोण करते? त्यांचे जीवन कसे आहे? रवीशकुमार बोलत होते आणि सोबतचा कॅमेरा जे चित्रण दाखवित होता, हे पाहून मन हेलावून जात होते. देशाच्या राजधानीत आशियायी स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई करणारे कुस्तीगीर झोपडपट्टीतील अवस्थेपेक्षा खराब परिस्थितीत राहत होते. देशासाठी पदक जिंकल्यावर टीव्हीवरच दिसणारे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान त्यांच्या महालात अशा कुस्तीगिरांना सन्मानित करतात. साºया देशाचे लक्ष वेधले जाते. आपलेही मन भरून येते. अभिमान वाटतो. मात्र, हा देशाला अभिमान देणारा कुस्तीगीर तयार कसा होतो? त्याची जिंदगी काय दर्शविते, हे पाहण्याची आणि दाखविण्याची नजर केवळ रवीशकुमार यांच्याकडेच होती. त्या दिवसापासून हा पत्रकार नजरेत भरला आहे.
आशिया खंडातील देशांमध्ये विविध पाच क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना ‘रॅमन मॅगसेसे’ अवॉर्ड दरवर्षी दिले जातात. आतापर्यंत पत्रकारितेच्या क्षेत्रातील चार भारतीय पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेतील सत्य शोधण्याचा प्रयत्न, त्यासाठी दाखविलेले धाडस, धैर्य आणि बुद्धिमत्ता यांचा गौरव करण्यात आला आहे. अमिताभ चौधरी, बी. जी. वर्गिस, अरुण शौरी, पी. साईनाथ आणि २०१९ला गेली २३ वर्षे सलग एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीबरोबर काम करणारे व्यवस्थापकीय संपादक रवीशकुमार पांड्ये यांना जाहीर झाला आहे. १९५८ मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली. फिलिपाईन्सचे केवळ ४९ वर्षांचे आयुष्य लाभलेले सैनिक आणि चार वर्षे राष्ट्राध्यक्ष झालेले रॅमन डेल फाइरो मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. विसाव्या शतकात जन्मणारे (३१ आॅगस्ट १९०७) आणि फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच राष्ट्राध्यक्षपदी निवडलेले रॅमन मॅगसेसे यांनी नेहमी सार्वजनिक जीवनातील धडाडी आणि शौर्याला महत्त्व दिले. ३० डिसेंबर १९५३ ते १३ मार्च १९५७ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा विमान अपघातात वयाच्या ४९ व्या वर्षी मृत्यू झाला.

एक सैनिक ते राष्ट्राध्यक्ष झालेले रॅमन मॅगसेसे यांना युद्धकलेबरोबरच प्रशासन, राजकीय नेता, स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी हक्क यांविषयी प्रचंड आकर्षण होते. त्यांची निष्ठा होती. त्यामुळे विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेतील रॉकेफेलेर ब्रदर्स फंड या संस्थेने पुढाकार घेऊन फिलिपाईन्स सरकारशी वाटाघाटी करीत रॅमन मॅगसेसे यांच्या नावे पुरस्कार देण्याची योजना आखली. त्यासाठी मोठा निधी देण्यात आला. त्यातूनच १९५८ पासून सामाजिक कार्य, प्रशासकीय सेवा, पत्रकारिता-साहित्य, कला, समाज सुधारणा आणि आश्वासक नेतृत्व देणारा चेहरा, आदी विभागांत रॅमन मॅगसेसे अवॉर्ड देण्याची घोषणा करण्यात आली. १९५८ मध्ये पहिल्या वर्षीचे पुरस्कार जाहीर झाले. त्यात आचार्य विनोबा भावे यांचा समावेश होता. भूदान चळवळीद्वारे त्यांनी मोठी समाजसुधारणा करण्यासाठी उचललेल्या पावलांचा तो गौरव होता. दुसºयावर्षी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर, देशाचे पहिले अर्थमंत्री आणि भूतपूर्व प्रशासकीय अधिकारी चिंतामणी देशमुख यांना जाहीर झाला होता. भारतातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींना हा सन्मान आजवर मिळाला आहे. बाबा आमटे, जयप्रकाश नारायण, वर्गिस कुरियन, अरुण शौरी, अरविंद केजरीवाल, डॉ. राजेंद्रसिंह, मदर तेरेसा, पांडुरंग शास्त्री आठवले, सत्यजित रे, किरण बेदी, टी. एन. शेषन, एम. एस. सुब्बलक्ष्मी, मणीभाई देसाई, बाणू कोयाजी, आर. के. लक्ष्मण, महाश्वेता देवी, आदींचा त्यामध्ये समावेश आहे. हा पुरस्कार म्हणजे आशिया खंडातील नोबेल पुरस्कार असा मानला जातो. या खंडातील देशांमधीलच नागरिकांची यासाठी निवड केली जाते.

पत्रकारितेतील पुरस्कारासाठी पुन्हा एकदा भारतीय पत्रकार रवीशकुमार पांड्ये यांची निवड झाली आहे. वृत्तवाहिनीवरील पत्रकारितेला एक वेगळे आयाम देणारे म्हणून रवीशकुमार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची नजर ही नेहमीच आवाज नसलेल्या लोकांना आवाज देण्याचा प्रयत्न करते. प्रसंगी त्यांनी पत्रकारितेतील उथळपणा आणि प्रचारकी थाटाच्या वृत्तांतांवर टीका केली आहे. वृत्तवाहिनीवरील होणाºया भंपक चर्चेवरही त्यांनी कोरडे ओढले आहेत. भारतातील वृत्तवाहिन्यांवरील या चुकीच्या पद्धतीने होणाºया पत्रकारितेवर सातत्याने टीका केली आहे. पत्रकारितेची भूमिका काय असू शकते आणि त्यांची भूमिका कोणती असावी, याचे नवे मापदंड निर्माण करणारे रवीशकुमार आहेत.

बिहारमधील मोतिहारीमध्ये ५ डिसेंबर १९७४ रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण मोतिहारीत झाल्यानंतर पाटणा येथील लोयोला हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी त्यांनी राजधानी दिल्ली गाठली. देशबंधू महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळविली आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेची पदवी मिळविली. सुरुवातीला ‘जनसत्ता’ या दैनिकात काम करून वयाच्या सव्वीसाव्या वर्षी ते एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीत काम करू लागले. त्यांना एक नजर मिळाली आहे, जी सर्वांनाच असते. पण, त्यांची नजर लोकांच्या जीवनातील चढ-उतार शोधण्यात मग्न असते. त्यांनी आजवर मांडलेले विषय पाहिले तर शोधपत्रकारितेला एक वेगळा मार्ग त्यांनी दाखविला आहे, हे स्पष्ट होते.

आवाजात नव्हे, तर आपण जी मांडणी करतो, त्या शब्दांत ताकद हवी, अशी त्यांची भूमिका आहे. ती मांडण्याचा आग्रहही धरणारे ते देशातील सध्यातरी आघाडीवरचे पत्रकार आहेत. यासाठी त्यांचा रात्री नऊचा प्राईमटाईम कार्यक्रम पाहायला हवा. त्यातून वृत्तवाहिनीवरील पत्रकारिता काय असू शकते, याची माहिती होते. एखादा विषय घेऊन त्याच्या खोलात जाणे, सर्व बाजूने तो विषय मांडणे आणि शासन असो, प्रशासन असो, नेता असो की समाज असो, ज्यांची चूक असेल त्यांना समोर आणण्याचे कार्य ते करीत असतात. त्यांच्या आवाजातील तो दमदारपणा, ओघवती हिंदी भाषा, आवाजातील उत्तम चढ-उतार आणि शब्दांतील ताकद ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये आहेत.

त्यांनी आजवर असंख्य विषय हाताळले आहेत. काही महिन्यांपूर्वी देशातील विद्यापीठांच्या कारभाराविषयींचा पर्दाफाश करणारी वृत्तमालिकाच सादर केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत येऊन राहणाºया आणि मतदानासाठी उत्तर प्रदेश, बिहार, बंगालकडे जाणाºया तरुणांना रेल्वेत गाठले होते. या राज्यांतील हजारो तरुण पोट भरण्यासाठी स्थलांतरित होतात आणि जेथे राहत नाहीत, त्या मतदारसंघात लोकसभेचे प्रतिनिधी निवडण्यासाठी जातात. ही सर्व यंत्रणा कशी काम करते? या तरुणांना नवा संसद सदस्य निवडण्याची चिंता असते की, याची यंत्रणा कोण राबवितात? पोट भरण्यासाठी बाहेर पडलेली मिसरूड फुटलेली ही तरुण मुले राजकारणाकडे कसे पाहतात, हा विषय त्यांनी उत्तम पद्धतीने मांडला होता. त्यातून मागास राज्यांतील ग्रामीण भागाचे चित्रण होते. आर्थिक प्रश्नांचे विश्लेषण होते. स्थलांतरित जगण्याचे दु:ख होते आणि महासत्तेच्या वाटेवरील भारताचे खरे चित्र मांडणारेही होते.

देशातील बेरोजगारीच्या प्रश्नांवर त्यांनी वृत्तमालिका केली होती. ‘प्राईमटाईम’, ‘हम लोग’, ‘रवीश की रिपोर्ट’, अशी नावेसुद्धा त्यांच्या कार्यक्रमांची आहेत. ‘दी फ्री व्हॉईस आॅन डेमोक्रेसी, कल्चरल अ‍ॅन्ड द नेशन’ या नावाने त्यांनी पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या शोधपत्रकारितेबद्दल रामनाथ गोयंका पुरस्कार दोनवेळा मिळाला आहे. मुंबई प्रेस क्लबचा ‘रेड इंक अवॉर्ड’, ‘कुलदीप नायर’ प्रथम पुरस्कार त्यांना मिळाला आहे. एकोणीस वर्षांपूर्वी त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सर्वप्रथम गौरविण्यात आले होते. नयना दासगुप्ता या इतिहासाच्या प्राध्यापिकेशी विवाहबद्ध असलेल्या रवीशकुमार यांचा आग्रह नेहमी आपण पत्रकारही सामान्य नागरिक आहोत. आपलीही काही जबाबदारी आहे. समाजाप्रती बांधीलकी आहे. यासाठी समाजात वितुष्ट निर्माण होईल अशी पत्रकारिता असू नये, याचा त्यांनी नेहमीच आग्रह धरला आहे.

पत्रकार म्हणून वावरताना त्याची झूल अंगावर घालून ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ असता कामा नये, अशी भूमिका ते मांडतात आणि समाजाचे मूलभूत प्रश्न मांडले पाहिजेत, त्या प्रश्नांची कारणमिमांसा केली पाहिजे, हा त्यांचा नेहमीच आग्रह धरला आहे. पत्रकार म्हणून वावरताना त्याची झूल अंगावर घालून ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ असता कामा नये, अशी भूमिका ते मांडतात आणि समाजाचे मूलभूत प्रश्न मांडले पाहिजेत, त्या प्रश्नांची कारणमिमांसा केली पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. यासाठी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे, त्याऐवजी सत्ताधाऱ्यांची आरती ओवाळणाºयांवर ते नेहमी ताशेरे ओढतात.

याचा अर्थ सत्ताधाºयांना झोडपणे नव्हे, तर समाजाचे प्रश्न शास्त्रीय पद्धतीने, अभ्यासपूर्ण मांडून ते का सोडवित नाहीत? असा सवाल उपस्थित केला पाहिजे, असे ते मानतात. यासाठीच त्यांची पत्रकारिता आहे. ते कधी आरडाओरडा करून बोलत नाहीत. मात्र, आरडाओरडा करणाºयांपेक्षा त्यांच्या बोलण्यात अधिक वजन असते. म्हणूनच आपण पत्रकार आहोत म्हणजे कोणालाही धमकाविण्याचा अधिकार मिळाला, असे समजण्याचे कारण नाही. किंबहुना पत्रकारितेच्या माध्यमातून एक दहशत निर्माण करण्याच्या प्रवृत्तीविरुद्धही त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जो धुमाकूळ घालण्यात येतो, त्यावर त्यांची प्रचंड नाराजी आहे. स्वयंटीका करण्यात कमीपणा ते मानत नाहीत. एकदा त्यांनी प्राईमटाईम कार्यक्रमात पडद्यावर काही न दाखविता पडदा काळा करून सलग तीस मिनिटे वृत्तनिवेदनाच्या आधारे पत्रकारितेतील विकृत प्रवृत्तींवर प्रहार केला होता. त्यांना मॅगसेसे अवॉर्ड जाहीर झाल्यावर त्या कार्यक्रमाचा काही भाग एनडीटीव्हीने दाखविला होता. त्यावेळी त्यांच्या शब्दातील धार आणि वजन लक्षात येत होते.

मुद्रित साप्ताहिके, पाक्षिके, मासिके आणि दैनिके असा प्रवास करीत आज आपण सोशल मीडियापर्यंत पोहोचलो आहोत. यामधील काळ रेडिओ आणि वृत्तवाहिन्यांचा आहे. यापैकी रेडिओने एका मर्यादेपर्यंत आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. वृत्तवाहिन्यांनी पोरखेळपणा मांडला आहे, याचा त्रास सामान्य माणसाला होणार नाही, याचा आग्रह ते धरतात.
पत्रकारितेतील एक मानदंड म्हणून त्यांच्याकडे आता पाहिले जाते. परवा त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर प्रतिक्रिया देताना, ‘सामान्य माणसांसारखे जगावे, ही धावपळ थांबून घरी स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाक करून आनंदाने कुटुंबियांशी एकत्र जेवण करावे.’ कायम जमिनीवर पाय ठेवून सर्वसामान्य माणसांसाठी पत्रकारिता करणारे रवीशकुमार यांचे पत्रकारितेला नवे गांभीर्य प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नांचा गौरव झाल्याबद्दल अभिनंदन!


Web Title:  The voice of the oppressed Ravish Kumar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.