मोरेश्वर बडगे
त्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. म्हणजे अजून चांगले पाच महिने आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. लोकसभेचे निकाल कसे लागतात त्यावर विधानसभा निवडणुकीतील गणिते ठरतील. आजच्या तारखेला कशाचा काही पत्ता नसताना दोन्ही काँग्रेसने आपण एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर करून टाकल्याने अनेक इच्छुक उमेदवारांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. सुरुवातीला राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी व नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधितांची बैठक घेऊन पुन्हा एकदा सर्वशक्तीने रणशिंग फुंकले. आढावा बैठकीला आलेल्या काँग्रेसच्या अनेक जिल्हाध्यक्षांनी ‘विधानसभेची निवडणूक तरी स्वतंत्र लढवा’ असा आग्रह धरला. नेहमी येणारे अनुभव या वेळीही या जिल्हाध्यक्षांना आले असणार. पण दोघांनीही आघाडीधर्म पाळला, असा दोन्ही सुप्रिमोंचा सूर आढळला. चांगले लक्षण आहे. एकत्रित लढणार असले तरी विधानसभेच्या जागावाटपाचे काय? लोकसभा निवडणुकीचे निकाल उलटेपालटे लागले तर जागावाटप कसे राहील? गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादीला आपला बाडबिस्तरा आठ जागांमध्ये गुंडाळावा लागला. गेल्या निवडणुकीएवढय़ाच म्हणजे २६ जागा काँग्रेसने लढल्या तर राष्ट्रवादीने २२. आता काँग्रेसचा १0 जागांमध्ये गेम झाला तर काय? लोकसभेच्या पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघात जागांचे वाटप कसे राहील? लोकसभा निकालाच्या हिशेबाने जागावाटप होणार आहे की जुने सूत्र तसेच पुढे चालणार आहे? आज या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळणे अवघड आहे. गेल्या पाच वर्षांत राजकारण बरेच बदलले आहे. स्थानिक समीकरणे प्रभावी झाली आहेत. आम आदमी पार्टी हा नवा पहिलवान मैदानात आला आहे. त्यामुळे आघाडीच्याच नव्हे तर युतीच्या मित्र पक्षांनाही जागांचे फेरवाटप करणे भाग पडणार आहे.
सत्ता कायम राखण्याचे आव्हान बाबा-दादांपुढे आहे. अँटी-इन्कमबन्सी फॅक्टर मोठा आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. प्रचार यंत्रणेच्या लढाईत आम्ही कमी पडलो, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे. खरेही आहे. पण आता बोलून काय उपयोग?
लोकसभेचे निकाल कसेही लागो, राज्यातल्या निवडणुकीची धुरा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच राहील. कारण सर्वांना चालेल असा नेता काँग्रेसकडे नाही. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना आपल्यातले नेतृत्वगुण दाखवण्याची चांगली संधी होती. ती त्यांनी घालवली. आता तर दिग्रस-दारव्ह्यातूनही लढण्याची हिंमत ते करणार नाहीत, एवढी वाईट हवा आहे. विदर्भात मोघे-देवतळे आणि तिकडे भुजबळ-तटकरे हे मंत्री निवडून आले, तर मंत्रिमंडळात चार जागा रिकाम्या होतात. मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ फेरबदल करण्याची संधी हे चौघे देतील, अशी आशा करायला काय हरकत आहे?
लोकसभेत भाजपने मोदींना चालवले. आता गोपीनाथ मुंडेंना चालवतील. मोदी दिल्लीच्या तख्तावर बसले तर मुंडेंचा भाव वधारणार आहे. राज्यातली तिकिटे मुंडे वाटतील. मुंडे हेही एका अर्थाने मिनीमोदीच आहेत. सारी निवडणूक अंगावर घेऊन मुंडे अतिशय आक्रमकपणे राज्यभर फिरले. मुंडेंना एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसायचे आहे. मुंडेंचे ‘दोस्त’ नितीन गडकरी यांचे स्वप्न जरा वरचे आहे. गडकरींना दिल्लीच्या तख्तावर बसायचे आहे. त्यांच्या पार्टीवाल्यांनीच गडबड केली; नाहीतर आज ‘नमो’ ऐवजी ‘निग’ची चर्चा असती.
मोदी गडकरींना फार घुसू देणार नाहीत. त्यामुळे गडकरी महाराष्ट्रात लक्ष घालू शकतात. ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी..’ शरद पवार, विलासराव, सुशीलकुमारजी यांना गावचा मोह सुटला नाही. हे तर गडकरी आहेत. येत्या जुलैमध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. गडकरींना आपला वारस द्यायचा आहे. अजून त्यांनी नाव जाहीर केलेले नाही यावरून ओळखा. खरी रणधुमाळी युतीमध्येच पेटणार आहे.
१५ वर्षांपूर्वी शिवसेनेने जास्त जागा जिंकल्या म्हणून मुख्यमंत्रिपद त्यांच्या कोट्यात गेले. या वेळी मनसे फॅक्टरमुळे शिवसेनेची पूर्वीसारखी शक्ती राहिलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर दुकान सुरू आहे. पण हे असे फार दिवस चालू शकत नाही. उद्धव-राज यांना टाळी द्यावी लागेल. एका म्यानीत दोन तलवारी राहू शकत नाहीत. पण दोघे असेच भांडत राहिले तर लोकच कुण्या एकाला बाजूला करतील. मग उरला ‘आप.’ ‘आप’ची हवा ओसरली आहे. ‘आप’ची स्थिती बसपासारखी होईल. मोदींना रोखताना काँग्रेसवाल्यांची दमछाक झाली. आता मुंडेंना रोखताना बाबा-दादा कसा सापळा लावतात ते पाहायचे. दोन विश्वयुद्धं झाली. तिसरे जागतिक युद्ध झाले तर ते कसे असेल, याचे ट्रेलर या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल, एवढी ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. जुने-नवे सारे हिशेब हिच्यात चुकते होतील. केंद्रात सरकार बनवण्याएवढय़ा जागा मिळाल्या तरच काँग्रेसजनांची महाराष्ट्रातील निवडणूक सुखाची जाईल. १00 जागांच्या आत काँग्रेस संपेल असे सर्व्हे आले आहेत. तसे झाले तर देशाच्या राजकारणात त्सुनामी येईल. काँग्रेसमध्ये प्रचंड उलथापालथी होतील. सोनिया गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देणारा कुणी ‘शरद पवार’ सध्या काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये बंडाळी माजण्याची शक्यता नाही. पण सोनिया-राहुल मतं मिळवून देऊ शकत नाही म्हटल्यावर त्यांना जवळ कोण करणार? काँग्रेसला वाईट दिवस येऊ घातलेत का? राजकारणात काहीही होऊ शकते. दिल्ली काँग्रेसच्या हातून गेली म्हटले तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकांवर याची रिअँक्शन होऊ शकते. युतीच्या जागा वाढू शकतात. राष्ट्रवादीलाही याचे चटके बसतील. धक्कातंत्रात तर राष्ट्रवादीवाले वस्ताद आहेत. तशा संकटात शरद पवार कसे वागतात त्यावर सारा खेळ राहील.
(राजकीय विश्लेषक)