शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

सामान्यातील असामान्य ‘काजवे’ !

By admin | Updated: June 15, 2017 16:04 IST

सेवेचा स्थायिभाव अगर माणुसकीचा कळवळा असणारी व्यक्ती साधनांनी संपन्न असो अगर नसो, तिच्या सेवेचा व कळवळ्याचा भाव कसल्या न कसल्या माध्यमातून प्रसवल्याखेरीज राहात नाही.

- किरण अग्रवाल

सेवेचा स्थायिभाव अगर माणुसकीचा कळवळा असणारी व्यक्ती साधनांनी संपन्न असो अगर नसो, तिच्या सेवेचा व कळवळ्याचा भाव कसल्या न कसल्या माध्यमातून प्रसवल्याखेरीज राहात नाही. अशी कामे करणारी व्यक्ती बहुदा समाजासमोर येतही नाही, कारण ‘प्रदर्शन’ हा तिचा उद्देशच नसतो. आपल्या परीने जे होईल, जसे होईल ते व तितके ती ‘स्वान्तसुखाय’ करीत असते. आजच्या काळातील अवतीभोवतीच्या ‘मतलबी’ लोकांसमोर आदर्श ठरावेत असे हे ‘काजवे’च म्हणायला हवेत. त्यांचा प्रकाश भलेही टिमटिमणारा असेल; पण त्यात अवघा परिसर उजळून काढण्याची ऊर्जा व शक्ती नक्कीच असते. अशांचे समाजाकडून कौतुक होणे गरजेचे आहे, त्यांना बळ मिळाले किंवा त्यांच्या सारख्यांचे कौतुक केले गेले तर इतरांनाही प्रेरणा मिळू शकेल. ‘सेवे’साठी साधन-संपन्नताच असावी लागते असे नाही, इच्छाशक्ती असली की पुरे, असा संदेशही त्यातून जाईल; पण तसे फारसे होताना दिसत नाही हे दुर्देव.

प्रस्तुत प्रस्तावना यासाठी की, लग्नसमारंभ म्हटला, म्हणजे कर्ज काढून तो पार पाडण्याची बहुतेकांची मानसिकता असते. चारचौघांत व नात्यागोत्यात आपली मान उंच ठेवण्यासाठी ताकदीच्या बाहेरच्या गोष्टीही केल्या जातात. मानपानाचे तर विचारू नका. त्यासाठी ‘होऊ द्या खर्च’ अशीच भूमिका घेतली जाते. यात लोकलज्जेच्या भीतीपोटी न झेपणारा खर्च करणारे असतात, तसेच लग्नात नाही करायचा खर्च तर कधी, असा प्रश्न करीत आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन मांडणारे किंवा बडेजाव मिरवणारेही काही असतात. लग्नासाठी हेलिकॉप्टरमधून आला नवरदेव, एकाच रंगाच्या ५१ वाहनांतून आले वऱ्हाड यांसारख्या बातम्या अधून-मधून वाचायला मिळतात त्या त्यामुळेच. अशा अधिकतर स्थितीत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या वावी या छोट्याशा गावातील एका सामान्य वारकरी कुटुंबाने शहाण्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या पद्धतीने आपल्याकडील विवाहसोहळा पार पाडला. लग्नातील वऱ्हाडी मंडळींना मानापानाचा टोपी-टॉवेल न देता किंवा फेटे न बांधता पांडुरंगगिरी गोसावी यांनी आपल्या मुलाच्या लग्नात आलेल्यांना आंब्याची सुमारे एक हजार रोपे वाटलीत. कीर्तनकार म्हणून समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या पांडुरंगगिरींनी संत तुकोबारायांच्या अभंगवाणीतील ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’चा संदेश प्रत्यक्ष आचरणात आणून समाजासमोर ‘उक्ती सोबत कृती’चा आदर्श ठेवला. विशेष म्हणजे, एकीकडे पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवडीचे शासकीय सोपस्कार पार पडत असताना त्याच दिवशी गोसावी परिवाराने रोपवाटपाचा कृतिशील आदर्श घालून दिला.
 
आणखी एक उदाहरण यासंदर्भातले असे की, सुरगाण्यासारख्या आदिवासी क्षेत्रातील रमेश भावडू आहेर यांचे पुत्र डॉ. सागर यांचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवे येथील डॉ. सोनल हिच्याशी पार पडला. डॉक्टर वर-वधूच्या या लग्नपत्रिकेत अन्य अनुषंगिक मजकुराऐवजी ‘वसुंधरा वाचवा’, ‘झाडांना नष्ट करू नका’, ‘रक्तदान करा’, ‘पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण’, असे संदेश देणारा समाज जागरणाचा मजकूर प्राधान्याने प्रकाशित केलेला दिसून आला. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत कंत्राटी कामगार असलेला निंबा पवार हा असाच एक अवलिया. स्वत:च्या आर्थिक विवंचनेची व त्यामुळे येणाऱ्या मर्यादांची तमा न बाळगता तो जेथे जातो तेथे जलजागृती व वृक्षारोपणाचे पोस्टर्स चितारत असतो. सातपूरचाच एक रिक्षाचालक दीपक आरोटे. हातावर पोट असलेला. परिस्थिती बेताचीच; पण सामाजिक भान जपत हा रिक्षावाला कोणत्याही अंध-अपंगांना मोफत प्रवासी सेवा पुरवत असतो. सिडकोतल्या एका महापालिकेच्या शाळेत नोकरीस असलेली कविता वडघुले ही एक शिक्षिका. पगारापुरते काम न करता, तिने पदरमोड करून स्वखर्चाने शाळेची एक वर्गखोली पर्यावरणपूरक संदेशाने सजवून दिली. विद्यार्थी वर्गात रमतील असे वातावरण निर्मिले. ही अशी उदाहरणे पाहिली की, सारेच काही संपले नसल्याचा आशावाद जागल्याखेरीज राहात नाही. 
 
आणखी एक वेगळे उदाहरणही येथे देण्यासारखे आहे. नागपूरच्या एका गतिमंद महिलेला उपचारासाठी मुंबईला नेत असताना तिच्याच मुलाने मनमाड रेल्वे स्टेशनवरच सोडून दिले. धुणी-भांडी करून उपजीविका करणारी ही महिला मुळात गतिमंद असल्याने वेड्यासारखी भटकत राहिली. पोलिसांनी तिला हटकले असता तिने आपले गाव नागपूर सांगितले; पण पोलिसांनी नामपूर ऐकून तिला बागलाण तालुक्यातील नामपूरच्या बसमध्ये बसवून दिले. तेथे बेवारसपणे फिरणाऱ्या या महिलेला सौ. प्रियंका प्रमोद सावंत, सौ. अनिता विजय सावंत, सौ. रेवती प्रवीण सावंत, सौ. मनीषा श्यामकांत सावंत व सौ. वंदना अशोक सावंत यांनी आधार देऊन तब्बल दीडेक महिना सांभाळ केला. तिला बोलते करून तिचा पत्ता शोधून काढला व साडीचोळी देऊन नागपूरला तिच्या घरी पोहचते केले. किती ही माणुसकी! व्यक्ती-व्यक्तींतले, माणसातले देवपण दर्शवणारी! हे देवपणच समाजाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणारे आहे. अशांचीच खरे तर पूजा बांधली जायला हवी. पण, आपण सारेच प्रदर्शनीपणा करणाऱ्यांच्या मागे धावतो. त्यांच्याच कौतुकाचे पूल बांधतो. अशात हे सामान्यातले असामान्य ‘काजवे’ आपल्याच परिघात टिमटिमत राहू नयेत, एवढेच.
 
 
 
 
 
 
 
(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत निवासी संपादक आहेत)