शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

युनायटेड स्टेट‌्स ऑफ बायडेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 01:43 IST

अमेरिकेच्या इतिहासात इतका लहरी अध्यक्ष झाला नसेल. विरोध सहन न होणारे अनेक नेते असतात; पण विरोधकांचा उघड द्वेष करणारे थोडेच असतात.

अमेरिकेच्या अध्यक्षपदावरील उन्मत्त, उद्दाम, उच्छादी नेतृत्वाचा पराभव होऊन तेथे समंजस, समतोल, संग्राहक नेतृत्वाची स्थापना झाली. चूक त्वरेने दुरुस्त करता येते हे अमेरिकेतील जनतेने जगाला दाखविले. जो बायडेन यांची अध्यक्षपदावरील निवड हा अमेरिकेबरोबर जगाला दिलासा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी, मनमानी, ट्वीटर-कारभाराला जग विटले होते. ट्रम्प महाशयांचे ट्वीट काय असेल, त्यातून कोणती धोरणे बदलली जातील, कोणाची गच्छंती होईल आणि कोणाला डोक्यावर घेतले जाईल याचा भरवसा नव्हता. ना कुणाशी सल्लामसलत, ना जाणकारांशी चर्चा, ना राज्यघटनेचा आदर, ना कारभारातील उदारता.

अमेरिकेच्या इतिहासात इतका लहरी अध्यक्ष झाला नसेल. विरोध सहन न होणारे अनेक नेते असतात; पण विरोधकांचा उघड द्वेष करणारे थोडेच असतात. ट्रम्प त्यातील एक होते. त्यांच्या विरोधकांनी, विशेषतः अमेरिकेतील माध्यमांनी ट्रम्प यांना प्रथमपासून खलनायक ठरविले, त्यांची यथेच्छ चेष्टा केली, देत त्यांना हिणवले हे खरे असले तरी अध्यक्षपदावर बसल्यानंतर विशाल हृदयाने कारभार करणे ट्रम्प यांना शक्य होते. त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे अमेरिकेचा डॉलर वधारला; पण नैतिक उंची खालावली. केवळ सुबत्ता येऊन चालत नाही, ती सुबत्ता कोणत्या पायावर उभी आहे, त्यामागील नैतिक चौकट कोणती आहे, ती सर्वसमावेशक आहे की दुहीचे बीज पेरणारी आहे हे जनता पाहत असते.

ट्रम्प यांच्या कारभाराला समावेशक नैतिक चौकट नव्हती. कोरोनाच्या काळात उत्तम काम करून दाखविण्याची संधी ट्रम्प यांना होती. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लागणारी सर्व सामग्री, पैसा आणि मुख्य म्हणजे विज्ञान हे अमेरिकेकडे मुबलक होते; परंतु ट्रम्प यांनी विज्ञानालाच ठोकरले. मास्क झुगारताना त्यांनी विज्ञानही झुगारले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. कोरोना वाढला आणि ‘अब की बार ट्रम्प सरकार’ ही घोषणा बहुसंख्य अमेरिकनांनी नाकारली. ट्रम्प यांच्या अगदी उलट जो बायडेन यांचे धोरण आहे. कोरोनाशी लढताना विज्ञान हेच मुख्य अस्र आहे हे ते जाणतात. विज्ञान काय सांगते, आणि तज्ज्ञ कोणता सल्ला देतात हे ऐकण्याची क्षमता बायडेन यांच्याकडे आहे. गुणवत्तेची कदर हे अमेरिकेचे वैशिष्ट्य आहे व ते बायडेन यांच्याजवळ आढळते.

कमला हॅरिस यांची उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली निवड ही गुणग्राहकतेच्या कसोटीवर टिकणारी आहे. आशियाई वंशाच्या, कृष्णवर्णीय महिलेची निवड करून बायडेन यांनी एक मोठा सामाजिक बांध फोडून टाकला, असे कमला हॅरिस यांनी म्हटले. पक्षांतर्गत लढतीत हॅरिस व बायडेन यांच्यात काही वर्षांपूर्वी कडवट स्पर्धा झाली होती. त्यातील कडवटपणा बाजूला सारून बायडेन यांनी हॅरिस यांना आपल्याबरोबर घेतले आणि यातून अमेरिकेची नवी ओळख जगाला करून दिली. 

ही ओळख दिलासा देणारी व अपेक्षा वाढविणारी आहे. विजयाचे भाषण करताना बायडेन आणि हॅरिस यांनी वापरलेले शब्द महत्त्वाचे आहेत. सभ्यता (डिसेन्सी), मनाचा मोठेपणा (डिग्निटी), धीटपणा (ऑडेसिटी), संधी (अपॉर्च्युनिटी), आशा (होप) या शब्दांतून व्यक्त होणाऱ्या भावनांवर बायडेन व हॅरिस यांनी जोर दिला होता. बायडेन यांनी ‘येस , वुई कॅन’ या बराक ओबामांच्या मंत्राचा दाखला दिला आणि परस्परांचे मत आस्थेने ऐकून घेण्यावर भर दिला. मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे, मतभेदांची शस्रे होऊ नयेत. ट्रम्प यांच्या काळात तशी ती झाली आणि म्हणून ‘विरोधकांना सैतान ठरविण्याचे पर्व आता संपले’ असे बायडेन यांना म्हणावे लागले.

दुसऱ्याची मते आस्थेने ऐकून घेण्याचा सल्ला बायडेन यांच्या समर्थकांसाठीही महत्त्वाचा आहे. बायडेन यांच्या विजयामुळे डेमॉक्रेटिक पक्षातील कडवे उदारमतवादी व डावे, तसेच ट्रम्पविरोधी पत्रकार चेकाळले आहेत. अमेरिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मते घेऊन बायडेन विजयी झाले असले तरी ट्रम्प यांची मतसंख्याही डोळ्यात भरण्याजोगी आहे. बायडेन यांना अमेरिकेने स्वीकारले म्हणजे ट्रम्प यांना पूर्णपणे नाकारले असे नव्हे.

ट्रम्प यांनी लहरीपणा सोडून सभ्यपणे कारभार केला असता तर ते पुन्हा निवडून आले असते हे काही डेमोक्रेट नेत्यांनाही मान्य आहे, मात्र हे समजून न घेता अतिरेकी उदारमतवाद्यांकडून समाजाला न झेपणाऱ्या सुधारणा वा आर्थिक धोरणे राबविण्याचा दबाव बायडेन यांच्यावर येईल. अशावेळी श्रवणाचे सामर्थ्य बायडेन यांना रिपब्लिकनांबरोबर स्वपक्षीयांनाही शिकवावे लागेल. अमेरिका शक्तीचे प्रदर्शन करणार नाही तर कृतीतून शक्ती दाखवून देईल (पॉवर ऑफ अवर एक्झाम्पल, नॉट एक्झाम्पल ऑफ पाॅवर) हे बायडेन यांचे वाक्य जगासाठी महत्त्वाचे आहे व ट्रम्प यांच्या काऊबॉय वृत्तीवर काट मारणारे आहे. बायडेन व हॅरिस दोघांनीही अमेरिकेचे वर्णन ‘शक्यतांनी भरलेला देश’ (कंट्री ऑफ पॉसिबिलिटी) असे केले. दोघांचे आयुष्य याची साक्ष देते. बायडेन यांना तिसऱ्या प्रयत्नानंतर अध्यक्षपद मिळाले.

अनेक मानसिक आघात व टीका त्यांनी सहन केल्या. कमला हॅरिस यांनीही अनेक सामाजिक व सांस्कृतिक बंधनांशी संघर्ष करीत हे पद मिळविले. अपयश आल्यावर खचून न जाता प्रयत्नशील राहण्याचा अमेरिकी गुण या दोघांमध्ये आहे. अमेरिकेत अनेक गोष्टी शक्य आहेत आणि म्हणून जगाला अमेरिकेची ओढ असते. शक्यता, संधी यांची दारे बंद करून ट्रम्प यांनी अमेरिकेला आत्ममग्न करून टाकले होते. बायडेन व हॅरिस ती दारे खुली करू इच्छितात; पण हा मार्ग सोपा नाही.  ट्रम्प जरी पायउतार झाले तरी ट्रम्प यांनी रुजविलेल्या विषवल्ली डेरेदार होण्याचा धोका नजरेआड करता येणार नाही. अमेरिकेच्या मध्यभागातील ट्रम्प यांचे गड शाबूत आहेत व डेमॉक्रेट‌्सच्या काही प्रदेशात त्यांनी मताधिक्य घेतले आहे. अशावेळी शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची ठरते. बायडेन व हॅरिस यांना याची जाणीव असावी. लोकशाही ही कृती असते, फक्त राज्य शासन नसते (डेमॉक्रसी इज ॲक्ट, नॉट स्टेट) असे हॅरिस म्हणाल्या.

बायडेन आठ वर्षे उपाध्यक्ष होते व काँग्रेसमध्ये ते ४८ वर्षे आहेत. अमेरिकेचा कारभार कसा चालतो व त्यामध्ये कोणते गट प्रभाव टाकतात याची अंर्तबाह्य जाणीव बायडेन यांना आहे. समावेशक, संग्राहक, समंजस अशी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बायडेन व हॅरिस उभी करू इच्छितात. भारतासह अन्य देशांतील नेत्यांनी याकडे पहावे व अमेरिकी निकालाचा अर्थ समजून घ्यावा. एककल्ली, एकमार्गी आणि संवादापेक्षा दुहीला जोर देणारा कारभार फार काळ चालत नाही. समंजस व समतोल धोरणेच नायकाला शोभून दिसतात. बायडेन यांच्या या अमेरिकेला भारतीयांच्या अनेक शुभेच्छा.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionJoe Bidenज्यो बायडन