पृथ्वीवर सर्वत्र शांतता पसरावी, मानवी बुद्धिमत्ता आणि एकजूट यांचा वापर करून सहिष्णुतेचे वातावरण सर्वत्र निर्माण व्हावे, या उद्देशाने युनेस्कोने १६ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिवस म्हणून साजरा करावयाचे ठरवले. आजचे जग दहशतवाद, जातीयवाद, हिंसा, प्रांतीयवाद, तीव्र राष्ट्रीयता, मूलतत्त्ववाद आदींमुळे अस्वस्थ आहे. त्यासाठी जगातील सर्व देशांनी पुढाकार घेऊन जात, धर्म, भाषा, लिंंग, राष्ट्र असे भेदभाव बाजूला सारून सकल मानवतेच्या कल्याणाच्या दिशेने सहनशीलतेची कास धरली पाहिजे, ही मूळ संकल्पना आहे. सहनशीलता एक सद्गुणच आहे. समाजातील मतभिन्नता किंंवा दुसऱ्याचे मत लादून घेणे म्हणजे सहनशीलता नव्हे, तर परस्परांवरील आदराने आणि एकमेकांशी समझोता करून जगण्याचा तो एक मार्ग आहे. शिक्षण हे त्यासाठी प्रभावी माध्यम ठरावे. एकमेकांवरील दृढ विश्वास हेही सहनशील समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असू शकते. समाजाची बांधिलकी या चळवळीसाठी आवश्यक आहे. पण आजच्या टेक्नोसॅव्ही युगात या सर्वांमधील सकारात्मक पाहणे, त्याचा अवलंब करणे हे एक मोठे आव्हान आहे. मानवी व्यवहारांकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे. आज व्यक्तिगत पातळीवर विचार करता नातेसंबंधांमधील ताणतणाव, व्यक्तीव्यक्तींमधील अविश्वासाचे वातावरण, पतीपत्नींमधील दुरावा या सर्वांकडे सहिष्णू वृत्तीने पाहिले तर सहनशीलतेचे, विचारांच्या आदानप्रदानाचे व त्यामधून मार्ग काढण्याचे महत्त्व समजावून घेता येईल. समाजातील विविध घटकांना, मग ते धार्मिक असोत, जातीय असोत, भाषेचे असोत, त्यांच्या मानवी हक्कांची जोपासना करताना खेळीमेळीचे, विचारांच्या आदानप्रदानाचे वातावरण कसे राहील, याचा विचार ही काळाची गरज आहे. भारतामध्ये अठरापगड जातींच्या समाजामध्ये सहिष्णुतेची मूल्ये जोपासताना सहनशीलतेची शिकवण संस्कारक्षम वयापासून देणे गरजेचे आहे. यासाठी संतांच्या शिकवणीला पर्याय राहत नाही. संतांच्या शिकवणीबरोबरच अन्य साहित्य, कला, संस्कृती यांच्या माध्यमातून विचारांचा हा नंदादीप सदैव तेवता ठेवला पाहिजे. विविध भाषा, रूढी, परंपरा असलेला समाज एकत्रित वावरताना त्या त्या संस्कृतीचे, विचारांचे मीलन होऊ शकले तर एकमेकांप्रती आदर, प्रेम, ममता यांचे वातावरण होण्यास सहकार्य होईल. याच दृष्टिकोनातून गेल्या वर्षी घुमान येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाकडे पाहता येईल. मराठी साहित्याचा गजर पंजाबमध्ये निनादला. यातून सकारात्मक वातावरण तयार झाले. याचेच द्योतक म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये पंजाबी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. पंजाबमधील संस्कृती, साहित्य, गुरू नानक साहेब, संत नामदेव यांच्या साहित्याचा गजर महाराष्ट्रात होत आहे. दोन भिन्न परंपरा असलेल्या समाजातील, भाषेतील समाज एकत्र येणार असेल तर यातून विचारस्वातंत्र्याचे नवे आयाम समोर येतील. एकमेकांप्रतीचा आदर वाढण्यास निर्माण होणारे वातावरण सकारात्मक राहील. मानवी मूलभूत हक्कांची जोपासना करीत असताना मानवतेची अस्मिता जपताना, युद्धाच्या, जातीपातीवरून होत असलेल्या कलहांच्या अरिष्टापासून वाचविण्यासाठी असहिष्णुता, असहनशीलता यांचा अंत व्हावा व मानवामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण व्हायला हवे. सहनशीलता म्हणजे दुर्बलता नव्हे; तर विवेकाने, सकारात्मकतेने कोणत्याही परिस्थितीला कणखरपणे सामोरे जाण्याचे, सकारात्मक मार्ग काढण्याचे व प्रगतीकडे वाटचाल करण्याचे माध्यम आहे. भारताला गेल्या शतकात ही सहनशीलतेची प्रेरणा महात्मा गांधी यांनी दिली. त्यांनी दाखविलेल्या अहिंंसेच्या मार्गावरून आजही पुढे वाटचाल केली तर ते मानवाला प्रगतीकडे नेण्याचे समर्थ साधन बनेल. सहनशीलता वृध्दींगत होणे गरजेचे आहे. - विजय बाविस्कर
अस्वस्थ समाजमन व्हावे सहनशील
By admin | Updated: November 17, 2016 05:12 IST