त्रिपुरारी पौर्णिमा माहात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:35 PM2018-03-12T23:35:08+5:302018-03-12T23:35:08+5:30

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला.

Tripurari Purnima Mahaatyyya | त्रिपुरारी पौर्णिमा माहात्म्य

त्रिपुरारी पौर्णिमा माहात्म्य

Next

- नंदकिशोर पाटील
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे आणि त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात!
दोन वर्षांपूर्वी भागवतांनी चिंतन शिबिरात सांगितलेलं हे ‘त्रिपुरा पौर्णिमा’ महात्म्य तेव्हा काही स्वयंसेवकांच्या डोक्यावरून गेलं होतं. कोण हा त्रिपुरासुर? कुठे आहे त्याचे ते नगर? चिंतनाचा विषय तर ‘पूर्वांचल की ओर’ असा असताना अचानक हे त्रिपुरारी पुराण का? एक ना अनेक अशा अनुत्तरित प्रश्नांना मागे सोडून ती बैठक पार पडली...
भागवतांच्या बौद्धिकाचे हेच तर वैशिष्ट्य. ते जेव्हा डावीकडे बघा, असे म्हणतात तेव्हा ऐकणा-यांना वाटतं, ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देत असावेत. पण स्वयंसेवकाला हा इशारा पुरेसा असतो. लागलीच ते आपली शबनम काखेत अडकवून पश्चिम बंगाल अथवा केरळकडे कूच करतात. तेव्हाही असेच घडले. ‘दक्षिणायन’ शिबिरात भागवतांनी स्कंद पुराणातील त्रिपुरारी पौर्णिमेचं महात्म्य सांगताच देवधर आदी स्वयंसेवकांनी आपला मुक्काम आगरतळाकडे हलविला होता. गेली दोन दशकं त्रिपुरात माणिकांचं सरकार होतं. साधी राहणी, उच्च विचारसरणी या न्यायानं चालणारं. जातीय दंगली आणि भ्रष्टाचाराचा मागमूस नसल्याने वरकरणी ही लढाई सोपी नव्हती. कूटनीतीचा कस लागणार होता. देव आणि दैत्याचे द्वंद्वं उभं केल्याखेरीस जनतेला भाविक बनविता येणार नाहीे, हे भागवतांना ठाऊक होतं. कर्मसिध्दांताची पाठराखण आणि लेनिनवादावर ठाम विश्वास असलेल्या इथल्या कर्मठ ‘सरकार’चा तर देवाशीच उभा दावा...अखेर भागवतांना लढाईचे सूत्र गवसले. त्रिपुरातील ‘माणिक’मोती टिपायचे असतील तर ही कामगिरी एखाद्या देवावर सोपवायला हवी! देवधर होतेच. देवाचा शोध सुरू झाला. अन् दैवयोग असा की, कधीकाळी व्यायामशाळेत (जिम) प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) असलेले विप्लव कुमार देव नावाचे कार्यकर्ते संघातच होते! त्रिपुराच्या लढाईचा नायक ठरला. आता संहिता बाकी होती. नवमतदारांना पुराणातील वांगी दाखवून आकर्षित करता येणार नव्हते. भविष्य आणि भुकेच्या चिंतेतून त्यांना मुक्ती हवी होती.
अच्छेदिनाचे स्वप्न दाखवून भूक तात्पुरती का होईना शमविता येते, हा पूर्वानुभव असल्याने ‘माणिक नही हिरा चाहिए’! अशी आकर्षक घोषणा तयार झाली. संघाकडे प्रचारकांची वानवा नव्हती. बघता-बघता घरोघरी ही घोषणा पोहोचली. कालपरवापर्यंत माणिकांच्या नावाचा जप करणारी पिढी स्वप्नातील या हि-यास (हायवे, इंटरनेट, रोडवे अन् एअरवेज) भुलली अन् सरकारबरोबर ‘लेनिन’ही धारातीर्थी पडले!

Web Title: Tripurari Purnima Mahaatyyya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.