आफ्रिकेहून परतल्यानंतर महात्मा गांधी यांनी उत्तर बिहारमधील चंपारण्यातील नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन उभारून स्वातंत्र्यलढ्यात शेतकऱ्यांना अग्रस्थानी आणले. या आंदोलनासाठी जात असताना ब्रिटिश पोलिसांनी महात्मा गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, ‘माझ्या देशात, मला संचार करण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर मला अटक करा; पण माझा संचार करण्याचा अधिकार तुम्हाला हिरावता येणार नाही!’ गाझीपूर सीमेवर राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय किसान युनियनच्या झेंड्याखाली हजारो शेतकरी सत्तराव्या दिवशीही ठिय्या मारून बसले आहेत. वादग्रस्त तिन्ही कृषिविषयक कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, यावर ते ठाम आहेत. दरम्यान, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड केली होती. त्यातील काही जणांनी शेतकरी आंदोलन बदनाम करण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर परेडसाठीआखून दिलेला मार्ग सोडून लाल किल्ल्याकडे धाव घेतली आणि हिंसक गोंधळ घातला. या कृतीचा शेतकरी आंदोलक नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.दरम्यान, या हिंसक कृतीमुळे नाराज झालेल्या काही संघटना आणि नेत्यांनी आंदोलनातून माघार घेतली. तेव्हा राकेश टिकैत हे प्रचंड नाराज झाले आणि आपल्या शेतकऱ्यांना आवाहन करताना ढसाढसा रडले. ते अश्रू ‘आंसू बने अंगारे’सारखे पसरले आणि पश्चिम उत्तर प्रदेशातून हजारोंच्या संख्येने शेतकरी जमा झाले. हे शेतकरी पुन्हा हिंसक कारवाया करतील म्हणून गाझीपूरपासून दिल्लीत जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी खिळे ठोकण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता अडवून तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. भारत-पाक किंवा भारत- बांगलादेश सीमेवरून परकीय नागरिक तसेच अतिरेक्यांनी घुसखोरी करू नये म्हणून घालण्यात आलेल्या कुंपणाप्रमाणे आपल्याच शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केलेली ही सरकारची कृती लांच्छनास्पद आहे. गेले सत्तर दिवस एकही दगड न मारणारे शेतकरी, लंगरमध्ये स्वत: जेवताना पोलिसांना पंगत बसवून खाऊ घालणारे शेतकरी, असे कसे वागू शकतील? सरकार किंवा पोलीस प्रशासनाने आंदोलक नेत्यांना किमान कायदा सुव्यवस्थेसाठी तरी विश्वासात घेऊन परिस्थिती हाताळली पाहिजे.
आजचा अग्रलेख - शेतकऱ्यांच्या मार्गात काटेरी कुंपण कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 06:05 IST