- वंदना अत्रे (संगीत आस्वादक, ज्येष्ठ पत्रकार)पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचा आज प्रारंभ. पंडितजींसारखे कलाकार ज्या देशात जन्म घेतात, मैफली करतात तिथे नेमके काय घडत असते? तिथे समृद्ध परंपरेने घडवलेल्या गायकीचा निगुतीने सांभाळ होतो. बंडखोरीचा कोणताही अविर्भाव न आणता ते गाणे सौंदर्याच्या आजवर अज्ञात राहिलेल्या मुक्कामांचा शोध घेत राहते. रसिकांनाही त्याची ओळख करून देत त्या गायकीला नवा, कालानुरूप डौल देते. असा डौल लाभलेली गायकी मग अगदी सहज, नकळत परंपरेच्या इतिहासाचा पुढचा टप्पा बनते! आणि हे घडत असतांना तरुण, उत्सुक गायकांची गजबज या गाण्याभोवती सुरु होते... ते गाणे पुढे जात राहते... समाजात रूजत राहते... एवढेच घडते फक्त...! काय लिहायचे या गाण्याबद्दल अधिक? रात्री वाऱ्याच्या झुळकीवर स्वार होऊन आलेला रातराणीचा गंध सर्वांगाला लपेटून घेतो तेंव्हा त्याचे काय वर्णन करतो आपण? थंडी-वाऱ्यात कुडकुडत अवघड वाटा तुडवत चालत असतांना अवचित समोर हिमालयातील शुभ्र-उत्तुंग शिखर येते तेंव्हाचा थरार फक्त मूकपणेच अनुभवता येतो. हा अनुभव ज्याचा-त्याचा. अगदी वैयक्तिक. तसेच, अगदी तसेच पंडितजींचे गाणे हाही प्रत्येकाचा स्वतःचा असा खास अनुभव. आठवण येताच, डोळे मिटताच कानात वाजू लागणारे हे गाणे. एखाद्या रसिकासाठी हे गाणे म्हणजे सवाई गंधर्व महोत्सवातील सकाळच्या सोनेरी उन्हात सुरू होणारा, त्या अथांग गर्दीमधील प्रत्येकाला तृप्त करणारा भटियार. तर दुसऱ्या कोणासाठी फक्त ‘कान्होबा तुझी घोंगडी...’ मधील भाव! ‘मिले सूर मेरा तुम्हारा...’ऐकत थरारून जाणारा एखादा नवतरुणही त्या गाण्याचा भक्त होत जातो. या तृप्तीची आणि भक्तीची मीमांसा करणे अवघड. शिवाय, या गाण्यामागे आणि गाणाऱ्यामागे आहे बऱ्याच खऱ्या (आणि काही खोट्या सुद्धा!) चकीत करणाऱ्या कहाण्यांचे वलय. त्यातून एखाद्या ‘सुपरमॅन’बद्दल निर्माण व्हावा असा आदरभाव! या कहाण्या आणि त्यातील भाबडा भक्तिभाव दूर सारून निर्मळ दृष्टीने या कलाकाराकडे बघितले तर कोण दिसते? ध्यास, प्रचंड इच्छाशक्ती आणि अथक मेहनत याच्या आधारे जग जिंकता येते याचे उदाहरण समोर ठेवणारा एक पराक्रमी माणूस. एरवी तुमच्या माझ्यासारख्या कातडीचा आणि हाडामांसाचा! साधा आणि निगर्वी! ‘मी गाडीत असतांना आपलेच गाणे ऐकतो’ असे सांगणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंडितजींना राज्यसभेचे मानद सभासदत्व देण्याचे निश्चित केले होते. तसे त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे कळवले. पंडितजी राजी होत नाहीत, असे दिसल्यावर अखेर एक दिवस पंतप्रधानांनी स्वतः फोन केला, तेंव्हा त्यांना पंडितजींनी शांतपणे उत्तर दिले, “मेरे लिये मेरे दो तानपुरेही लोकसभा - राज्यसभा है...” तर, फक्त दोन तानपुऱ्यांच्या मदतीने जग जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या गायकाची जन्मशताब्दी... प्रत्येक माणूस हा त्या-त्या काळाचे अपत्य असतो. त्या काळाचा म्हणून एक आशीर्वाद असतो; त्याच्यासह आणि त्याबरोबरीने येणाऱ्या मर्यादा याचे भान ठेवत जगणारा. कलाकार त्याला अपवाद नसतातच, पण पंडितजींसारखा एखादा कलाकार या मर्यादांचे रुपांतरही आशीर्वादात करतात आणि काळाची ती चौकट ओलांडत भविष्यातील अनंत काळावर आपली मुद्रा उमटवतात. उमटवत राहतात. पंडितजी वाढले तो समाज आवाक्यातील स्वप्ने बघण्याचा आग्रह धरणारा. या आग्रहाचा अदृश्य बोजा मानेवर ठेवीत जगायला लावणारा. अशा काळात, गाण्याचा ध्यास घेऊन घरातून वयाच्या बाराव्या वर्षी एखादा मुलगा पळून जातो तेंव्हा हा धाक झुगारून देण्याची बेधडक निर्भयता आपल्यात आहे हे तो सांगत असतो. हा निव्वळ वेडेपणा नाही, हे सिध्द करण्यासाठी जालंधरच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत पहाटे पाच वाजता गार पाण्याची बदली डोक्यावर ओतून घेत असतो. एका दमात पाचशे जोरबैठका मारत असतो. खरे म्हणजे, गाण्यासाठी उपासमार, रस्त्यावर मिळेल ते काम करणे, रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करण्याचा हुकमी एक्का वापरीत लोकांची मने जिंकणे असा मोठा रोमांचक कच्चा माल असलेला पंडितजींचा जीवनपट आहे. त्यातून निर्माण झाले चोख, गोळीबंद गाणे. घडत गेला कमालीचा सात्विक आणि समाजाच्या चांगुलपणावर असीम विश्वास असणारा गायक. हे जे काही घडले ते काळाच्या एका चौकटीत न मावणारेच आणि शब्दांच्या चिमटीत पकडता न येणारे..! तो काळ होता दिवसरात्र चालणाऱ्या मैफली आणि संगीत परिषदांचा आणि त्याला हजेरी लावणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा...! आपल्या आवडत्या कलाकारावर वेडे प्रेम करणाऱ्या रसिकांचा! गुरु सवाई गंधर्व यांच्याकडील शिक्षणाबरोबर उत्तम गायकीच्या संस्कारांसाठी भटकंती केलेले पंडितजी मैफलींच्या या माहोलमध्ये उतरल्यावर आपल्या गायकीने त्यांनी रसिकांना जे वेड लावले, त्याची रसरशीत वर्णने प्रत्यक्ष ऐका-वाचायला हवी एवढी अद्भूत. भारतातील सर्वात जुन्या जालंधरच्या हरिवल्लभ संगीत संमेलनामध्ये गोठवणाऱ्या थंडीत सकाळी आठ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी सहा ते पहाटे चारपर्यंत, दिवसाचे सोळा, अठरा तासांच्या संगीत सभा चार दिवस चालत. आणि कलावंत - साथीदार यांच्याबरोबर बाहेरगावाहून येणाऱ्या श्रोत्यांनाही लंगरमध्ये शुध्द तुपाचे जेवण विनामूल्य दिले जायचे...! महोत्सवातील तीस-पस्तीस हजार श्रोते दोन कलाकारांची अक्षरशः पूजा करीत असत- एक पंडित रविशंकर आणि दुसरे पंडित भीमसेन जोशी! कारण एकच, त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, आपल्यावर असलेल्या श्रोत्यांच्या ऋणाचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. उस्मान खां सांगत होते, बिहार, उत्तर प्रदेशच्या सीमेवर एका भगुआ नावाच्या एका अगदी छोट्या गावात त्यांचा कार्यक्रम होता. ते पुण्याचे आहेत हे समजल्यावर दोन रसिक त्यांना भेटायला आले आणि विचारले, “आप पुनासे है? हमारे भीमसेनजी कैसे है?” काळाची कोणतीही सावली ज्यावर पडू शकत नाही ते गाणे ऐकतांना प्रत्येक रसिकाची भावना कोणती असते? कवी रवींद्रनाथ टागोरांनी एका कवितेत म्हटले आहे, जगताच्या आनंद यज्ञात मला निमंत्रण मिळाले, येथील रूप लावण्य बघायला मिळाले, धन्य झाले हे जीवन...
तीर्थरूप स्वरांची कालातीत सावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 06:00 IST