शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वाघांची नखे, गेंड्यांची शिंगे, हत्तींचे सुळे आणि मोरांची पिसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:07 IST

जिवंत वन्यप्राणी, पक्षी अथवा त्यांचे अवयव जगभरात प्रचंड किमतीला विकले जात असल्यामुळे या विचित्र लालसेपोटी हजारो तस्कर त्यांच्यावर तुटून पडले आहेत. 

- रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार

मौल्यवान समजल्या जाणाऱ्या निर्जीव चीजवस्तूंप्रमाणेच जंगलातील जिवंत वन्यप्राणी, पक्षी अथवा त्यांच्या शिकारीतून मिळवलेल्या अवशेषांना जगभरातून असलेली प्रचंड मागणी आणि किंमत लक्षात घेत हजारो तस्कर त्यांच्यावर तुटून पडले आहेत. या तस्करांकडून होणाऱ्या प्राणी-पक्ष्यांच्या संहारामुळे जैवविविधतेच्या साखळीतील हे मुके दुवे हळूहळू नष्ट होण्याचा धोका अगदी नजीक येऊन ठेपला आहे.   

भारताची जैवविविधता जगातील ७.६ टक्के सस्तन प्राणी आणि १२.६ टक्के पक्ष्यांसह जगातील सुमारे ६.५ टक्के वन्यजीव प्रजातींचे पालन करते. दुर्दैवाने, वन्यजीवांशी संबंधित उत्पादनांच्या जागतिक मागणीमुळे उपखंडात वन्यजीव गुन्हेगारीला चालना मिळाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) ‘स्मगलिंग इन इंडिया’ या ताज्या अहवालातील माहितीनुसार सलग सहा वर्षांच्या कालावधीतील कारवाईत १६२  देश आणि प्रदेशांमध्ये खतरनाक आंतरराष्ट्रीय नेटवर्कद्वारे चालणाऱ्या बेसुमार तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे.

सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू, मौल्यवान आभूषणे, पारंपरिक उपचारपद्धती, निरनिराळे गैरसमज, तसेच अगदी काळी जादू करण्यासारख्या कारणांसाठी मृत वन्यप्राण्यांचे अवशेष तस्करीच्या वाटेने जगभरात पोहचत आहेत. गेंड्याच्या शिंगामुळे कर्करोग बरा होतो असा गैरसमज अलीकडे दक्षिण आफ्रिकेत पसरल्याने गेंड्यांवर संक्रांत आलीय. पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलापासून हिमालयाच्या खडबडीत भूभागापर्यंत विविध वातावरणात राहणारे बिबटेही दुर्दैवाने सर्वांत धोक्यात आहेत. नखे आणि हाडांसाठी वाघ, शिंगांसाठी गेंडे आणि सुळ्यांसाठी हत्तीची शिकार, तसेच तारा कासवांच्या विक्रीचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. गेल्या तीन वर्षांत भारतात हस्तिदंत जप्तीची ९०, तर हत्तींच्या शिकारीची २९ प्रकरणे नोंदवली गेली.  खवले मांजर, साळिंदर, घुबड, हरिण, कासवे, मांडूळ, घार असे वन्यजीव पकडून त्यांना जिवंत किंवा हत्या करून त्यांचे अवयव जगभरात पाठवले जातात. त्याचबरोबर लाल चंदनासहित दुर्मीळ वनस्पतींचीही तस्करी अफाट आहे. वन्यप्राण्यांची तस्करी हा जगातला चौथा सगळ्यात मोठा संघटित अपराध करण्यात आघाडीच्या २० देशांमध्ये भारताचा समावेश आहे. वन्यजीव (संरक्षण) कायद्यांतर्गत संरक्षित असतानाही मोराची पिसे आणि जिवंत मोर हे तस्करांचा किमती ऐवज ठरले आहेत. न्हावा शेवा बंदरात मोराच्या शेपटीच्या पंखांचे तब्बल २८ लाख तुकडे आणि पिसांच्या १६ हजार काड्या नुकत्याच जप्त करण्यात आल्या. कर्नाटकातील शिमोगा येथे ठिपकेदार हरणांचे कातडे, ट्रॉफी आणि सांबरच्या शिंगांच्या विक्रीचा बाजारच उघडकीस आला.  वन्यजीव संरक्षण कायद्याने अनुसूची एक अंतर्गत हत्तींना सर्वोच्च पातळीचे संरक्षण देण्यात आले असले तरी  आशियाई हत्तींचे निवासस्थान असलेल्या आपल्या देशात शिकारी आणि तस्करांपासून त्यांचा बचाव करणे अतिशय कठीण झाले आहे. तामिळनाडूजवळच्या श्रीविल्लीपुथूर, ओडिशा, गुवाहाटी येथील कारवायांमध्ये मीटरभर लांबीचे हत्तीच्या सुळ्यांचे साठे हस्तगत करण्यात आल्याने या व्यापाराची व्याप्ती लक्षात आली. दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील वाढत्या मागणीमुळे, भारतातून कासवांची तस्करी वाढली आहे. पारंपरिक औषधींमध्येही त्यांचा वापर केला जातोच, शिवाय ही कासवे पाळल्यास ती समृद्धी आणतात या अंधश्रद्धेमुळे त्यांची तस्करी केली जाते. मध्य प्रदेशात एकाच कारवाईत डीआरआयने ३० बिबट्यांची कातडी जप्त केली.

विशेषत: आशिया आणि आफ्रिकेत आढळणारे खवले मांजर हे जगातील सर्वाधिक तस्करी केल्या जाणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. प्रामुख्याने पारंपरिक औषधांसाठी आणि शोभेच्या  वस्तू म्हणून त्यांच्या खवल्यांना प्रचंड मागणी असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 

भ्रष्टाचार, प्रभावहीन कायदे, न्यायव्यवस्थेतील दिरंगाईमुळे वन्यजीवांची लूटमार सुरू आहे. यात पकडले गेले तर स्थानिक शिकारी आणि दलालच. खरे सूत्रधार आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचे नेटवर्क कायमच अभेद्य राहते ते पुन्हा पुन्हा वन्यजीवांवर हल्ले करण्यासाठी. (उत्तरार्ध)ravirawool66@gmail.com

टॅग्स :Smugglingतस्करी