शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

थोरला धाकला सावत्र

By admin | Updated: May 31, 2014 10:53 IST

भाऊबंद आणि भाऊबंदकी या दोन्ही शब्दांच्या मागे किमान शब्दकोशात तरी काही किटाळ चिकटलेले नाही. व्यवहारात मात्र तसे नाही आणि महाराष्ट्राच्या एकूण सार्‍या व्यवहारात तर तसे अजिबातच नाही.

भाऊबंद आणि भाऊबंदकी या दोन्ही शब्दांच्या मागे किमान शब्दकोशात तरी काही किटाळ चिकटलेले नाही. व्यवहारात मात्र तसे नाही आणि महाराष्ट्राच्या एकूण सार्‍या व्यवहारात तर तसे अजिबातच नाही. उत्तरेत म्हणूनच सारे बिहारी यादव भाऊबंद असतात व लालूंच्या मागे धावत जातात आणि उत्तर प्रदेशातील सारे यादव भाऊबंद, नेताजींचा शब्द झेलायला उत्सुक असतात. त्यांच्यातही एखादा बच्चू यादव निघत असेल पण केवळ अपवादापुरता. मराठी मुलखात मात्र असले काही लाड चालवले जात नाहीत. शरद पवार मराठी किंवा मराठा म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून दिल्लीतल्या मोठय़ा खुर्चीची आस लावून बसले आहेत. त्यासाठी त्यांनी आजवर अनेक खंजीरदेखील म्हणे बोथट करून टाकले, पण इथल्या अस्सल मराठी मातीतल्या भाऊबंदकीच्या तमोगुणापायी आजतागायत त्यांची डाळ कच्चीच राहिली व यापुढे ती शिजेल असे एकही लक्षण दृष्टिपथात नाही. खंजीर खुपसायला आता पाठीच मिळेनाशा झाल्या आहेत, असे म्हणतात! भाऊबंदी किंवा भाऊबंदकीचे आणखी एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे जो थोरला असेल त्याचा मान सार्‍यांनी राखायचा. आता थोरला म्हणजे जो आधी जन्माला आला तोच ना? म्हणजे इथे निवड वा निवाडा करायचा प्रश्नच येत नाही. थोरल्याने राज्य करायचं आणि धाकल्यांनी त्याचे पाय चेपत राहायचं. चुकून थोरला राज्य करायला नाहीच म्हणाला, तर त्याच्या वहाणा खुर्चीत ठेवून धाकल्यांनी त्याच्याच नावाने राज्य करायचं हा रामायणाचा धडा. पण इथे ना कोणी राम, ना लक्ष्मण, ना भरत. सारेच बहुधा दुर्योधन आणि दु:शासन. त्यामुळे परंपरा बिरंपरा सब झूट. म्हणूनच मग वादाला निमंत्रण, थोरला कोण? इथं कुणी आधी जग बघितलं, या निकषाला काडीचीही किंमत नाही. ती असती तर जनसंघाच्या नव्या अवतारातील भाजपाकडे थोरलेपण आपोआपच गेले असते. पण नाही. इथं आम्हीच थोरले. कारण एकच, आमचे संख्याबळ जास्तीचे. भाजपावाल्यांनीही इतके दिवस ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ असे धोरण स्वीकारले. कारण त्यांना ‘लंबी रेस’ खेळायची होती. ती बहुधा आता खेळून झाली. भारतवर्षावर त्यांचा झेंडा फडकला. मग एका तुलनेने चिमुकल्या राज्यात त्यांनी का बरे सानपण स्वीकारावे? मुद्दा बिनतोड. पण सर्वस्वी अमान्य होणारा. वातावरण इतकं अनुकूल बनत चाललेलं असताना, भलत्यावेळी लहानपण कोण स्वीकारणार? थोरल्यानी थोरलेपणाचा आब राखून धाकल्याच्या हातावर आख्खा लाडू ठेवण्याचा प्रकार केवळ नीती किंवा बोधकथांमध्येच अडकून पडलेला. त्यामुळे जहागिरीवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी थोरला कोण आणि धाकला कोण, याचा फैसला होण्यासाठी वा तो करून घेण्यासाठी आत्तापासून झोंबाझोंबी सुरू. जेव्हां दोघे सख्खे भाऊ अशी झोंबाझोंबी करतात तेव्हा हमखास त्यांचे त्या तिसर्‍या सावत्राकडे दुर्लक्षच होत असते. त्याने या दोघांच्याही आधी आपल्या अस्तन्या सरसावलेल्या. थोरला रक्तामांसाने असेल थोरला, पण घराण्याचा तिखटजाळ, आक्रमक आणि बेधडक वारसा चालवायची छटाकभर तरी पात्रता आहे का म्हणावं? उगा मुळमुळीत आणि गुळगुळीत. त्यामुळे जहागीर आपल्यालाच मिळणार आणि ती आपण मिळवणारच, हा त्या तिसर्‍या सावत्राने सरसावून घेतलेला पवित्रा. पुन्हा नावातच राज, त्यामुळे राज्य करायचा अधिकार कोणाचा? पण थांबा. या भाऊबंदकीला आणखीही एक बंद आहे. हा बंददेखील त्या सावत्रासारखाच सदा फुरफुरत राहणारा. ‘देता आख्खे राज्य, नाही? मग, अर्धे? तेही नाही, मग पाव? तेही नसेल तर चाललो मी हा तिकडे’ असे सतत गुरकावत राहणारा ‘कृष्णवर्णी बिबट्या’ रामदास या भाऊबंदकीतला चौथा भाऊ. आता हे चौघे दावेदार आणि खुर्ची मात्र एकच. त्यात मौज म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हाती वरमाला घेऊन केवळ आपल्याच दिशेने येणार आणि ज्यांच्या माना बर्‍याच काळापासून वरमालेसाठी आसुसलेल्या आहे अशा दादा, नाना, आबा आदींकडे साफ दुर्लक्ष करणार हे या चारी भावांनी आधीपासूनच गृहीत धरलेलं. ‘वरमाला घेऊन घेऊन घेणार कोण आणि आपल्याशिवाय आहे कोण’ यावर त्यांची अपार  श्रद्धा. इथं त्या रयतेच्या मनात काय चाललं आहे, ती नेमकी काय करणार आहे, याच्याशी कोणालाच काही घेणंदेणं नाही. अर्थात तेही काही चुकीचं म्हणता येत नाही. कारण थोरला कोण आणि धाकला कोण या झगड्याच्या जंतूसंसर्गाचा सगळीकडेच प्रादुर्भाव. आता यातून मार्ग कसा काढायचा? निघेल, तोही निघेल. चाणक्यांनी तो विचार केला आहे. महाराष्ट्राचे सरळ चार तुकडे करायचे. एक कोकणाचा मुख्यमंत्री. दुसरा विदर्भाचा. तिसरा मराठवाड्याचा. चौथा उर्वरित महाराष्ट्राचा आणि मुंबई मात्र सामायिक! झाले समाधान? जय महाराष्ट्र!