मिलिंद कुलकर्णीपाच वर्षांतील सत्तेच्या विरहानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील यशामुळे काँग्रेसजनांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाच्या विजयाचा वारु चौखुर उधळत असताना या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्याला अवरोध निर्माण झाला. काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राष्टÑीय पक्ष या निकालाचे आपल्याला सोयीचे असे विश्लेषण करीत आहे. मोदी यांच्या झंझावाताने २०१४ मध्ये धूळधाण उडाल्यानंतर काँग्रेसजनांचे अवसान गळाले होते, शतप्रतिशत भाजपा आणि काँग्रेसमुक्त भारत अशा भाजपाच्या आक्रमक रणनितीने आता भाजपा १०-१५ वर्षे सत्तेतून हटत नाही, असाच ग्रह राजकीय वर्तुळात तयार झाला होता. परंतु, दिल्ली, गुजराथ, कर्नाटक मधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या आशा पल्लवित झाल्या तर भाजपासाठी धोक्याची घंटा वाजली. तीन राज्यांच्या निकालाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या राजकीय घडामोडींना वेग आला.महाराष्टÑ आणि विशेषत: खान्देशचा विचार केला तर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या निकालातून फार काही बोध घेतला असे जाणवत नाही. तीन राज्यात ‘अँटी इनकम्बन्सी’चा फटका बसला, असे कारण पुढे करीत भाजपा नेते सत्तेच्या धुंदीत मश्गुल आहेत. बिकट अर्थव्यवस्था आणि त्याचा सर्वच घटकांवर झालेला परिणाम, राफेल गैरव्यवहार, असहिष्णुता, प्रसिध्दी आणि परदेश दौऱ्यांवर पंतप्रधान मोदी यांनी केलेला अवाढव्य खर्च या मुद्यांचा जनसामान्यांवर परिणाम होणार नाही, असे भाजपाला वाटत आहे. राफेल आणि केंद्र व राज्य सरकारची जनहितविरोधी धोरणे यावर काँग्रेस जोर देत असून देशभर निदर्शने करीत आहे. ही वातावरण निर्मिती असली तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या संघटनात्मक बळावर लढविल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची कामगिरी सुमार अशीच आहे. त्याकडे लक्ष देण्यास स्थानिक नेते राजी नाहीत, असेच अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव व उत्तर महाराष्टÑ विभागाचे सहप्रभारी चेल्ला वामशी चांदरेड्डी यांच्या नंदुरबार, धुळे आणि जळगाव येथील दौºयात दिसून आले. भाजपामधील नेते तर विरोधकांपेक्षा एकमेकांशी झगडण्यात मश्गुल आहेत.जळगावात काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांचा विषय प्रलंबित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. दुसरीकडे जळगाव आणि रावेर या लोकसभेच्या दोन्ही जागा अद्याप राष्टÑवादी काँग्रेसकडेच आहेत. राज्यपातळीवर ८ जागांच्या अदलाबदलीमध्ये या जागा आहेत किंवा नाही, याविषयी तर्कवितर्क कायम आहेत. त्याविषयी कोणतीही चर्चा बैठकांमध्ये झाली नाही. बूथ कमिटीच्या याद्यांमधील घोळ सहप्रभारींना लक्षात आला, यावरुन संघटनात्मक पातळीवर किती आनंद आहे, हे लक्षात येते. बूथ कमिटीतील सदस्यांच्या यादीची फेरतपासणी केली जाईल, असा सज्जड दम रेड्डी यांनी दिला, यावरुन केवढा घोळ असेल याची आपण कल्पना करु शकतो.धुळे आणि नंदुरबारमध्ये तुलनेने काँग्रेस पक्षाची स्थिती चांगली आहे. परंतु, नेत्यांमधील मतभेद आणि बेदिलीमुळे पक्ष प्रभावी कामगिरी करु शकत नाही. नुकतीच झालेली धुळे महापालिका निवडणूक हे त्याचे ताजे उदाहरण आहे. धुळ्यातील बैठकीत याविषयावरुन चर्चा झाली. ‘एक प्रभाग-एक चिन्ह’ या सूत्रानुसार कॉंग्रेस आणि राष्टÑवादीने परस्परांचे कार्यकर्ते एकाच चिन्हावर उभे केले होते, हा खरे तर चांगला प्रयोग होता. पण आता पराभवानंतर त्या प्रयोगावर टीका झाली. कॉंग्रेसची ताकद असताना उगाच राष्टÑवादीमागे फरफटत गेलो, अशी पश्चातबुध्दी नेत्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेत्याच्या भाजपा प्रवेशाविषयीची चर्चा दुसºया एका पदाधिकाºयाने व्यासपीठावर जाहीरपणे केली; त्याला प्रत्युत्तर देण्यात आले, पण बेदिली समोर आली हे वेगळे सांगायला हवे काय? रोहिदास पाटील हे लोकसभा निवडणुकीचे सर्वसंमतीचे उमेदवार असतील, असे जे मानले जात होते, त्याला अशा वादंगामुळे छेद जातो, हे सुध्दा काँग्रेसजन लक्षात घेत नाही.तिकडे नंदुरबारातही तेच घडले. भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ नये आणि ही जागा राष्टÑवादी काँग्रेसला सोडू नये, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. ही मागणी होते, याचा अर्थ कोठेतरी चर्चेचा धूर निघतो आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भाजपामध्ये जाऊन चार-साडेचार वर्षांत डॉ.गावीत यांना मंत्रिपद मिळालेले नाही. आदिवासी विकास विभागातील कथित गैरव्यवहारासंबंधी कारवाई झालेली नसली तरी टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे त्यांच्या कन्या खासदार डॉ.हीना काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवतील किंवा पिता-पुत्री राष्टÑवादीत जाऊन नंदुरबारची जागा राष्टÑवादी मागेल, असा तर्क राजकीय वर्तुळात लढविला जात आहे. त्याचे पडसाद कॉंग्रेस मेळाव्यात उमटले.
ये रे माझ्या मागल्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 20:53 IST